
कमानींची रांग व मागे दिसणारा बुरुज
कधीकधी आपल्या अगदी जवळ खूप खास गोष्टी, खूप खास जागा असतात … पण तिथं जाणं, तिथला इतिहास समजून घेणं आपल्याला जमतंच असं नाही घोडबंदर ही अशीच एक जागा … मी छत्रपती शिवाजी महाराजांचा चाहता …. त्यांच्या आरमाराबद्दल गजानन भास्कर मेहेंदळेंनी लिहीलेलं पुस्तक वाचताना प्रथमच जाणवलं की महाराजांच्या आरमाराची सुरुवात ही मुंबईच्या आसपास कल्याण-भिवंडीजवळ कुठंतरी उल्हास नदीत झाली आहे … या नदीच्या मुखावर वसईचा बेलाग किल्ला आहे आणि दक्षिण किनाऱ्यावर मुंबईच्या टोकावर घोडबंदरचे ठाणे … शिवाजी महाराजांच्या आरमाराची पहिली तुकडी खुल्या समुद्रात बाहेर पडली ती इथूनच असं पोर्तुगीज कागदपत्रांच्या हवाल्याने स्पष्ट होतं … या ऐतिहासिक घटनेची साक्ष असलेला घोडबंदरचा किल्ला त्याची चित्रकथा तुमच्या समोर मांडतो आहे.
कल्याणजवळ रुई व्हीएगश नावाच्या पोर्तुगीज कारागिराच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांनी गलबते बांधून घेतली … इथे जोडलेले दोन नकाशे पाहिले तर लक्षात येते की दोन्हीकडे असलेल्या वसई व घोडबंदर या पोर्तुगीज किल्ल्यांवर असलेल्या तोफांच्या नाकाखालून या नवजात आरमाराला बाहेर पडावे लागणार होते … उत्तरेचा पोर्तुगीज गव्हर्नर आणि गोवेकर पोर्तुगीज यांना जेव्हा शिवाजीच्या या प्रयत्नांची कुणकुण लागली तेव्हा या गलबतांना बाहेर पडू देता कामा नये अशी भूमिका घेण्याचं ठरलं … पण ते अंमलात आणायचं असेल तर शिवाजी महाराजांशी शत्रुत्व पत्करणं आलं … साष्टी बेटाच्या सभोवार महाराजांचे घोडदळ सज्ज होतेच … मी दंडा राजपुरीच्या सिद्दीच्या विरोधात हे आरमार उभे करत असून त्याला कोणत्याही प्रकारे त्रास होता कामा नये असा निरोप महाराजांच्या दूतांनी वसईच्या कप्तानाला पाठवला असेलच … पोर्तुगीज कागद असे दाखवतात की या शिवाजीला सौम्य शब्दांत समज देऊन प्रकरण मिटवावे अशा मवाळ भूमिकेपर्यंत वसईचे पोर्तुगीज पोचले
या ठिकाणी उल्हास नदी आणि वसईची खाडी एकत्र येतात … मराठा आरमाराच्या ३५ गलबतांना समुद्रात झेपावताना इथूनच पोर्तुगीज पहारेकर्यांनी पाहिले असावे … दुर्दैवाने घोडबंदर गावातील ही जागा आज दुर्लक्षित आहे … तिथे साचलेले प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे ढीग सिद्ध करतात की ना आपल्याला भूतकाळाची किंमत आहे ना वर्तमानाची … घोडबंदर किल्ल्याकडे गावातून जावं लागतं … मुंबईतली ही जुनी गावठाणं म्हणजे मुंबईचे वैभव …. अस्सल मुंबईकर हेच ना! मग क्रिकेट लोकप्रिय असणारच!
या गावातून टेकडीचा माथा गाठला की एका दुर्लक्षित वळणावर किल्ल्याचा बुरुज आणि त्यावर फडकणारा जरीपटका लक्ष वेधून घेतात … इथे ना पुरातत्व विभागाच्या पाट्या ना सूचना … काळाशी झुंज घेत ही वास्तू हळूहळू कोसळत चालली आहे .. या ठिकाणाला काही ग्रंथांमध्ये हिप्पाकुरा असे संबोधण्यात आले आहे आणि एकेकाळी अरब घोड्यांचा व्यापार इथून होत असे म्हणून हे घोडबंदर अशी कहाणी सांगितली जाते … आधी पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले हे ठाणे नंतर मराठ्यांनी काबीज केले आणि मराठेशाहीच्या अस्तानंतर ब्रिटिशांनी इथे कार्यालय म्हणून वावर केला … स्वातंत्र्य मिळालं आणि आपण दुर्लक्ष केलं.
पोर्तुगीज शैलीतल्या या कमानींची रांग अजूनही शाबूत आहे … त्यातून झाडांची मुळे जागा शोधत आहेत … पलीकडे एक मोठे टाके आहे ज्याला नव्या काँक्रीटचा गिलावा झालाय असं वाटलं … चर्च सारखी भासणारी मोकळी जागा आणि त्याला लागून असलेल्या अनेक हॉल्स ची रांग हेच काय ते बांधकाम आज आपण इथे पाहू शकतो
पुढे पाऊलवाटेने मुख्य बुरुज चढून गेल्यावर किल्ल्याच्या सभोवतालचा परिसर दिसतो आणि आतल्या बांधकामांचा आढावा घेता येतो … खाडीपलीकडे आजचे मीरा भाईंदर आकार घेताना दिसते आहे … बुरुजात छोट्याशा दारातून प्रवेश करावा लागतो … सन १७३८ मध्ये खंडोजी मानकराने इथे मराठ्यांसाठी बांधकाम केल्याचे उल्लेख सापडतात (वसईची – मोहीम केळकर पृ १८०)
इथे एक चर्चवजा पण मुस्लिम धाटणीची इमारत आहे … नरवणेंच्या पुस्तकात त्याला नवाबाचा राजवाडा असे म्हंटले आहे! त्याला दुरूनच नमस्कार केला आणि मार्गस्थ झालो! वसईच्या किल्ल्याची गोष्ट पुन्हा कधीतरी
Very interesting information! Never knew Shivaji Maharaj had do deal with Portuguese people. Pics are also captured well.
सुंदर माहिती. खरच आपल्याला आपल्या इतिहासाची किंमत नाही.