समुद्राच्या ओढीने भटकंती करत राहणे कोणाला आवडणार नाही? पुरातन वास्तू आणि शिल्पांच्या साक्षीने हजारो वर्षांची सैर करायला कोणाला आवडणार नाही? नारळी पोफळीच्या बागांमध्ये ओल्या मातीतून चालता चालता किरणांशी लपंडाव खेळायला कोणाला आवडणार नाही? पांढऱ्या शुभ्र वाळूच्या गालिच्यावर अनवाणी चालत राहण्याचा मोह कोणाला आवरला आहे? समुद्राची गाज ऐकणे हा आणि डोळे मिटून रात्रभर ते समुद्रगीत ऐकत राहणे हा माझा आवडता छंद … या अनुभवाच्या ओढीने कोकणात पुन्हा पुन्हा येत राहिलो … पुढे फोटो काढण्याची आवड निर्माण झाली आणि भटकंतीच्या जोडीला फोटोग्राफीचा नाद आला. २००९ च्या सुमारास रेवस ते तेरेखोल असा प्रवास बाईकवरून केला आणि मनाशी पक्के केलं की या प्रवासाची चित्रकथा लिहून काढायची. नंतरही कोकणात अनेक फेऱ्या होत राहिल्या … आयआयटी मुंबईमधील माझा मित्र अमोल ठाकूर अकोल्याचा आणि त्यालाही समुद्राचं प्रचंड आकर्षण त्यामुळे एका छोट्या असाइनमेंट साठी आम्ही कोकण हा विषय घेतला. आणि २-३ दिवसांच्या त्या दोन ट्रिप इतक्या मस्त होत्या की मग आम्ही त्याला एका प्रकल्पाचे स्वरूप देऊन व्यापक काम करायचे ठरवले.
निसर्गाने जणू आपली संपत्ती उधळून टाकावी असा इथला माहौल तर आपल्या विलक्षण साधेपणाने श्रीमंत असलेला कोकणी माणूस हा इथल्या संस्कृतीचा केंद्रबिंदू. या सगळ्या प्रवासाचे चित्रमय वर्णन करायचं असं २००६ पासून मनात आहे. कोकणावर अनेकांनी लिखाण केलं आहे. मराठी साहित्यात अजरामर झालेल्या अनेक कृतींमध्ये कोकणाची भेट घडते. अनेक प्रवासवर्णने आणि गाईडबुक आहेतच. इंटरनेटवर कोकण शोधायला गेलं तर कितीतरी ब्लॉग, व्हिडियो सापडतात. पण मग आपण वेगळं काय देणार हा प्रश्न मला अनेक दिवस सतावत होता..
असेच आम्ही आमच्या कॅम्पस मधील समीर टेकडीवर गप्पा मारत बसलो होतो आणि पवईतील आधुनिक गगनचुंबी इमारतींचा पसारा समोर दिसत होता. प्राध्यापक डॉक्टर सूरज पंडितांचे मुंबईतील गुफांवरचे पुस्तक वाचता वाचता कान्हेरी, जोगेश्वरी, मंडपेश्वर, एलिफंटा आणि महाकाली या ठिकाणच्या पुरातन गुंफांचा रोमांचक इतिहास उलगडू लागला. मुंबईला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे हे पूर्वी कधीतरी वाचले होते … पण या दोन हजार वर्षांच्या सलग प्रवासाचे अनेक साक्षीदार या गुंफांच्या रूपाने आजूबाजूला आहेत याची जाणीव नव्हती. महाकाली किंवा कोंदिवटेच्या गुंफा तर अगदी जवळच होत्या. जमिनीखाली प्रचंड मंदिर खोदून काढलेली जोगेश्वरीची गुंफाही पाहिली. हजारो वर्ष जुने ते थक्क करणारे बांधकाम पाहून इतिहासाबद्दल कुतूहल वाढायला लागले.

महाकाली गुंफा क्रमांक ८ – गौतम बुद्ध, श्रवस्तीच्या चमत्काराचा देखावा

जोगेश्वरीची शैव लेणी – सहावे शतक
भारतीय नौदलाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या मेरीटाईम हिस्ट्री सोसायटीने भारताच्या नाविक इतिहासाबद्दल अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. पेरिप्लस सारख्या पुरातन ग्रीक ग्रंथात भारतीय बंदरांचे उल्लेख आहेत … तर सात बेटांच्या मुंबईला ग्रीक भूगोल अभ्यासक टॉलेमीने हेप्टानेशिया असे नाव दिल्याचे उल्लेख आहेत. एलिफंटा म्हणजे घारापुरी बेटावर वसलेली कोकण मौर्य राजांची भव्य बाजारपेठ .. आणि डोंगर खोदून उभ्या केलेल्या शिवशिल्पांचे अद्भुत लेणे … ज्याला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा आहे. बोरिवली पश्चिमेच्या एकसर भागात सापडलेली वीरगळ पाहिली आणि एक खूपच खास असा दुवा मिळाला. वीरगळ म्हणजे लढायांमध्ये वीरगती प्राप्त झालेल्या योद्ध्यांच्या स्मरणशिळा… एकसरची वीरगळ खास कारण हजार वर्षांपूर्वी मुंबईजवळच झालेल्या सागरी युद्धाचा प्रसंग यात कोरलेला दिसतो. काही संशोधक याला शिलाहार-यादवकालीन युद्धाचा साक्षीदार मानतात .. तर डॉक्टर पंडितांच्या मते नक्की कोणत्या लढाईचा हा प्रसंग आहे याबद्दल अचूक पुरावा उपलब्ध नाही.

एकसर भागात सापडलेली वीरगळ
कोकणचे प्रवासवर्णन करणार हे ठीक आहे पण कोकणात कुठं कुठं जाणार … कोकण म्हणजे नक्की कोणता प्रदेश या प्रश्नाचं उत्तर द्यायलाही इतिहासातच डोकावायला लागलं! सह्याद्रीच्या पायथ्यापासून समुद्रापर्यंतचा कोकण प्रदेश पूर्वी अपरान्त या नावाने प्रसिद्ध असे संशोधक रा. गो. भांडारकर १८७४ मध्ये नमूद करतात. चारशे योजने लांब प्रदेश … ५०-६० हजार वर्षांपासून मानवी वस्ती आणि सम्राट अशोकाच्या काळापासूनचा इतिहास शिलालेखांच्या आधारे दिसतो असं डॉक्टर शोभना गोखले यांचं प्रतिपादन आहे. अपर म्हणजे पश्चिम आणि पश्चिमेला भारतीय भूमीचा जिथे अंत होतो ती भूमी म्हणजे अपरान्त असा कोकणाचा साधारण आराखडा आहे.
अथ घट्टम समारभ्य कोटीशस्य च मध्यमः समुद्र प्रांतदेशो हि कोकण: परिकीर्तितः (३.७.६० शक्तिसंगमतंत्र १६५०)
म्हणजे आजच्या पद्धतीनुसार पाचशे ते सहाशे किमी लांब आणि ५५-६० किमी रुंदीचा प्रदेश. रेणुकामातेचे नाव कुंकणा त्यावरून कोकण … पश्चिमेचा अंत म्हणून अपरान्त आणि बाण पडून निर्माण झालेला म्हणून इषुपात प्रदेश … अल-बेरूनी, पेरिप्लस, टॉलेमी, प्लिनी सर्वांनी कोकण हा शब्द वापरला आहे.
लोलल्लवङ्गलवलीवलया
निकुञ्जकूजत्कपिञ्जलकुला मुकुलावनद्धा
अध्यूषिरे कनकचम्पकराजिकान्ता
येनापरान्तविजये जलधेरुपान्ता:
भोज – सरस्वतीकण्ठाभरण 11 वे शतक
झुलणाऱ्या लवंगवेली आणि रायआवळी, कळ्यांनी भरलेल्या कुंजामध्ये कूजन करणारी कबुतरे आणि सोनचाफ्याच्या फुलाच्या रांगांनी शोभून दिसणारे समुद्रकिनारे अपरान्त जिंकल्यावर त्यांनी वस्ती करून उपभोगिले .. असे वर्णन या श्लोकात आपल्याला सापडते.

कान्हेरी गुफांतील सातवाहनकालीन शिल्पे
कान्हेरीच्या गुंफा इसवी सनापूर्वी १०० वर्षे बांधायला सुरुवात झाली आणि जवळजवळ पंधराशे वर्षे या गुंफा वापरात होत्या असे तज्ज्ञ मानतात. तिथं सापडलेली शिल्पं आणि शिलालेख आपल्याला आजही बरंच काही सांगतात. बुद्धाच्या उपासकांशी आपल्या मुंबईचं किती घट्ट नातं होतं याची साक्ष या गुंफा आजही देत आहेत. तेव्हाच्या लोकजीवनाचं स्वरूप कसं होतं … पोशाख कसे होते .. सौंदर्यदृष्टी कशी होती … अशा बऱ्याच प्रश्नाची उत्तरं या शिल्पांतून काही प्रमाणात आपल्याला मिळतात.

महेशमूर्ती – घारापुरी – सहावे शतक
फक्त बौद्धच नाही तर हिंदू-शैव परंपरेचा जुना वारसा कोकणाला लाभलेला आहे. अजिंठा वेरूळची लेणी दूर मराठवाड्यात असली तरीही घारापुरीची सहाव्या शतकातील लेणी कोकणातच आहेत … आणि घारापुरी तर मुंबईजवळच्या समुद्रातील रत्नच … वैतरणा नदीपासून केरळपर्यंत कोकण देश पसरला आहे असं मानतात … आपली दर्या फिरस्ती सुरु करूया घारापुरीच्या बेटावर … सहाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ब्रिटिश काळापर्यंतचा काळ पाहिलेल्या या बेटापासून … आपल्या सर्वांचा प्रवास सुखाचा होवो!