
रत्नागिरी शहरातील रत्नदुर्ग किल्ल्यावरून दोन्ही बाजूला दोन किनाऱ्यांचे दर्शन घडते. एका बाजूला काळा समुद्र आहे तर दुसऱ्या बाजूला पांढरा समुद्र. या किनाऱ्यांना हा रंग तिथल्या वाळूमुळे मिळालेला आहे. आणि वाळूचा रंग त्यात असलेल्या विविध खनिजांच्या प्रमाणावर अवलंबून असतो. रत्नागिरीच्या उत्तर टोकाला असलेला पांढरा समुद्र म्हणजे स्वच्छ नितळ पाणी, मखमली पांढरी वाळू आणि अथांग निळे आकाश यांचा मनसोक्त अनुभव घेण्याची जागा. इथं उभं राहून एका बाजूला नारळाच्या बागा दिसतात तर दुसऱ्या बाजूला रत्नागिरी बंदरातील रहदारी आणि रत्नदुर्गाचा डोंगर दिसतो.

चंद्रकोरीप्रमाणे आकार असलेल्या पुळणीवरून चालताना सागराच्या शुभ्र फेसाळत्या लाटा पावलांना अलगद स्पर्श करून जातात. मासेमारी करून परतलेल्या कोळी बांधवांच्या होड्या किनाऱ्यावर ठेवलेल्या असतात. एखाद्या होडीला ती खवळलेल्या समुद्रात डुचमळू नये म्हणून संतुलन देणारा आधार लावलेला दिसतो. वल्ही, मासे पकडण्याची जाळी ठेवलेली दिसतात. आकाश निरभ्र असेल तर अगदी रत्नदुर्गावरील भगवती मंदिराचे शिखरही दिसतं. दुसऱ्या बाजूला दूर मिऱ्या डोंगराचे दर्शन घडते. हिवाळ्यातील एखाद्या सकाळी अनवाणी पावलांनी इथं फेरफटका मारताना वेळ अगदी निवांत जातो. इथल्या किनाऱ्यावर समुद्र गर्जना करत नाही. शांतपणे एका लयीत साद घालत राहतो. रत्नागिरी शहरातच हा किनारा असला तरीही गर्दी नाही, कोलाहल नाही, गोंगाट नाही, खाण्यापिण्याच्या गाड्यांची गर्दी नाही असा इथला अनुभव असतो. कोकणातील समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य हे असेच सुरक्षित राहो असं वाटत राहतं. दर्या फिरस्ती ब्लॉगच्या माध्यमातून रेवस ते तेरेखोल किनारपट्टीवरील १२५ समुद्र किनाऱ्यांची चित्रभ्रमंती आम्ही करतो आहोत. तेव्हा या ब्लॉगला भेट देत रहा हे अगत्याचे आमंत्रण.