
हर्णे बंदरावर उभं राहून ताजी मासळी विकत घेण्याचा आनंद घेणे ही दापोली-मुरुड भागात हिंडणाऱ्या पर्यटकांची आवडती गोष्ट. तिथंच पाण्यात आतवर गेलेलं जमिनीचे टोक आणि त्यावरील दीपगृह दिसतं. हीच कनकदुर्ग किल्ल्याची जागा. सुवर्णदुर्ग या महत्त्वाच्या जलदुर्गाला सोबत देणारे किल्ले म्हणजे कनकदुर्ग, फत्ते दुर्ग आणि गोवा दुर्ग. गोवा दुर्गाचे बांधकाम अजूनही उत्तम स्थितीत आहे आणि फत्तेदुर्ग कोळी वस्तीने व्यापून टाकलेला आहे. कनकदुर्ग मात्र अवशेष रूपात पाहता येतो. एक बुरुज, पायऱ्या आणि पाण्याची सात टाकी एवढेच काय ते आता शिल्लक आहे.

सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या ठिकाणी निजामशाहीत जुजबी तटबंदी होती आणि १६६९ च्या सुमारास किल्ला स्वराज्यात आला व मराठा आरमाराने १६७४ च्या आसपास इथं पुनर्बांधणी केली असे इतिहासकार मानतात. (रत्नागिरी जिल्ह्याची दुर्गजिज्ञासा – सचिन विद्याधर जोशी पृष्ठ क्रमांक १६) फत्तेदुर्ग आणि कनकदुर्ग किल्ल्यांचे बांधकाम सिद्दी खैरियत खानाने १७०० च्या सुमारास सुवर्णदुर्गावर वचक राहावा म्हणून केले असं इतिहासकार मानतात. इथं बसून पूर्वेला सूर्योदयाच्या प्रकाशात उजळलेलं हर्णे बंदर पाहणं किंवा सूर्यास्ताला केशरी रंगाच्या आकाशात सुवर्णदुर्गाची छाया प्रतिमा पाहणं हा एक अप्रतिम अनुभव असतो.

आपल्या भटकंतीत कनकदुर्ग किल्ल्याचं महत्त्व हे की सुवर्णदुर्ग पाहायला जाण्यासाठी आपल्याला प्रमाणित बोट इथून मिळते. सकाळी आठच्या सुमारास बोटवाले येऊन थांबतात १० जण असतील तर बोट निघते. मी गेलो तेव्हा एकटाच होतो आणि बहुसंख्य पर्यटक मासे खरेदी करण्यात व्यस्त होते त्यांचं खानपान होऊन सुवर्णदुर्गाकडे लक्ष वळणार म्हणजे फोटोग्राफीसाठी उत्तम वेळ वाया जाणार. त्यामुळे हजार रुपयांमध्ये स्पेशल फेरी करून मी जाऊन आलो. सुवर्णदुर्गाकडे जाताना कनकदुर्गाच्या टेकडीला वळसा मारून बोट जाते तेव्हा हा परिसर आणि हर्णे बंदरातील लगबग पाहायला मजा येते. कोकणातील अशा विविध ठिकाणांची चित्र भ्रमंती करण्यासाठी आमच्या या दर्या फिरस्ती ब्लॉगला भेट देत रहा.
I like nature beauty
Of kokan