काही ठिकाणांचं भाग्य फार मोठं असतं.. इतिहासाच्या पानांवर महत्वाची जागा या ठिकाणांनी मिळवलेली असते .. परंतु या ठिकाणांची महती पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि मग ती ठिकाणे विस्मरणाच्या पडद्याआड गडप होत जातात. मग एखादा दर्दी भटक्या त्या ठिकाणची वाट शोधून काढतो, तर कोणी इतिहास अभ्यासक विविध साधनांतून या ठिकाणांचा इतिहास उजेडात आणतो. आणि मग त्या ठिकाणाशी संलग्न घटनांच्या रंजक गोष्टी समोर येतात.. कोकण किनारपट्टीवरील असेच एक ठिकाण म्हणजे सामराजगड. मुरुडजवळ असलेला सिद्दीचा जंजिरा किल्ला अनेकांना ठाऊक आहे. आपल्या उंदरासारख्या उपद्रवकारक शत्रूवर वचक ठेवायला बांधलेला पद्मदुर्गही हळूहळू लोकांच्या परिचयाचा होतोय. पण मुरुडच्या दक्षिणेला असलेल्या एकदरा गावातील सामराजगड अजूनही पर्यटनकांच्या यादीवर आलेला नाही. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी सिद्दीच्या विरुद्ध केलेल्या अनेक मोहिमांचा साक्षीदार असलेला हा छोटासा दुर्ग मराठ्यांच्या इतिहासातील एक मानकरी आहे.

मुरुड गावचा समुद्रकिनारा ओलांडून दक्षिण टोकाला आले की एकदरा खाडीवरील पूल येतो. आदल्या दिवशी मुरुड-जंजिरा आणि पद्मदुर्ग किल्ल्याचे दर्शन करून झालं होतं त्यामुळे पहाटेच पुढं निघालो होतो. सामराजगड शोधून मग पुढं कुडे मांदाडच्या दिशेने जायचं असा बेत होता. मुरुडमधील विवेक मसाल यांच्या होम स्टे मध्ये छान आराम झाला होता.. वाफाळलेला चहा घेऊन गाडी काढली आणि एकदरा पुलावर आलो तेव्हा खाडीत आळोखेपिळोखे देत नांगरून पडलेल्या बोटी आणि नुकताच उगवून नारळीच्या बागांच्या वर आलेला सूर्यनारायण असा अद्वितीय देखावा पाहायला मिळाला.

एकदरा गाव हे कोळ्यांचे गाव.. तिथं चौकशी केली तर सुरुवातीला कोणी इथं किल्ला आहे हे सांगेचना.. मग विडी ओढत बसलेले एक आजोबा दिसले.. त्यांना विचारलं की सामराजगड आहे कुठं.. तरी कळेना.. मग म्हंटलं इथं डोंगरावर काय आहे.. किल्ला आहे का.. तेव्हा आजोबा म्हणाले की शिवमंदिराच्या मागे पायवाट आहे ती सरळ वर घेऊन जाईल तिथं काही जुने बांधकाम सापडेल… गुगल मॅपवर मला तेच ठिकाण दिसले होते त्यामुळे आजोबांनी सांगितलेल्या वाटेने वर चढत निघालो. सुमारे मीटर किंवा फूट उंच ही चढण चढायला १५ मिनिटे लागली असावीत.

शिवमंदिराच्या टप्प्यावर आलो होतो तेव्हा उत्तरेकडे मुरुड गाव, मुरुडचा किनारा आणि किनाऱ्याला समांतर पसरलेली बागायती असं मोहक दृश्य पाहायला मिळालं. कॉलेजमध्ये असताना इथं माझी एम८० घेऊन अनेकदा आलो होतो. गेल्या २० वर्षांत इथं हॉटेल्सची भर पडली आहे खरं पण तेव्हा जी शांतता इथं अनुभवली ती पुन्हा अनुभवायला मिळेल का मला ठाऊक नाही.

व्यंकोजी दत्तो यांनी दंडा-राजपुरी आणि आसपासचा प्रदेश काबीज करून इथं किल्ला बांधला. यावर सिद्दीने हल्ला केला पण त्याची जवळपास ३०० माणसे मारली गेली आणि पराभव झाला.. आसपास झाडांवर तोफा चढवून हल्ल्याचा प्रयत्नही नुकसान भोगून फसला. टेकडीच्या माथ्याजवळ पोहोचलो तेव्हा समोर भग्न तटबंदी दिसली. जंजिऱ्याच्या सिद्दीचा निःपात करण्यासाठी पेशवे शामराज नीलकंठ यांची नेमणूक झाली होती. त्यांच्या नावाने हा किल्ला ओळखला जातो असे दिसते. त्यानंतर ११ फेब्रुवारी १६७१ रोजी सिद्दीने होळीच्या दिवशी निकराचा हल्ला केला. जमिनीकडून सिद्दी खैरीयत आणि होड्या घेऊन आलेला सिद्दी कासीम यांनी रात्री तुफान आक्रमण केले. होळीच्या सणात व्यस्त आणि काहीसे गाफील असलेले मराठे या हल्ल्याच्या झंझावाताने चकित झाले पण प्राणपणाने लढू लागले. पण दारू कोठाराचा स्फोट होऊन मराठ्यांच्या वाट्याला पराभव आला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्दीवर सतत लष्करी हल्ल्याचे दडपण आणले. त्याची आर्थिक नाकाबंदी केली. पोर्तुगीज आणि इंग्लिशांनी मात्र वेळोवेळी सिद्दीला मदत करून मराठ्यांच्या शत्रूला जीवित ठेवले. एकदा सिद्दीकडं पगार देण्यासाठी पैसे नव्हते तेव्हा त्याला धन पुरवले. अन्नधान्य आणि दारुगोळा पुरवला जातच होता. १६६८ मध्ये सिद्दीने पोर्तुगीजांचे मांडलिकत्व पत्करले. पोर्तुगीज-सिद्दी युतीला शह म्हणून मस्कतच्या इमामाशी शिवरायांनी संधान बांधलेले दिसते. १६६९ मध्ये अरबी जहाजांचा पाठलाग करत पोर्तुगीज नौदल आले तेव्हा या अरबी जहाजांनी संगमेश्वर च्या खाडीत आश्रय घेतला. नोव्हेंबर १६६९ मध्ये गव्हर्नर अँटोनी बॉईश द सांद याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची तुलना हूण सेनापती एटिला शी केली आहे..

पुढे सिद्दीला औरंगजेबाची दुवा मिळाली. आपल्या डोक्यावर कुराण घेऊन औरंगजेबाला सिद्दी भेटायला गेला आणि मुघल आरमाराचे नेतृत्व पदरात पाडून आला. १६७२ मध्ये मुघली आरमाराच्या ३६ बोटींच्या ताफ्याने मराठा मुलखात बरीच जाळपोळ केलेली दिसते. नंतर १६७३ मध्ये सिद्दी संबूलने पेण आणि नागोठणे परिसरात जाळपोळ, लुटालूट केली, अनेकांना गुलाम केले. १६७४ मध्ये मुचकुंदी नदीत संबूळ आणि दौलतखान यांच्या आरमारात संघर्ष झाला आणि मराठ्यांनी विजय मिळवला. १६७४ ते १६७८ या काळात महाराजांनी जवळजवळ दरवर्षी सिद्दीविरुद्ध मोहीम राबवली. एकदा तर अलिबागच्या लाय पाटलाने जंजिऱ्याच्या तटाला रात्री शिड्या नेऊन भिडवल्याही पण वेळेत कुमक न आल्याने पेशवे मोरोपंत पिंगळे यांना अपयश आले. या पाटलाला शिवरायांनी पालखी नावाचे गलबत देऊन सन्मानित केले. पुढं छत्रपती संभाजी राजेंनी कोंडाजी फर्जंद यांना छुप्या मोहिमेवर किल्ल्यात पाठवले पण तो कट फसला.

जंजिऱ्याला समुद्राचे संरक्षण म्हणून राजपुरीच्या खाडीवर सेतू बांधायचे कामही छत्रपती शंभू राजेंनी सुरु केले होते. दुर्दैवाने मुघलांनी त्याच काळात मोठं आक्रमण केल्याने वेढा दादाजी रघुनाथ देशपांडेंकडे सोपवून छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांच्या विरोधात उत्तरेकडे जावे लागले. आजचे राजपुरी गाव तिथेच वसलेले आहे. अशा चिवट शत्रूवर वचक हवा म्हणून शिवरायांनी समोर कांसा खडकावर पद्मदुर्ग बांधून घेतला.