
काही अनुभव इतके अभूतपूर्व असतात की त्यातून आयुष्यभर पुरेल अशा आठवणींचे संचित निर्माण होत असते. दापोलीजवळ आसूद इथं डोंगरावर असलेल्या केशवराज मंदिराला मी प्रथम गेलो १५-१६ वर्षांचा असताना. नारळ सुपारीच्या बागांतून सूर्यकिरणांचे कवडसे अंगावर घेत डोंगर उतरून जाणे आणि मग साकव पूल ओलांडून पुन्हा टेकडी चढणे. त्या नीरव निसर्गविश्वात खळाळणारे पाणी असो किंवा पक्ष्यांची किलबिल असो. एक एक आवाज स्पष्ट आणि मनाला भिडणारा. अचानक समोर पायवाटेवर कसलीतरी सळसळ जाणवावी आणि चपळाईने पळत गेलेलं मुंगूस दिसावं सभोवताली पाहावं तर हिरव्या रंगाच्या हजारो छटांची उधळण. निसर्गाच्या या वैभवाचा आनंद घेत टेकडी चढली की अचानक समोर येतं हे मंदिर.

आसूदबाग या ठिकाणाजवळ भातखंडी नदी ओलांडली की पुढची वाट ही १५० ते २०० पायऱ्यांची आहे. थोडी थकवणारी असली तरीही मंदिराचा परिसर थंडगार सावलीचा असल्याने श्रमपरिहार लगेचच होतो. मंदिरामागे झरा आहे त्याला बाराही महिने पाणी असते. ते खरंखुरं मिनरल वॉटर गोमुखाने मंदिरात येते. ते ओंजळीतून प्यायचे आणि तृप्तीचा अनुभव घ्यायचा.
काश्यप गोत्रातील बिवलकर, दारशेतकर … कौशिक गोत्रातील देवधर, ढमढेरे … वसिष्ठ गोत्रातील कान्हे, ओजळे, कोंकणे, दातार, पर्वते, वर्तक, वैद्य, दांडेकर … शांडिल्य गोत्रातील राजवाडे, दातार, राशिवडे अशा कुटुंबांचे केशवराज हे कुलदैवत मानले जाते. त्यामुळे इथं भाविकांची गजबजही असतेच. मंदिरातील धीरगंभीर केशवराजाला नमस्कार करून काही क्षण सभागृहात शांत बसून ध्यानस्थ व्हायचे.

मंदिराचे दगडी बांधकाम सुमारे दोनशे ते अडीचशे वर्षे तरी जुने असावे असे वाटते. इथं असलेली गणेशमूर्ती, द्वारपालाचे शिल्प, समया या सगळ्या गोष्टी निरखून पाहाव्यात अशा आहेत.
दर्शन घेऊन परत येताना दाबकेंच्या वाडीत थंडगार कोकम आणि घरगुती जेवणाचा आवर्जून आनंद घ्यायला हवा. कोकणात अनेक ठिकाणी अतिशय सुंदर विष्णुमूर्ती आहेत. त्यापैकी बऱ्याच मूर्ती दापोलीच्या आसपासच्या भागातच आहेत. शेडवईचा श्री केशरनाथ, टाळसुरेची केशवमूर्ती, सडवे गावची ८१५ वर्षे जुनी मूर्ती, चिखलगाव चा लक्ष्मीकेशव, पंचनदीच्या सप्तेश्वर मंदिरातील विष्णुमूर्ती अशी अनेक उदाहरणे देता येतील. या सर्व जागा आवर्जून वेळ काढून पाहाव्या अशा आहेत. अशी ठिकाणे डोळस, जबाबदार, कुतूहल असलेल्या पर्यटनांपर्यंत पोहोचवणे हाच आमच्या दर्या फिरस्ती ब्लॉगचा प्रयत्न आहे.
खूप सुंदर आहे केशवराज चा परिसर. आणि गोमुखाचे पाणी म्हणजे अमृत
khuapach mahitipurna lekh ani adbhut sthal. Dhanyawad !
आमचेच गाव आसूद. पण फारवेळा जायचा योग नाही आला. दोन वेळा उत्सवाला हजर राहून आनंद घेता आला. रम्य परिसर, फणसासारखी विशाल, गोड माणसांची अनुभूतीच्या हृद्य आठवणी आहेत.
तिथं दाबके यांच्याकडे मी न्याहारी केली आहे
amazing….nicely written and thanks for sharing….