ओळख आणि इतिहास
अंदमान म्हंटलं की दोन गोष्टी प्रामुख्याने डोळ्यासमोर येतात.. समुद्राच्या सान्निध्यात अनुभवायला मिळणारं अद्भुत निसर्ग सौंदर्य आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी मंडळींनी जिथं अनन्वित नरकयातना भोगल्या ते सेल्युलर जेल कारागृह. अंदमान आणि निकोबार हे दोन मोठे द्वीपसमूह आहेत. जिथं सुमारे ५७० बेटं आहेत आणि त्यापैकी ३७ बेटांवर लोकवस्ती आहे. पश्चिमेला बंगालचा उपसागर, पूर्वेला थायलंड आणि म्यानमारचा किनारा आणि दक्षिणेला इंडोनेशियातील सुमात्रा बेटाचे उत्तर टोक असा हा बेटांचा विस्तार आहे. इंदिरा पॉईंट हा भारताच्या सर्वात दक्षिणेला असलेला बिंदू बांदा आचे या इंडोनेशियातील ठिकाणापासून (२००४ ची सुनामी इथेच भूकंप झाल्याने निर्माण झाली होती) फक्त १५० किमी अंतरावर आहे. चेन्नई ते पोर्ट ब्लेअर हे अंतर विमानाने सुमारे १३०० किमी आहे. बोटीने हे अंतर पार करताना ७५६ नॉटिकल माइल्सचे अंतर भरते जे सुमारे साडेतीन दिवसांत पार केले जाते. आता मुंबईहून इंडिगोची थेट फ्लाईट ३ तासांत २२८४ किमी अंतर कापून पोर्ट ब्लेअरच्या वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर घेऊन जाते. राजेंद्र चोला सारख्या राजांनी श्रीविजया साम्राज्यावर हल्ले करत असताना या ठिकाणाचा वापर आरमारी तळ म्हणून केला.

मा-नक्कवरं म्हणजे खुली भूमी असे नाव त्यांनी या द्वीपसमूहाला दिले असे आपल्याला १०५३ सालच्या तंजावर शिलालेखात लक्षात येते. पुढं इथं युरोपियन वसाहतवादी सत्ता येत गेल्या. १७५६ साली इथं डॅनिश लोक आले आणि नवीन डेन्मार्क म्हणून छोटी वसाहत स्थापली. या ठिकाणचे व्यवस्थापन ट्रांकेबार (तरंगमबाडी) इथून केले जात असे. पुढे तेरेसा बेटावर ऑस्ट्रियन मंडळींची १७७८-१७८४ सत्ता होती. मलेरियाच्या प्रादुर्भावामुळे त्यांनी इथली वस्ती सोडून दिली असे लक्षात येते. पुढं १७८९ साली चॅथम बेटावर ब्रिटिशांनी कारागृह वसाहत स्थापली. दोन वर्षांनी ही वसाहत पोर्ट कॉर्नवॉलिस येथे नेण्यात आली आणि मग विविध आजारांमुळे १७९६ साली बंद करण्यात आली. नंतर १८९६-१९०६ या काळात पोर्ट ब्लेअरला सेल्युलर जेलची स्थापना करण्यात आली ज्याबद्दल आपण एका स्वतंत्र ब्लॉग द्वारे जाणून घेऊ १८६४-६५ च्या आसपास लुईजी टोरेली या इटालियन मंत्र्यामार्फत इटलीने इथले अधिकार डेन्मार्क कडून विकत घेण्याचा प्रयत्न केला पण ही बोलणी सरकार बदलल्याने फलद्रूप झाली नाहीत.

पुढे १६ ऑक्टोबर १८६८ रोजी झालेल्या करारान्वये डेन्मार्कने इथं वसाहतीचे हक्क ब्रिटनला विकले. इथं मार्को पोलो आणि झान्ग हे सारखे विदेशी प्रवासी येऊन गेल्याच्या नोंदी सापडतात. हनुमानाचे मलेय भाषेतील नाव हंडुमान त्यावरून अंदमान नाव आले असावे असा कयास इतिहासकार मांडतात. पहिल्या महायुद्धाच्या काळात जर्मन जहाज एमडेन इथं क्रांतिकारी मंडळींच्या सुटकेसाठी हल्ला करणार अशी वदंता होती. पुढं कोको युद्धात ऑस्ट्रेलियन लाईट क्रूझर सिडनीने हे जहाज बुडवले. इथं १९४२ ते १९४५ या काळात जपानी सत्ता होती आणि सुरुवातीला त्यांचे जरी ब्रिटिश विरोधी म्हणून स्वागत झाले असले तरीही नंतर त्यांनी इथल्या स्थानिकांचा बराच छळ केल्याचे दिसते. अंदमानी तामिळ मंडळींची वस्तीही तशी मोठी आहे. इथं मुख्यतः तीन तामिळ प्रवाह आलेले दिसतात. तामिळनाडूहून रोजगारासाठी आलेले, ब्रह्मदेशातून आलेले आणि श्रीलंकेतून आलेले तमिळ. ही मंडळी अंदमानी हिंदी सुद्धा बोलतात. १९७१ च्या वेळेला बांगलादेशातून आलेल्या अनेक हिंदू शरणार्थींना अंदमानात आश्रय देण्यात आला. त्यामुळे इथं हिंदीबरोबरच बंगाली आणि तामिळ भाषेचा प्रभाव दिसतो. २००४ च्या अखेरीस आलेल्या सुनामीने इथल्या जीवनमानात अनेक बदल केल्याचे लक्षात येते.
अंदमान निकोबारचा भूगोल
भूगर्भशास्त्रीय दृष्टीने अंदमान बेटं ही आराकान पर्वतरांगेचा एक भाग मानला जातात. उत्तरेला असलेल्या अंदमान आणि दक्षिणेकडे असलेल्या निकोबार द्वीपसमूहांच्या दरम्यान १० अक्षांशावरील खाडी म्हणजे टेन डिग्री चॅनल आहे. तर पूर्व दिशेला थायलंड/ म्यानमारकडे जाताना अंदमानचा समुद्र लागतो. निकोबार, दक्षिण अंदमान आणि उत्तर-मध्य अंदमान असे तीन जिल्हे येथे आहेत. या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आणि दक्षिण अंदमानचे प्रशासनिक केंद्र पोर्ट ब्लेयरला आहे. निकोबार जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कार निकोबार असून उत्तर-मध्य अंदमान जिल्ह्याचे केंद्र मायाबंदर येथे आहे.

इथले मूळ रहिवासी सुमारे तीस हजार वर्षांपासून या बेटावर आहेत असे मानले जाते. ओंगी, जरावा, सेंटीनलीज, शोम्पेन, निकोबारी, ग्रेट अंदमानी, कॅरेन अशा विविध जनजातीय मूळ असलेल्या आदिवासी जमाती इथं आहेत. आज मात्र त्यांची घटणारी संख्या हा चिंतेचा विषय आहे. समुद्री गाय म्हणजे दुगॉन्ग हा इथला राज्य प्राणी आहे तर अंदमान वूड पिजन हे एक प्रकारचे कबुतर राज्य पक्षी म्हणून मान्यताप्राप्त आहे. अंदमान पडौक/ रेडवूड किंवा ईस्ट इंडियन महोगनी नावाच्या वृक्षाला राज्य वृक्षाचा दर्जा देण्यात आलाय.



अंदमानातील विविध बेटांवर हिंडत असताना मला सी महुआ, डीडू आणि जंगली पपई अशी विविध मोठाली झाडे समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या वनराईत दिसली. अनेक झाडांच्या मूळ ठिकाणावर समुद्राच्या लाटांनी कब्जा केल्याने ती अगदी शुभ्र वाळूवर एकाकी पडल्याचे दृश्य सुद्धा अनेक ठिकाणी दिसते. उष्णकटिबंधीय जंगले आणि मृत प्रवाळांच्या अवशेषांनी सजलेले किनारे असे इथल्या निसर्गाचे स्वरूप आहे. स्वच्छ आणि समुद्राचा तळ दिसेल इतके पारदर्शक पाणी आणि विविध प्रकारच्या खडकांनी सजवलेले सागरतीर पाहत असताना प्रत्येक ठिकाणी निसर्गाने वेगळी किमया केली आहे हे जाणवते.

ऑफिसच्या कामासाठी मी २०२३ ला प्रथमच या बेटांवर आलो. काही दिवस नंतर थांबलो सुद्धा. यावेळी निकोबार द्वीपसमूह काही पाहता आला नाही. परंतु पोर्ट ब्लेअर, चिडिया टापू, वंदूर, रॉस द्वीप, स्वराज द्वीप (हॅवलॉक आयलंड) शहीद द्वीप (नील आयलंड) लॉन्ग आयलंड, नॉर्थ पॅसेज आयलंड अशी भ्रमंती झाली आहे. जमेल तसे या ठिकाणांची फोटो भ्रमंती आपण करत राहू.