
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे आराध्यदैवत. त्यांच्या चरित्रातील अनेक प्रेरणादायी घटना मराठी मातीत जन्मलेल्या शिवभक्तांना मुखोद्गत असतात. मग रांझे गावच्या पाटलाला केलेलं शासन असो, सूरतची लूट असो, अफझलखान वध असो किंवा शाहिस्तेखानावर मारलेला छापा असो… त्यांच्या लाडक्या सहकाऱ्यांचे पराक्रमही काही कमी नाहीत. सुभेदार तानाजी मालुसरेंनी सिंहगडावर केलेला पराक्रम, बाजीप्रभू देशपांडे यांचे बलिदान, मुरारबाजींनी दिलेरखानासमोर दाखवलेले अलौकिक शौर्य अशा अनेक घटना ज्या ऐकताना आजही अंगावर रोमांच उभे राहतात. पण शिवरायांच्या चरित्राच्या शेवटच्या काळात घडलेली एक महत्त्वाची घटना थोडी दुर्लक्षित राहिली आहे. सगळ्यांनाच ती माहिती असते असं नाही. या घटनेत कोणताही किल्ला जिंकायची मोहीम नाही. शत्रू म्हणून कोणी मुघल किंवा आदिलशाही सरदारही समोर नाही. ही गोष्ट आहे स्वतःला साता समुद्रांचे स्वामी म्हणून मिरवणाऱ्या इंग्रजांच्या नाकावर टिच्चून मुंबईच्या उरावर खडा पहारा देणारा खांदेरी किल्ला बांधणाऱ्या थोरल्या महाराजांची आणि त्यांच्या दृष्टीला मूर्त रूप देणाऱ्या त्यांच्या आरमाराची.

खांदेरी किल्ला पाहण्यासाठी आधी थळ गाव गाठायचे. पूर्वी तिथं जाण्यासाठी परवानगी लागत असे पण आता बोट ठरवून जाणे शक्य आहे. हा किल्ला आता महाराष्ट्र राज्य पुरातत्व आणि संग्रहालये विभागाच्या अखत्यारीत आहे. थळ गावातील अश्विन बुंदके यांच्याकडे सकाळी जाऊन पोहोचलो. त्यांची माणसे खांदेरीला जायला तयार होतच होती. आम्ही भरतीची वाट पाहत बंदरात थांबलो होतो. तिथं गावातच थळचा खूबलढा किल्ला होता त्याचे अवशेष पाहून आलो – हे वर्णन या ब्लॉगवर वाचा. थळला बंदरातून आलेले सामान बैलगाड्यांवर लादून आणले जात होते. भरतीचे पाणी खाडीत शिरले आणि आम्ही बोटीतून किल्ल्याच्या दिशेने निघालो. सूर्यनारायण वर आला होता आणि समुद्राच्या निळ्या लाटांना आता चंदेरी झळाळी लाभली होती. थळ बंदरातील लगबग पाहता पाहता आम्ही पश्चिमेकडे निघालो.

डावीकडे उंदेरीची तटबंदी दिसायला लागली. खांदेरीचा सोबती असलेला उंदेरी हा मराठ्यांचा पक्का शत्रू सिद्दीचे ठाणे.. त्याची गोष्ट पुन्हा कधीतरी.. आता आपण खांदेरीकडे पुढं निघालोय. या भागात अनेक खडक पाण्याखाली असल्याने नाविकांना सुरक्षित मार्गाचा अंदाज यावा म्हणून काही स्तंभ बांधलेले दिसतात.

खांदेरी किल्ल्याची तटबंदी आणि त्यावरील दोन टेकड्या आता स्पष्ट दिसू लागतात. दक्षिणेकडील टेकडीवर दीपगृह दिसू लागते. खांदेरीला आता एक मोठी जेट्टी बांधली गेली आहे. कदाचित मुंबईहून थेट पर्यटकांच्या बोटी आणून खांदेरी दर्शन करण्याचं नियोजन असू शकेल. तसं झालं तर मराठ्यांच्या इतिहासातील एक दुर्गरत्न पाहणे मुंबईकरांना सहजसाध्य होईल. फक्त इथं गोंधळ, धांगडधिंगा, कचरा, प्लॅस्टिक येऊ नये इतकीच काळजी. दुर्गांचे पावित्र्य राखून पर्यावरण वाढले पाहिजे.

किल्ल्याला सुमारे १ किलोमीटर लांब तटबंदी आहे. त्यावरून गडफेरी साधारणपणे अर्ध्या तासात पूर्ण करता येते. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे साडेसहा हेक्टर आहे. किल्ल्यात उजवीकडे वेताळाचे मंदिर आहे. या मंदिरात शिळा रूपाने वेताळ पूजला जातो. मजेची गोष्ट म्हणजे सॉफिश माशाच्या तोंडाचा भाग इथं वेताळाला अर्पण केलेला दिसतो.
गडफेरी करत पुढं निघालं की किल्ल्याच्या तटबंदीवरुन अथांग सागराचे दृश्य पाहत चालत राहता येते. भन्नाट वाऱ्यावर फडकणारा भगवा झेंडा स्वराज्याच्या पराक्रमाची, त्यागाची, नैतिक अधिष्ठानाची आठवण करून देतो. दगडाचे चिरे एकमेकांवर रचून हे तट-बुरुज बांधले आहेत. त्याच्याभोवती असलेल्या दगडधोंड्यांच्या राशी किल्ल्याच्या तटबंदीचे रक्षण करतात, उधाण आलेल्या समुद्राच्या लाटांचे प्रहार झेलून.
काही मीटर पश्चिमेकडे चालत गेल्यानंतर किल्ल्यात पाण्याचे खोदलेले टाके दिसते, तिथं अजून एक तळे सुद्धा आहे. कोणत्याही ठिकाणी किल्ला बांधायला घेण्यापूर्वी तिथं पाण्याची व्यवस्थित सोय आहे की नाही याची खात्री करून घेतल्याशिवाय शिवराय किल्ला बांधत नसत. जर शत्रूचा वेढा पडलाच तर अन्नधान्य, दारुगोळा आणि पाणी पुरेसे साठवलेले असल्याने पावसाळा येईपर्यंत किल्ला झुंजवणे मराठ्यांना सहज जमत असे.
तोफांच्या गाड्यावर ठेवलेली एक तोफ इथं आपल्याला दिसते. सोबतच इथं अजून एक तोफ जमिनीवर पडलेली आहे. शिवाय गोलाकार बुरुजावरही एक तोफ पडलेली दिसते. या तोफांवर मला काही खुणा किंवा कोरीव माहिती दिसली नाही. तोफांचा गाडा पाहिला की कुलाबा किल्ल्यावर असलेल्या इंग्लिश तोफांची आठवण होते. अठराव्या शतकात खांदेरीवर चालून येणाऱ्या शत्रूवर या तोफा धडाडल्या असतील हे नक्की.
मुंबई बंदराची जशी भरभराट होत गेली त्या प्रमाणात इथं येणाऱ्या जहाजांची संख्या वाढायला लागली आणि खांदेरीच्या आसपासच्या प्रदेशात खडकाळ भागात जहाजांचे अपघात होऊ लागले त्यामुळं इथं एक दीपगृह असावं अशी मागणी होऊ लागली. कुलाबा बेटावर आणि संक रॉक जवळ नांगरलेल्या जहाजावर एक एक दीपगृह होतेच पण ते इथून सुमारे ३० किलोमीटर दूर मुंबई बंदरात. इथं एक छोटं दीपगृह बांधले गेले आणि काही दिवसांनी ते पाडून टाकण्यात आले अशी नोंद दिसते. किल्ल्याच्या तटबंदीवरुन खांदेरीचे हेलिपॅड आणि त्यामागे टेकडीवर असलेले दीपगृह दिसायला लागते.

दीपगृह पाहण्याआधी आपण इथली विशेष तटबंदी आणि तिची रचना पाहणार आहोत. तटबंदीतून इथं एक दरवाजा समुद्राकडे उघडतो. पश्चिमेचा अथांग सागर आणि किल्ल्याच्या राकट रांगड्या भिंती समुद्राजवळील खडकांवरून पाहण्याची मजा इथून अनुभवता येते.
खांदेरीचे दुर्दैव म्हणजे इथं पोहोचणे सहजसाध्य नसले तरीही इथं आलेल्या पर्यटकांनी भरपूर कचरा तर आणला आहेच शिवाय सगळीकडे आपली नावे रंगवून ठेवली आहेत. रायगड किल्ल्यावर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव नाही. किल्ल्याचा वास्तुरचनाकार हिरोजी इंदुलकर याने सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर एवढाच छोटासा लेख जगदीश्वर मंदिराच्या पायरीवर लिहिला आहे. पण इथं आपलं नाम माहात्म्य कोरणाऱ्या लोकांना कोणी सांगावे. आता किल्ल्यावर असलेलं दीपगृह पाहायचे आहे. इथल्या पायऱ्या चढून वर आले की एक तोफ आपले लक्ष वेधून घेते. पश्चिमेकडे खांदेरीची तटबंदी, अथांग समुद्र आणि हेलिपॅड दिसते.
षट्कोनी आकाराचे हे दीपगृह १८६६ साली बांधायला सुरुवात झाली आणि १८६७ साली बांधकाम पूर्ण झाले. आता त्याला सरखेल कान्होजी आंग्रे दीपगृह म्हणून ओळखले जाते. दीपगृहाची कोनशिला गव्हर्नर बार्टल फ्रेयरने रचली तर उद्घाटन नौदलाचा कॅप्टन यंग याने केले. एल्डर ब्रेदरेन ट्रिनिटी हाऊस लंडन च्या सल्ल्याने स्वान-मसग्रेव्ह कंपनीने संकल्पचित्र बनवले आणि दिव्याचे साहित्य मेसर्स विल्किन्स कंपनीने पुरवले अशी नोंद रायगड जिल्हा गॅझेटमध्ये आहे.
दीपगृहाला असलेल्या बाल्कनीतून बाहेरचे दृश्य पाहणे मोहक असते. जुन्या युरोपियन शैलीच्या लोखंडी कामाची झलक आपण इथं पाहू शकतो. दीपगृहाच्या दिव्याच्या ठरलेल्या वारंवारतेप्रमाणे अमुक एक रंगाच्या प्रकाशाची ठराविक आवर्तने होतात आणि त्यावरून नाविकांना आपण कोणत्या दीपगृहाजवळच्या प्रदेशात आहोत हे लक्षात येते.
खांदेरीचे दीपगृह पाहून आपण पुन्हा तटबंदीजवळ उतरून आलो की आपल्याला निसर्गाचा एक अविष्कार पाहायला मिळतो. तो म्हणजे घंटेप्रमाणे आवाज करणारा खडक. या खडकाच्या एका भागात दगडाने आघात केल्यास पितळी घंटेसारखा आवाज येतो, तर बाकीच्या भागात आघात केल्यास असं होत नाही. दगडातील काही धातू घटक आणि पोकळी यामुळे कदाचित असे होत असावे.
जंजिऱ्याचा सिद्दी हा मराठ्यांचा शत्रू. त्याला मुंबईत आसरा मिळत असे आणि मदतही मिळत असे. इंग्लिशांच्या ताब्यातील मुंबई बंदरातील व्यापार वाढू लागला होता त्यामुळे इथं मराठ्यांचा वचक बसणे अतिशय आवश्यक होते. मुंबईपासून ३० किलोमीटर अंतरावरील या बेटावर १६७२ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला बांधण्याचा प्रयत्न केला पण इंग्लिशांच्या विरोधामुळे तो फसला. पुढे २७ ऑगस्ट १६७९ रोजी मराठ्यांनी खांदेरी ताब्यात घेतले व तिथं ४०० माणसे आणि ६ तोफा तैनात करून किल्ला बांधायला घेतला.

२ सप्टेंबरला थळ हून सामान आणि मजूर आले व किल्ला बांधायला सुरुवात झाली. कल्पना करा की जिथं आजही पावसाळ्यात नौका घेऊन जायला लोक धजावत नाहीत तिथं शिवरायांचे आरमार किल्ला बांधत होते. इंग्लिशांनी हे बेट आमचे आहे आणि तुम्ही निघून जा अशी धमकी दिली आणि बेटाला वेढा घातला पण मायनाक भंडारी या नौदल अधिकाऱ्याने मी छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक असून फक्त त्यांचीच आज्ञा मानतो असे खमके उत्तर दिले आणि बांधकाम सुरूच ठेवले. इंग्लिशांनी आरमारी शक्ती वापरून त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. पण पुढे वारंवार त्यांना अपयशच आलेले दिसते.
१) इंग्लिशांनी एन्लाईन डॅनियल ह्युजेस च्या नेतृत्वाखाली तीन शिबाडे (मोठी लढाऊ जहाजे) पाठवून किल्ले बांधणी करणाऱ्या मराठ्यांची नाकेबंदी सुरु केली.
२) १५-१७ सप्टेंबर १६७९ ला वादळी हवामानातही मराठ्यांना रसद मिळणे थांबले नाही. ८ गुराबांची कुमक त्यांना मिळाली असे दिसते.
३) इंग्लिशांनी रिव्हेंज युद्धनौका व दारुगोळा पाठवला
४) १९ सप्टेंबरला आरमारी युद्ध झाले आणि तीन इंग्लिश अधिकारी मारले गेले व त्यांचे जहाज मराठ्यांच्या ताब्यात आले
५) रिचर्ड केग्वीन नावाच्या सरखेलाची नेमणूक इंग्लिशांनी केली आणि तो ऑक्टोबरमध्ये खांदेरी ताब्यात घेण्यासाठी हल्ला करू लागला.
६) १८ ऑक्टोबरला मराठ्यांनी केग्विन वर आरमारी हल्ला केला. वाऱ्याची साथ होती तोवर झुंज झाली आणि वारा पडताच हे आरमार नागावच्या खाडीत पसार झाले. केग्विनचे गुराब आणि पाच तारवे मराठ्यांनी ताब्यात घेतली.
७) फॉरचून सारखी युद्धनौका पाठवूनही इंग्लिश हल्ल्याला यश आले नाही. आणि डेप्युटी गव्हर्नर जॉन चाईल्डने अण्णाजी पंडिताशी तह करून मराठ्यांचे स्वामित्व स्वीकारले व आपल्या कैद्यांची सुटका करून घेतली.
भारतीय नौदलाने खांदेरी या नावाची पाणबुडी बांधून मराठ्यांच्या आरमारी इतिहासाला गौरवले आहे. आधीची कलावरी श्रेणीची खांदेरी पाणबुडी १९८९ मध्ये निवृत्त झाल्यावर आता स्कॉर्पीन श्रेणीतील नवीन खांदेरी पाणबुडी कार्यरत झाली आहे.
पुढे सरखेल कान्होजी आंग्रेंच्या काळातली खांदेरी ताब्यात घेण्यासाठी इंग्लिशांनी आरमारी मोहीम आखली पण तिचाही एकंदरीत बट्ट्याबोळ झाला. खांदेरी किल्ल्याचा इतिहास, उंदेरीवर सिद्दीने केलेला कब्जा हे सगळं पुन्हा कधीतरी सविस्तर. तर मित्रांनो कोकणातील अशा विलक्षण ठिकाणांची चित्र भ्रमंती करण्यासाठी आमच्या दर्या फिरस्ती ब्लॉगला नियमितपणे भेट द्या बरं का आणि तुमच्या मित्रांना, आप्तेष्टांनाही दर्या फिरस्तीबद्दल सांगा ही अगत्याची विनंती.
Pingback: शिवलंका सिंधुदुर्ग | Darya Firasti
Pingback: समाधी मायनाक भंडारींची | Darya Firasti
Pingback: पद्मगड, सिंधुदुर्गाचा पहारेकरी | Darya Firasti
1 divsat Alibag area madhye Boat bhadyane gheun panyatale kiti kille pahu shakto?