मुंबईचा डॉन कोण? हा प्रश्न भिकू म्हात्रेने इतिहासकारांना किंवा पुरातत्व अभ्यासकांना सतराव्या शतकात विचारला असता तर कदाचित त्यांनी जेराल्ड ऑंजिअरचं नाव घेतलं असतं. आणि या डॉनची गंमत अशी की यानेच मुंबईच्या पोलीस दलाची स्थापना केली असं म्हणता येईल. मुंबईचे जुने रहिवासी भंडारी समाजाचे लोक … त्यांच्यापैकी ६०० जणांना प्रशिक्षित करून स्थापलेलं दल भंडारी मिलिशिया … ज्याचं रूपांतर पुढे मुंबई पोलिसमध्ये झालं. या दलाची स्थापना झाली तेव्हा त्यांचं प्रशिक्षण मुंबईत कुठं बरं झालं असेल? नोव्हेंबर अर्धा संपला आहे आणि मुंबईत हळूहळू थंडी पडायला लागली आहे तेव्हा एखादी सकाळ टाइम मशीनच्या प्रवासाला काढायला हरकत नाही. मुंबई किल्ल्यांचं शहर आहे तेव्हा आजची दर्याफिरस्ती करूया सायनच्या दुर्गात …
मुंबई बंदर राखणाऱ्या इंग्लिशांनी या शहराचं आजचं स्वरूप घडवण्यात मोठा हातभार लावला … तसं करणं ही तेव्हाच्या इंग्लिश राष्ट्राची गरजही होतीच. एके काळी शिलाहार राजांनी वसवलेल्या या शहराची परिस्थिती पंधराव्या-सोळाव्या शतकापर्यंत बिघडत गेली होती. पुढे जरी मुंबई बंदर जागतिक व्यापाराचं एक केंद्र बनलं, सुबत्ता आणि ब्रिटिश सत्ता इथं कालांतराने नांदू लागल्या तरीही ऑंजिअरच्या आधी इथला कंपनीचा कारभार बजबजपुरीचा होता. साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव आणि खाजणाचा प्रदेश त्यामुळे इथं नेमणूक होणं या गोष्टीला ब्रिटिश अधिकारी शिक्षाच समजत असत. ऑंजिअर इथं १६६२ CE मध्ये प्रथम आला असावा असं जेम्स डग्लस मानतो. हे बेट पोर्तुगीज राजकन्या कॅथरीन ब्रागांझाच्या विवाहात ब्रिटिशांना आंदण मिळाले होते … ब्रिटिशांना साष्टी व मुंबईचा ताबा हवा होता पण पोर्तुगीज तयार होत नव्हते. पुढं मुंबई बेटाचा ताबा हंफ्री कुकने घेतला आणि हळूहळू शीव, धारावी, माहीम परिसरही ब्रिटिशांच्या ताब्यात आला. आजच्या दक्षिण मुंबईत बॉंबे कॅसलचे काम जोमाने सुरु झाले. १६६४ CE मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली सुरतची दैना ब्रिटिशांनी पाहिली होती त्यामुळे त्यांना आता सुरतपेक्षा सुरक्षित व्यापारी ठाणे हवेच होते.

The British Fort of Bombay – painting by Philippus Baldeus (1632-72)
ऑंजिअरने इथं बाजारपेठा, उद्योगधंदे यांना प्रोत्साहन देऊन धनाढ्य व्यापारी लोकांना बोलावून घेतलं. मुंबई बेटाची लोकसंख्या आता दहा हजारांवरून तब्बल साठ हजारावर जाऊन पोहोचली. भीमजी पारेख नावाच्या माणसाने इथं छापखाना सुरु केला (छत्रपती शिवाजी महाराजांनी याच माणसाच्या मदतीने स्वराज्यातही छापखाना सुरु करण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नसावा असं दिसतं) मुस्लिम, हिंदू आणि पारशी अशा तीन भिन्न समाजांना एकत्र आणायचे कसे याचा अगदी सोपा उपाय ऑंजिरअरने इथल्याच संस्कृतीतून घेतला … तो म्हणजे पंचायतींना मान्यता देण्याचा …
पुढे १६७२ मध्ये सिद्दी याकूतखानाने मुंबई बेटावर धाड घातली … लूटमार.. जाळपोळ केली त्याचा धसका घेऊन आणि भविष्यात मराठ्यांच्या आक्रमणाची शक्यता घेऊन इंग्लिशांनी सगळ्या खाड्या आणि बंदरांवर कोटांची तटबंदी बांधायला सुरुवात केली. परळच्या बेटावरून पोर्तुगीजांच्या सीमेवर आणि साष्टी बेटावर लक्ष ठेवण्यासाठी सायनच्या किल्ल्याची जागा योग्य होती आणि अशाप्रकारे सतराव्या शतकाच्या शेवटी ब्रिटिशांनी सायनचा किल्ला बांधायला घेतला. डॉ मिलिंद पराडकर या दुर्ग अभ्यासकांच्या मते या किल्ल्याच्या बांधणीत स्थानिक मूल्यांवर युरोपियन शैलीचा प्रभाव दिसतो.
सायन रेल्वे स्टेशनपासून अर्धा किलोमीटर अंतरावर किल्ल्याच्या पायथ्याशी नेहरू उद्यान आहे. तिथूनच बांधलेल्या दगडी पायऱ्यांच्या रस्त्यावरून आपल्याला माथा गाठता येतो. परिसर स्वच्छ आहे पण भिंतींवर नावं कोरणे, तोडफोड करणे असल्या गोष्टींमुळे झपाट्याने या वास्तूची पडझड होते आहे. माथ्यावर पोहोचले की दरवाजाच्या जवळ पाण्याच्या टाक्याप्रमाणे बांधलेला खंदक दिसतो.
किल्ल्याचे भग्नावशेष त्याच्या जुन्या रचनेची काहीशी कल्पना देतात. आज साष्टी आणि मुंबईचे परळ बेट यांच्यामध्ये अंतर उरलेले नाही. परंतु सतराव्या शतकात खाडीत आणि खाडीपलीकडे चालणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवायला हे ठिकाण उत्तम होते.
ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर मिलिंद पराडकरांनी मुंबईतील किल्ल्यांबद्दल लिहिताना शिवाजी महाराजांचे आकलन कसे होते याचा दाखला देणारा रामचंद्रपंत अमात्याने नोंदलेला आज्ञापत्रातील उतारा शेयर केला आहे तो वाचण्याजोगा आहे … काय म्हणतात छत्रपती शिवाजीमहाराज ते पाहू …
सावकारांमध्ये फिरंगी, इंगरेज, वलंदेज, फरासीस, डिंगमारादी टोपीकर हे ही लोक सावकारी करितात. परंतु ते वरकड साहुकारांसारिखे नव्हेत. त्यांचे खावंद प्रत्यक प्रत्यक राज्यच करितात. त्यांचे हुकमाने त्यांचे होत्साते हे लोक या प्रांती साहुकारीस येतात. राज्य करणारास स्थळलोभ नाही असे काय घडो पाहाते? तथापि टोपीकरांचा या प्रान्ते प्रवेश करावा, राज्य वाढवावे, स्वमते प्रतिष्ठावी हा पूर्ण अभिमान. तदनुरूप स्थळोस्थळी कृतकार्यही झाले आहेत. त्याहीवरी ही हट्टी जात. हाती आले स्थळ मेलियाने सोडावयाचे नव्हेत. यांची आमदरफ्ती आले गेले ऐसीच असो द्यावी… वखारीस जागा देणे झाले तरी खाडीचे सेजारी समुद्रतीरी न द्यावा. तैसे ठायी जागा दिधल्यावरी आपले मर्यादेने आहेत तो आहेत, नाही ते समयी आरमार, दारूगोळी हेच यांचे बळ. आरमार पाठीशी देऊन त्याचे बळे त्या बंदरी नूतन किल्लाच निर्माण करणार. तेंव्हा तितके स्थळ राज्यातून गेलेच. याकरिता यांस जागा देणेच, तरी खाडी लांब, गांव दोन गांव राजापुरासारखी असेल तेथे द्यावी… इमारतीचे घर यांस बांधो देऊ नये. याप्रकारे राहिले तर बरे नाही तर त्याविणे प्रयोजन नाही…
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालयात जुन्या मुंबईची अनेक सुंदर चित्रे आहेत …. त्यातील मला खूपच भावलेलं चित्र म्हणजे मेजर पूजेने रेखाटलेले माहीमच्या किनाऱ्याचे चित्र. माहीम, वांद्रे, शिवडी, वरळी असे अजून किल्ले आपल्याला पाहायचे आहेत … त्यांच्या इतिहासाचा मागोवा घ्यायचा आहे … वाचत रहा दर्या फिरस्ती …