Darya Firasti

दर्या फिरस्ती

vijaydurga1

सृष्टीमध्ये बहू लोकं, परिभ्रमणे कळे कौतुक …

बोटीतले काका समर्थ रामदासांच्या शब्दांत आमच्या भटकंतीला दाद देत होते.
रेवस ते तेरेखोल या प्रवासात अनेक समुद्रकिनारे, किल्ले, पुरातन वास्तू , शिल्पं, मंदिरं आहेत. चौकस व डोळस पर्यटन ज्यांना करायला आवडतं अशा लोकांसाठी या भागात पाहण्यासारखं खूप आहे. या संपूर्ण किनारपट्टीला जोडणारा रस्ता म्हणजे महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक ५. ज्याला पुढे सागरी महामार्गाचे रूप देण्याची योजना आहे. पण आज हा प्रवास सलग करता येत नाही. अनेक ठिकाणी खाड्या तरीतून पार कराव्या लागतात. अनेक ठिकाणी महत्त्वाची ठिकाणं पाहण्यासाठी हमरस्ता सोडून पायवाट धरावी लागते. मुंबईत भाऊच्या धक्क्यावर सुरुवात करून रेवस ते गोव्यातील तेरेखोल हा प्रवास सागर किनाऱ्याला धरून करता येतो. यापैकी मुंबई ते दापोली हा टप्पा मी यापूर्वी तीनदा तर; दापोली ते तेरेखोल हा टप्पा एकदा मोटारसायकलवरून पालथा घातला आहे.

15800186_1198814770210147_5774478577116723121_o

निसर्गाने जणू आपली संपत्ती उधळून टाकावी असा इथला माहौल तर आपल्या विलक्षण साधेपणाने श्रीमंत असलेला कोकणी माणूस हा इथल्या संस्कृतीचा केंद्रबिंदू. या सगळ्या प्रवासाचे चित्रमय वर्णन करायचं असं २००६ पासून मनात आहे. कोकणावर अनेकांनी लिखाण केलं आहे. मराठी साहित्यात अजरामर झालेल्या अनेक कृतींमध्ये कोकणाची भेट घडते. अनेक प्रवासवर्णने आणि गाईडबुक आहेतच. इंटरनेटवर कोकण शोधायला गेलं तर कितीतरी ब्लॉग, व्हिडियो सापडतात. पण मग आपण वेगळं काय देणार हा प्रश्न मला अनेक दिवस सतावत होता. चौलजवळ एका रशियन प्रवाश्याचा पुतळा आहे … अफनासी निकीतीन हे त्याचं नाव! तीन समुद्रांच्या पलीकडला प्रवास या त्याच्या पुस्तकात पंधराव्या शतकातील कोकणाचे प्रतिबिंब पाहायला मिळते.

afnasy-nikitin-copy

आपल्याला त्या काळात घेऊन जाणारे, तेव्हाच्या लोकजीवनाचा परिचय करून देणारे ते लिखाण आज एक महत्त्वाचा सांस्कृतिक दस्तऐवज आहे . भाषेपेक्षा निरीक्षणातून अशी लिखाणं आकार घेत असतात. हाच मार्ग आपण चोखाळावा असं वाटलं. पत्रकार म्हणून काम करत असताना शब्दच आमच्या गोष्टी घडवत असत. पण शब्दांपेक्षा चित्रांचं माध्यम हे या प्रवासवर्णनाचं मुख्य वेगळेपण असायला हवं असं मला वाटत होतं. कदाचित मी शब्दांपेक्षा चित्रांच्या दुनियेत जास्त रमतो म्हणूनही असेल.

अनेकदा तुझं मूळ गाव कोणतं हा प्रश्न विचारला जातो … आम्हाला गाव नाही असं मी सांगायचो! लहानपणी काकाकडे पुण्याला नाहीतर आजोळी बडोद्याला जाणे हाच नेम. पण कुलदैवत कोळेश्वर रत्नागिरी जिल्ह्यात कोळथऱ्याला. तिथं ९-१० वर्षांचा असताना गेलो होतो … ते गाव अगदी चित्रातल्या सुरेख गावासारखं वाटलं होतं. मग नंतर एकदा केळशीला गेलो आणि गावच्या यात्रेचा अनुभव घेतला … दहावीच्या सुट्टीत चौलला एका बागेत राहिलो आणि कोकणच्या प्रेमात पडलो. तिथल्या संस्कृतीबद्दल जिव्हाळा वाटायला लागला.

pebbles

Sparkling brook in the foothills of Raigad

आयआयटी मुंबईच्या इंडस्ट्रियल डिझाईन सेंटर मध्ये शिकत असताना मराठवाड्यातून आलेल्या अमोलशी ओळख झाली. त्याला समुद्राचे प्रचंड आकर्षण. आपल्याला दिसलेली आणि भावलेली प्रत्येक गोष्ट कॅनवासवर चितारायची असा आमच्या अमोल ठाकूरचा खाक्या. एका छोट्या असाइनमेंट साठी आम्ही रेवस ते गुहागर-तवसाळ भागात भटकलो. भाऊचा धक्का ते रेवस जेट्टी या दीड तासाच्या बोट सफरीतच अमोलच्या स्केचबुकच्या ४-५ पानांचा फडशा पडला. रेवस बंदरात बोटीतून आमची फटफटी उतरवत असताना अमोल म्हणाला की मलाही कोकण प्रकल्पात पार्टनर व्हायचं आहे … असा आमचा संकल्प झाला. अमोल सारखा पार्टनर मिळाल्याने या प्रकल्पाचा आवाका वाढला आहे.

revadanda

Portuguese fort at Chaul

सरखेल कान्होजी आंग्रेंचे चरित्र वाचलं होतं मागे … मनोहर माळगावकरांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा अनुवाद पु ल देशपांडेंनी झकासच केलाय … सतराव्या-अठराव्या शतकातील कोकणातल्या सुरस कथांनी भरलेलं हे पुस्तक एका बैठकीत वाचण्याचा मोह व्हावा असंच आहे. शिवरायांच्या नंतर लढलं गेलेलं मराठ्यांचं स्वातंत्र्ययुद्ध … जंजिऱ्यावर संभाजी महाराजांनी केलेली अपेशी पण जबरदस्त चढाई … इंग्लिशकालीन मुंबई … आंग्रे आरमाराचा ब्रिटिशांशी, पोर्तुगीजांशी झालेला संघर्ष यांची ओळख मला या पुस्तकाने करून दिली. कुलाब्याचा किल्ला, जंजिरा, सुवर्णदुर्ग, घेरिया ही ठिकाणे पाहत असताना इतिहासाच्या दालनात मन डोकावायला लागलं.

bhogawe

Bhogawe beach

आमच्या प्रवासवर्णनात इतिहासाची काही पाने चित्ररूपात उलगडतीलच. आणि हे करत असताना शक्य असेल तिथं समकालीन ऐतिहासिक संदर्भ वाचून, तपासून मग दृश्य-भाषा द्यायची असा आमचा निर्धार आहे. हा एक समृद्ध दृश्य अनुभव असायला हवा … पाहणाऱ्याला, वाचणाऱ्याला स्वतः कोकणची सफर केल्याची अनुभूती मिळायला हवी असा आमचा प्रयत्न आहे. मानववंशशास्त्रातील एथनोग्राफी म्हणजे संस्कृती-रेखनाची निरीक्षणात्मक पद्धत जरी आम्ही वापरत असलो तरी आमच्या कामाला सखोल काटेकोर संशोधन म्हणता येणार नाही. ठरलेल्या मार्गावर आखून केलेल्या प्रवासात संस्कृतीचे, जीव-सृष्टीचे आणि भूगोलाचे जे पैलू आम्हाला पाहता येतील त्यांचं निरीक्षण करून कॅमेराने आणि स्केचबुकवर टिपणं हे आमचं ध्येय आहे. अगदी जलदपणे फील्डवर जलरंग-शाईचे माध्यम वापरून चित्र काढायची शैली अमोल वापरणार आहे.

budhal-boys

Fishermen at Budhal

आम्हाला गोष्टी सांगायला आवडतं … अथांग समुद्राच्या साक्षीने वसलेल्या साध्या माणसांची ही गोष्ट आणि या गोष्टीत आहेत खूप खूप गोष्टी … माणसांच्या, घरांच्या, नद्यांच्या, लाटांच्या, बागांच्या … देवळांच्या … देवांच्या … व्यापाऱ्यांच्या … खूप खूप गोष्टी … सादर करत आहोत दर्या फिरस्ती …

One comment

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: