
कोकण किनारपट्टीवर अनेक ऐतिहासिक बंदरे आहेत. हजारो वर्षांच्या इतिहासात व्यापार आणि उद्योजकतेचे आणि त्याबरोबर येणाऱ्या राजकीय संघर्षाचे साक्षीदार असलेले किल्ले, लेणी, बंदरे आपण आजही कोकणात पाहू शकतो. नेहमीच्या पर्यटनापलीकडे जाऊन डोळसपणे पाहण्याची मात्र आपली तयारी असली पाहिजे. मुंबईपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर आहे चौल-रेवदंडाचा सागरतीर आणि दक्षिण दिशेला कुंडलिका नदीचे मुख आणि त्याच्या पलीकडे असलेला डोंगरावरील पोर्तुगीज कोर्लई किल्ला. सागरी महामार्गाने अलिबागहून सुमारे १८-२० किलोमीटर दक्षिणेला गेलं की आपण चौलला पोहोचतो. चौलच्या नारळ सुपारीच्या बागा या परिसरावर मायेची सावली धरून आहेत. या माडांच्या बनात लपलेला आहे पोर्तुगीजांचे बलाढ्य ठाणे असलेला किल्ला. किल्ल्याच्या उत्तर तटाला लागून जिथं डांबरी रस्ता किल्ल्यात शिरतो तिथंच जवळ किल्ल्याचे दार आहे.
किल्ल्याच्या पश्चिमेला आणि दक्षिणेला रेवदंड्याचा समुद्रकिनारा आहे… पूर्वेला खाजण आहे आणि उत्तरेला चौल गाव आहे. या ठिकाणचे प्राचीन नाव रेवतीतीर्थ असे होते. बलरामाची पत्नी रेवती हिचे हे स्थान. ह्युएन त्सांग, मसूदी, टॉलेमी अशा विविध विदेशी पर्यटकांनी चौलच्या प्राचीन बंदराचा उल्लेख त्यांच्या लिखाणात केलेला आढळतो. अबू रिहान अल बिरूम असं सांगतो की ठाण्याच्या दक्षिण दिशेला चौल जैमूर नावाचे उत्कृष्ट बंदर आहे. इद्रीसीच्या ११५३ सालच्या नोंदीत इथं नारळाची अनेक झाडे असलेलं नियोजित शहर आहे असा उल्लेख आढळतो. पुढे १६३५ मध्ये सादिक इफ्शाहानी च्या लेखनातही चौलचा उल्लेख सापडतो. इथं चाफ्याची झाडे होती म्हणून किंवा बौद्ध राजा चंपा याने वसवलेले शहर म्हणून या जागेला चंपावती या नावानेही ओळखले जात असे. कान्हेरी येथील शिलालेख, पेरिप्लस मध्ये सेमुल्ला म्हणून इसवीसन २४७ मध्ये केला गेलेला उल्लेख या ठिकाणचे प्राचीनत्व सिद्ध करतात. उत्तर शिलाहारांतील राजपुत्र झंझ इथं शासन करत असल्याचा आणि इथं अतिशय समृद्ध बाजारपेठ असल्याचा उल्लेख मसूदीने केलेला आहे. उत्तर शिलाहारांच्या नंतर देवगिरीचे यादव, मग खिलजी सत्ता, काही काळासाठी विजयनगर आणि मग शेवटी १३५७ मध्ये बहामनी साम्राज्य अशा विविध सत्तांचे चौलवर नियंत्रण होते. १३८० च्या सुमारास फेरिश्ता या प्रवाशाने चौल बहमनी राज्यातील महत्त्वाचे बंदर असल्याचे वर्णन केले आहे. अफनासी निकितीन या रशियन प्रवाशानेही चौलचा उल्लेख केला आहे (या प्रवाशाच्या भारतभेटीचे स्मारक म्हणून रेवदंड्यात एक स्तंभही उभारला गेला आहे) १५०५ मध्ये इथं पोर्तुगीजांचे आगमन झाले. इथल्या मुस्लिम आणि अरब मुस्लिम सत्ता एकत्र आल्या आणि पोर्तुगीजांना विरोध करू लागल्या. १५०८ च्या अखेरीस अमीर हुसेन या फारसी दर्यासारंगाच्या अधिपत्याखाली इजिप्तचे नौदल आणि गुजरातचा सरदार मलिक इयाझ च्या नौदलाने पोर्तुगिजांचा चौलला दारुण पराभव केला त्यात पोर्तुगीज व्हाइसरॉयचा मुलगा डॉम अल्मिडा ठार झाला. त्यानंतर १५०९ मध्ये मात्र पोर्तुगीजांनी या मुस्लिम युतीची दीवजवळ दाणादाण उडवली आणि त्यांचा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर जम बसू लागला. चौल हे सुरत आणि गोवा यांच्यामध्ये असलेले एक महत्त्वाचे बंदर होते. कोची बंदर, होर्मूझ, खंबायत, मस्कत, चीन अशा विविध ठिकाणांशी चौलचे व्यापारी संबंध होते. निजामशाहीने पोर्तुगीजांना इथं बरीच मोकळीक दिली. खजूर आणि घोड्यांचा व्यापार वाढला. वास्को दि गामा त्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भारत भेटीत चौलला आल्याचे उल्लेख आहेत. १६५७-५८ च्या सुमारास वरचे चौल म्हणजे चौलचा उत्तर भाग छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला आणि रेदवंड्याचा कोट तेवढा पोर्तुगीजांकडे उरला.
छत्रपती संभाजी महाराजांनी चौल जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु पोर्तुगीजांनी चिवट प्रतिकार केला आणि तोफांची सरबत्ती सुरु ठेवली. इथं कुमक जमा करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी राजकोट नावाचा किल्ला बांधला असे इतिहासकार मानतात. पुढे वसईच्या पराभवानंतर पोर्तुगीजांना चौल मराठ्यांच्या ताब्यात द्यावे लागले. इथला कापड उद्योग पुढं तितकासा चालला नाही आणि अनेक कारागीर मुंबईला गेले. मुंबई बंदर आता वेगाने प्रगती करू लागले होते. चौलवाडी नावाच्या ठिकाणी मुंबईत ही मंडळी स्थायिक झाली आणि चौल हळूहळू इतिहासाच्या पडद्यामागे गेले. आज कोकणातील एक रम्य गाव म्हणून चौल सर्वांना परिचित आहे. इथं पोर्तुगीजांचा आगरकोट, मराठ्यांचा राजकोट, रामेश्वर मंदिर, चौलची लेणी, दत्त मंदिर, हिंगुलजा मातेचे मंदिर, कलावंतिणीचा महाल, आसा मशीद, हमामखाना अशी अनेक ठिकाणे आहेत. दर्या फिरस्तीच्या प्रवासात आपण ती नक्कीच पाहणार आहोत.
संदर्भ –
१) कुलाबा जिल्हा गॅझेट
२) Portuguese Sea Forts Goa with Chaul, Korlai and Vasai – Amita Kanekar – published by Jaico, funded by the Deccan Heritage Foundation
3) Notes on history and antiquities of Chaul & Bassein – Jose Gerson Da Cunha
खूप छान माहिती मिळाली. धन्यवाद.
उत्तम आणि सहसा, सहज उपलब्ध नसलेली माहिती.. छान शब्दांकन.. धन्यवाद!