हा सुंदर लिथोग्राफ आहे रॉबर्ट प्यूझे नावाच्या एका ब्रिटिश चित्रकाराने काढलेला मुंबईतला देखावा … या जागेचे नाव आहे मॉण्टपेझीर किंवा माउंट पॉइन्सर … इथं चित्रात एक चर्चही दिसतंय … मुंबईत ही जागा नक्की आहे तरी कुठं … हे रहस्य उलगडायला आपल्याला जावं लागेल बोरिवली पश्चिमेला आयसी कॉलनी भागात … तिथं मंडपेश्वर गुफा नावाची शैव लेणी आहेत. या जागेचा इतिहास सहाव्या शतकापासून अगदी अलीकडे विसाव्या शतकापर्यंत सततच्या सत्ता संघर्षाशी जोडलेला आहे.
सर्वात आधी आपल्याला दिसतो तो ५१ फूट रुंद आणि २१फूट खोलीचा एक मंडप … ज्याच्या दर्शनी भागात चार खांब आहेत. खांबांवर असलेले कोरीव-काम नंतरच्या काळात झाले असावे असं संशोधक मानतात. या मंडपाच्या डाव्या बाजूला अजून एक छोटी गुंफा आहे जिची रचना बौद्ध विहारासारखी वाटते.
दगडात कोरलेल्या, खोदलेल्या लेण्यांच्या खांबांची गंमत अशी असते की ते भार तोलत नाहीत. केवळ सजावट या हेतूनेच त्यांची बांधणी केली जाते. मुख्य मंडपाच्या आत गाभारा आहे तिथं महिरपी तोरण असलेला दरवाजा आहे. दोन्ही बाजूला अजून दालने आहेत.
सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी कान्हेरी आणि मंडपेश्वर लेण्यांवर कब्जा मिळवला आणि आपल्या धर्माच्या प्रचाराचे काम इथून सुरु केलं. या भागातला महसूलही आता चर्चच्या तिजोरीत भर टाकू लागला. या चित्रात दिसणारा क्रॉस ही फिरंग्यांचीच कामगिरी. इथल्या शिल्पांची नासधूस केली गेली. काही शिल्पं भिंतीत चिणून व प्लास्टर घालून झाकली गेली आणि नटराज मूर्तीच्या समोरच्या भागात भिंत घालून नवा अल्टार बनवला गेला. गुंफेच्या छतावर मॉनेस्ट्री बांधण्यात आली. नीट पाहिल्यास या क्रॉसच्या वर उजव्या कोपऱ्यात आपल्याला उडत्या गंधर्वाप्रमाणे भासणारे एक शिल्प दिसते.

Lion
मंडपाच्या पायऱ्यांना शान देतात दोन सिंह … आता ते जरी भग्न झालेले असले तरीही त्यांचे पंजे छान कोरलेले दिसतात. आम्ही या लेण्यात गेलो तेव्हा सभामंडपात काहीजण भजन कीर्तनात गुंग झाले होते.
पूर्वी पोर्तुगीजांनी नासधूस केली आणि आता पूजा अर्चा करण्याच्या नावावर भक्त लोक या पुरातन शिल्पांची झीज लवकर होईल अशा गोष्टी करत आहेत. तेल आणि शेंदूर फासून शिल्पं काळसर आणि चिकट होत आहेत … कमकुवत खडकावर सळई लावून घंटा टांगल्या गेल्या आहेत.

Lakulisha
इथं लकुलीश रूपातील शिवाची मूर्ती होती त्याजागी क्रॉस आला. पण कमळाच्या रचनेची बैठक आणि तिला तोलून धरणारे नाग सेवक या शिल्पाचे लक्षण स्पष्ट करतात. अर्थात अंधारात आणि तेलाच्या काळसर चिकट पट्टयामुळे हे लक्षात यायला फारच निरखून पाहावं लागतं.

Carved column capital
अनेक खांबांवर अतिशय सुंदर कोरीवकाम आहे पण सगळं नीट दिसत नाही. आशा करूया की निधी उपलब्ध होईल आणि मग सगळं स्वच्छ लखलखीत झालेलं पाहण्याची संधी आपल्याला मिळेल.

Shiva as Natesha
इथलं नटेश शिल्पं किंवा नटराजाचं शिल्प खूप मोहक आहे. शैलीचा विचार केला तर मला ते एलिफंटा आणि जोगेश्वरी लेण्यांच्या खूप जवळचं वाटतं. तांडव करणाऱ्या शिवमूर्तीला ब्रम्हा, विष्णू, कदाचित इंद्र आणि इतर यक्ष-गंधर्व सोबत देत आहेत असं दिसतं. गणेशाची मूर्तीही खूप सुंदर आहे.

Plan of Mandapeshwar (Cultural Heritage of Mumbai – M K Dhavalikar)
इथं आराखड्यात दिसणाऱ्या तुटक रेषेच्या ठिकाणी भिंत आणि अल्टर बांधण्यात आलं होतं. १९२० च्या सुमारास घेतलेल्या फोटोमध्ये ते दिसते. पुढे ते काढलं गेलं आणि कोर्टबाजीनंतर १९६०च्या सुमारास हे शिल्पं आणि तिथली जमीन पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारीत आली असं समजतं . वसईला चिमाजी अप्पाने पोर्तुगीजांचा पराभव केल्यानंतर इथून रोमन कॅथलिक चर्चचंही उच्चाटन झालं आणि कदाचित नंतर ब्रिटिशांच्या काळात हे पुन्हा चर्च झालं. आज ते मंदिर आहे.
इथला अग्निजन्य किंवा जांभा खडक इतका नाजूक असतो की त्यात शिल्पं खोदून काढणं हे किती जिकिरीचं आणि कौशल्याचं काम असेल हे कल्पनेच्या पलीकडचं आहे… आणि ते सुद्धा सहाव्या शतकात याला मूर्त स्वरूप देणं ही कमालच मानली पाहिजे. इथलं सर्व अतिक्रमण काढून… पूजा अर्चनेला शिस्त लावून इथल्या शिल्पांना त्यांची मूळ झळाळी मिळेल असं काम व्हायला हवं.
पी अँटोनियो दि पोर्टोने इथं रोमन कॅथलिक मठ सुरु केला होता. त्याची रचना गुंफेच्या छतावर करण्यात आली. ते अवशेष आजही पाहता येतात. इथल्या चर्चचं समर्पण नोट्रे दाम ला मिसरीकोड ला करण्यात आलं आणि राजा डॉम तिसरा याने या बांधणीला आश्रय दिला अशी नोंद सापडते. यानंतर एलिफंटाच्या रचनेला प्रेरणा देणाऱ्या जोगेश्वरी लेण्याला भेट देऊ … या भ्रमंतीच्या ब्लॉगवर जरूर येत रहा. ही तुम्हा सर्वांना कळकळीची, आग्रहाची आणि अगत्याची विनंती.
Good imnformation on Mandapeshwar Cave Temle
खुप छान माहिती. पण संदर्भ कुठून घेतला माहिती साठी कळू शकेल म्हणजे मला ही अभ्यासाला आधिक उपयुक्त ठरेल😊
छान माहिती. मंडपेश्वरसंबंधी प्रथमच अशी माहिती वाचतो आहे.