
कोकणातील महादेवाची मंदिरे म्हणजे निसर्गसौंदर्य, शांतता आणि अद्भुततेचा मिलाफ. प्रत्येक ठिकाणाचं काही ना काही आगळं वैशिष्ट्य आहे. या जागृत शिवस्थानांपैकी एक म्हणजे आसूद गावातील श्री व्याघ्रेश्वर. दापोली हर्णे रस्त्यापासून काही अंतरावर ओढ्याकाठी हे स्थान आहे.

अनेक मंदिरांप्रमाणे इथेही जीर्णोद्धार होऊन काही नवीन बांधकाम झाले आहे. परंतु सुदैवाने मंदिराचे मूळ कौलारू स्वरूप अजूनही पाहता येते. हे कौलारू देऊळ सुद्धा मूळ मंदिराच्या वर बांधले गेलेले संरक्षक बांधकाम असावे असेच वाटते.

हे मंदिर ७००-८०० वर्षे जुने आहे असे स्थानिकांनी सांगितले. कोकणातील बरीचशी मंदिरे पेशवेकालीन असल्याने फारतर २०० वर्षे मागे जातात, परंतु या स्थानाचे प्राचीनत्व इथल्या दगडी शिल्पांवरून लक्षात येते. पुरातत्व संशोधकांनी जर या मूर्तींचा अभ्यास केला तर कालनिश्चितीत नक्कीच मदत होऊ शकेल
इथं बाजूलाच अगदी रेखीव पुष्करिणी आहे. असे म्हणतात की यातील पाणी कधीही आटत नाही. मला तिथं एक लठ्ठ बेडूक मस्तपैकी डुंबताना दिसला. हा बेडूक कोणत्या प्रजातीचा असावा असे कुतूहल माझ्या मनात निर्माण झाले! कोणाला माहिती असेल तर नक्की कळवा. या मंदिराचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे बहुतेक मंदिरांच्या प्रवेशद्वारात गणेशपट्टी असते. इथं मात्र मला त्या स्थानी शिवलिंग कोरलेलं दिसलं.

नित्युंदन गोत्रातील आगलावे, कापसे, पिंपळखरे, दीक्षित, भडभोळे, भाडभोके, भिडे, रसाळ, वैशंपायन, सहस्रबुद्धे, साद्मणी … भारद्वाज गोत्रातील कन्याचे, काद्राप, दरवे, रानडे, आखवे, फफे, मनोहर, रहाळकर, पालघे, जोशी … कपि गोत्रातील धारप, मराठे, विद्वांस … गार्ग्य गोत्रातील केतकर अशा कुटुंबांचा श्री व्याघ्रेश्वर कुलस्वामी मानला जातो. (संदर्भ – कुलदैवत) जर काही आडनावे राहून गेली असतील तर कळवा मंदिरात मोठ्या आकाराचा अतिशय सुबक असा नंदी आहे. विशेष म्हणजे या नंदीवर मानवी आकृती कोरलेल्या दिसतात. पूर्वी याला स्वतंत्र घुमटी होती असे सांगितले जाते.

पण या मंदिराचे अगदी विशेष सौंदर्यस्थान आहे इथले लाकडी कोरीवकाम. एकही खिळा न ठोकता, एकमेकांमध्ये अडकणारे लाकडी भाग बनवून हे बांधकाम केले आहे. इथल्या स्तंभांवर सुरेख कोरीवकाम आहे. मंदिर शंकराचे आहे परंतु दशावतार कोरलेले दिसतात. कदाचित इथं निधी देणारा शासक वैष्णव असेल, किंवा पूर्वी शैव-वैष्णव भेद तितका टोकदार झालेला नसेलही. मला तज्ज्ञांचा अभिप्राय जाणून घ्यायला आवडेल.
मंदिरावरील निवाऱ्याचे लाकडी बांधकाम आणि आतमधील दगडी शिल्पे वेळ काढून नीट पाहायला हवीत अशी आहेत.
मंदिर परिसरात आढळणारी प्राचीनत्वाची अजून एक खूण म्हणजे इथं वीरगळ आहेत. मंदिराच्या व्यवस्थापकांनी त्याबद्दल माहिती फलक लावले आहेत हे कौतुक करण्याजोगे वाटले.

इथं बाजूलाच काळभैरव या शिवरुपाचे मंदिरही आहे. बरोबरच योगेश्वरी देवी आहे. काळभैरव योगेश्वरीच्या या शिल्पातील विशेष गोष्ट पहा. या दोन्ही देवता इथं अश्वारूढ रूपात दर्शविल्या गेल्या आहेत.

आज शहरीकरणानंतर सगळे दूर गेलेले असताना, कुलदैवत या संकल्पनेतून लोकांचे एकत्र येणे, आपल्या मूळ स्थानाची माहिती घेणे हे साध्य होऊ शकते, होते आहे. इथली मंडळी जागरूक आहेत, त्यांना पुरातत्व ठेव्याचे महत्त्व उमगले आहे त्यामुळे इथं सोयी सुविधा करत असताना जे मूळ आहे त्याला जपलं गेलं आहे याबद्दल मंदिर न्यासाचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे. कोकणातील मंदिरांचा स्थापत्यशास्त्र दृष्टीने अभ्यास झाला तर त्यांचे संवर्धन सोपे होईल. प्रशिक्षित कारीगरांना काम मिळेल. लाकडी बांधकामाचं लुप्त होत चाललेलं कलाविश्व पुन्हा कदाचित जागृत होईल. आमचा दर्या फिरस्ती ब्लॉग कोकणातील अशा अनेक विलक्षण ठिकाणांची चित्र भ्रमंती आहे. सर्व कोकणवेड्या, निसर्गवेड्या रसिकांना इथं येणं आवडेल अशी आशा आहे.
अप्रतिम लिखाण. रानडे यांचे देखील कुलस्वामी व्यघ्रेश्वर आहे
अप्रतिम. रानडे यांचा देखील कुलस्वामी श्री व्याघ्रेश्वर आहे.
छान माहिती! केशवराज मंदिरापासून जवळ असावं का हे मंदिर? जवळ असेल तर आम्ही संधी चूकवली.😌
अगदी जवळ आहे, केशवराज आसूद बागेत आहे, व्याघ्रेश्वर मुख्य रस्त्यापासून अगदी जवळच आहे
काळभैरव मंदिरात योगेश्र्वरी देवी पण आहे असे तुम्ही लिहिले आहे.माझ्या आठवणीप्रमाणे हरीहरेश्र्वरला पण काळभैरव मंदिरात योगेश्र्वरी देवी आहे.म्हणजे काळभैरव मंदिरात योगेश्र्वरी देवी असावी असा काही प्रघात आहे का?