सर्वसाधारणपणे असा समज आहे की कोकणात प्राचीन मंदिरे नाहीत. याला अपवाद आहे फक्त कर्णेश्वर मंदिराचा. परंतु गेल्या दोनशे ते अडीचशे वर्षांत कोकणात अनेक सुंदर सुबक मंदिरांची निर्मिती झाली. त्यांची स्वतःची एक वेगळी शैलीची आहे जिचा अभ्यास होणे आवश्यक आहे. विविध ग्रामदेवता, कुलदेवता यांची मंदिरे जवळजवळ प्रत्येक गावात आहेत. या परशुराम भूमीतील लोकांची शिवशंकरावर विशेष श्रद्धा. साहजिकच शंकराची अनेक मंदिरे कोकणात पाहता येतात. प्रत्येक मंदिराचा आसमंत वेगळा, दिमाख वेगळा. दर्या फिरस्ती ब्लॉगवर आपण प्रत्येक मंदिराबद्दल सविस्तरपणे जाणून घेणारच आहोत पण कोकणातील काही खास शिवमंदिराची झलक या ब्लॉगमध्ये पाहूया.

घारापुरी लेण्यातील ही सदाशिवमूर्ती. या ठिकाणी भगवान शंकराच्या चरित्रातील अनेक प्रसंग दगडात कोरून घडवले गेले आहेत. अंधकासूरवध, गंगाधर शिव, शिव-पार्वती विवाह, रावणाने कैलास पर्वत हलवणं असे अनेक प्रसंग इथं पाहता येतात.
Kartikeya & Ganesh Andhakasura Vadha
मुंबईत मंडपेश्वर लेण्यातही शिवाची पूजा केली जात असे तिथं नटराजाची अतिशय सुंदर मूर्ती पाहता येते.

मुंबईजवळ अंबरनाथला असलेल्या प्राचीन शिवालयात शंकराची अनेक रूपे आणि प्रतिमा पाहता येतात.
अलिबागजवळ उंच डोंगरावर असलेला कनकेश्वर आणि जवळच असलेला पालेश्वर महादेव यांचे दर्शन घेता येते. पालेश्वर महादेवाची विशेष गोष्ट म्हणजे इथं देवाला फुलांऐवजी फक्त पानेच अर्पण केली जातात.
मुंबईतील जोगेश्वरी लेणी ही शिवाला समर्पित लेणी असून तिथं दगडात कोरलेली शिवरूपे पाहता येतात.

मुंबईतील परळ येथे पाचव्या शतकात सापडलेली शिवमूर्ती फार अद्भुत आहे. रस्त्याचे काम सुरु असताना ती सापडली आणि मग पुरातत्व विभागाने संवर्धन करून तिथेच जतन केली आहे. या मूर्तीची प्रतिकृती आणि घारापुरी येथे सापडलेली शिवमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात पाहता येते.
मुंबईजवळ लोनाड येथे एक भग्न तरीही भव्य असे प्राचीन शिवमंदिर आहे. तिथली शिवशिल्पे आणि मंदिराची रचना आवर्जून पाहण्यासारखी आहे.
भगवान श्री शंकराचे कोकणातील एक मोठे स्थान म्हणजे हरिहरेश्वर. दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी कालभैरवाचे मंदिरही आहे.
कोकणात अनेक ठिकाणी छोट्या गावांमध्येही अतिशय सुंदर पेशवेकालीन शिव मंदिरे आहेत. सप्तेश्वर देवस्थान पंचनदी येथे आहे आणि रत्नागिरीजवळ भावे अडोम या ठिकाणीही आहे.
DCIM\101MEDIA\DJI_0074.JPG
दिवेआगर आणि श्रीवर्धन परिसरात काही सुंदर शिवमंदिरे आहेत. दिवेआगर जरी सुवर्णगणेश, सुंदर नारायण, रुपनारायण अशा मंदिरांसाठी प्रसिद्ध असले तरीही तिथं उत्तरेश्वर नावाचे जांभा दगडात बांधलेले सुबक मंदिर आहे. श्रीवर्धनच्या तलावाजवळ जीवनेश्वर शिवमंदिर आहे. अलिबागच्या छत्री बाग परिसरात आंगरे घराण्यातील समाधी आहेत. तिथंच एक अतिशय सुंदर शिवलिंग पाहता येते.
रत्नागिरीजवळ काळबादेवीला खाडीच्या किनाऱ्यापाशी असलेलं रामेश्वर शिवालय म्हणजे आवर्जून भेट द्यावी असं एक अतिशय सुंदर ठिकाण.
मुंबईजवळच घोडबंदर किल्ल्याकडे जाताना एक छोटेसेच पण सुरेख शिवमंदिर पाहता येते. हे आहे अमृतेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर जगन्नाथ शंकरशेट यांच्या स्मरणार्थ बांधले गेले.
दापोलीजवळ आसूद येथे शिवाचे अतिशय सुंदर व्याघ्रेश्वर मंदिर आहे. लाकडी बांधकाम, प्राचीन शिल्पं आणि वीरगळ हे या मंदिराचे वैशिष्ट्य. काळभैरव-योगेश्वरीची अश्वारूढ मूर्ती तशी दुर्मिळच. इथं ही मूर्तीही नक्की पहा.
रत्नागिरीजवळच काजळी नदीच्या काठी सोमेश्वर शिवालय आहे. शहरापासून खूप दूर जरी नसलं तरीही अनुभव अगदी शांत, निवांत.
हेदवीचा दशभुज गणेश आणि जवळ समुद्रकिनाऱ्यावर असलेली बामणघळ प्रसिद्ध आहे. तिथेच समुद्रकिनाऱ्यावर असलेलं उमा-महेश्वराचं मंदिरही खूप सुंदर आहे.
कोकणातील महत्वाच्या प्राचीन मंदिरांपैकी एक म्हणजे कर्णेश्वर मंदिर. कसबा संगमेश्वर येथील हे मंदिर चालुक्यवंशीय कर्णराजाने बांधलेले आहे. उत्कृष्ट कोरीवकामाने सजलेलं हे मंदिर जरूर पाहायला हवं.
दापोलीजवळचा कर्दे समुद्रकिनारा अतिशय रम्य ठिकाण. तिथून काही अंतर दक्षिणेला करंजगाव येथे वेळेश्वर महादेवाचे मंदिर आहे. दाबके कुटुंबियांचे हे कुलदैवत.
पूर्णगड किल्ल्याच्या पायथ्याशी भगवान शंकराचे एक रेखीव देवालय आहे. श्री सिद्धेश्वर देवस्थान. पेशवेकालीन मराठा स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना असलेलं हे मंदिर गडफेरी करताना क्षणभर विश्रांती घ्यायलाही उपयुक्त आहे.
वालुकेश्वर म्हंटलं की मुंबईचे देऊळ आठवते ना? परंतु याच नावाचे अतिशय एक शिवालय गुहागरजवळ असगोळी गावात आहे.

वेळास गावातील रामेश्वर शिवालय नक्की पहा. नाना फडवणीसाचे हे गाव ऑलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे.

अंजनवेल किंवा गोपाळगड किल्ल्याजवळच आहे टाळकेश्वर देवालय. उंच कड्यावरील या ठिकाणाहून अथांग सागराचे दर्शन घेणे ही एक पर्वणीच असते.
आमच्या कोळथरे गावातील कोळेश्वराचे मंदिर हे इसवीसन १८६० साली बांधलेले मंदिर आहे. यावरील घुमट पाहिले असता इस्लामी स्थापत्यशैलीचा प्रभाव दिसून येतो.
नागाव येथील अहिल्याबाई होळकर यांनी बांधून घेतलेले श्री वंखनाथ देवस्थान अठराव्या शतकातील एक अनोखे मंदिर आहे. दगडात कोरलेली शिल्पे आणि श्रीकृष्ण चरित्रातील प्रसंग हे या स्थानाचे वैशिष्ट्य.
नागाव येथे तलावाकाठी बांधले गेलेले एक सुंदर पेशवेकालीन शिवालय म्हणजे श्री नागेश्वर देवस्थान
हंबीररावाचा प्राचीन मराठी शिलालेख असलेले नागाव परिसरातीलच एक शिवालय म्हणजे श्री भीमेश्वर देवस्थान. याचे बांधकाम पार्वतीबाई पेशवेंनी करून घेतले होते.
अलिबागच्या दक्षिणेला असलेल्या अक्षी गावामध्ये सोमेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मंदिरात सुंदर कोरीवकाम असलेले लाकडी खांब असून, अक्षी गावचे दोन गद्धेगाळ इथं जवळच आहेत.
केळशीजवळ उटंबर येथे बेलेश्वर नावाचे शिवालय आहे.
पालीजवळ आसरे येथे विरेश्वर महादेव मंदिर आहे. तिथं वीरगळ पाहता येतात.
गुहागर येथील प्राचीन शिवमंदिर व्याडेश्वर हे अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे. पंचायतन असलेले हे मंदिर गुहागरची ओळख आहे असं म्हणता येईल.
वेळणेश्वरच्या रम्य समुद्रकिनाऱ्यावरच आहे एक भव्य शिवालय. श्री वेळणेश्वर देवस्थान
विजयदुर्ग आणि देवगडजवळ वाडा नावाचे ठिकाण आहे तिथं एक अनोखं शिवमंदिर आहे. श्री विमलेश्वर शिवालय. गुहेत बांधलेल्या या मंदिरात वीरगळ आहेत आणि प्रचंड हत्तीची शिल्पं आहेत.
आंबोळगडजवळच नाटे नावाचे गाव आहे. त्या गावचे शिव मंदिर आहे श्री नाटेश्वराचे.
विजयदुर्ग किल्ल्याजवळच गिर्ये गावात श्री रामेश्वराचे देऊळ आहे. कातळात खोदून काढलेली उताराची वाट आणि भिंतींवर रंगवलेली सुंदर चित्रे ही या मंदिराची खासियत म्हणता येईल.
रामेश्वर नावाचे देवस्थान आचरा येथेही आहे.
चौलचे श्री रामेश्वर देवस्थान तर प्रसिद्धच आहे.
फार दूर कशाला जा अगदी मुंबईतही रामेश्वर नावाचे शिवालय आहे. बाणगंगा तलावाजवळच…

माडबन शुभ्र वाळू असलेल्या रम्य सागरतीरासाठी प्रसिद्ध आहे.. तिथं जवळच अंजनेश्वर देवस्थान आहे.
वेंगुर्ल्यालाही श्री रामेश्वर देवस्थान आहे बरं का! काय कहाणी असेल बरं या नावामागे? आणि कोकणात हे इतकं प्रचलित का असेल?
वेंगुर्ल्याजवळच माठ नावाच्या गावात श्री मांगल्येश्वराचे स्वयंभू देवस्थान आहे. इथंही वीरगळ आहेत.
रायगडावरील श्री जगदीश्वर मंदिर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्यच. हिरोजी इंदुलकराचा आणि रायगड निर्मितीचा शिलालेख इथं पाहता येतो.
रायगडावरील जगदीश्वर मंदिर सर्वांनाच माहिती आहे. तिथं अजून एक छोटे शिवालय आहे ते म्हणजे श्री वाडेश्वर महादेवाचे

आमच्या कोळथरेला एक छोटेसे शिवमंदिर आहे ते म्हणजे श्री बापेश्वर देवालय

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक खूप महत्त्वाचे शिवमंदिर म्हणजे श्री कुणकेश्वर. अत्यंत रम्य अशा समुद्रकिनारी हे उत्तुंग शिखर दुरूनच खुणावत असते.

जयगड किल्ल्याजवळ शास्त्री नदीच्या मुखाशी श्री कऱ्हाटेश्वराचे देवस्थान आहे. जोग मंडळींचे हे कुलदैवत. काही पायऱ्या उतरून नदीच्या किनारी गेलं की एक गोमुख झरा तिथं दिसतो. अतिशय निर्मळ आणि शीतल पाणी देणारा.. हे तीर्थप्राशन नक्की केलं पाहिजे.
दाभोळ गावाजवळच असलेले अतिशय महत्वाचे शिवालय म्हणजे श्री दाल्भेश्वराचे. इसवीसन १६६१ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं येऊन दर्शन घेतले असे मानले जाते.

तर कोकणातील अनेक शिवमंदिराचे दर्शन या पोस्टद्वारे आम्ही तुम्हाला घडवले. दर्या फिरस्ती ब्लॉगद्वारे आम्ही कोकणातील अशाच अनोख्या ठिकाणांची चित्रभ्रमंती करत आहोत. कोकणातील दृश्य संस्कृतीचे संवर्धन करत आहोत. आमच्या या ब्लॉगला नेहमी भेट द्या हे अगत्याचे आमंत्रण. संकल्पना आवडली असेल तर लाईक करा.. शेयर करा. मित्रांना, स्नेह्यांना, कोकणवेड्या भटक्यांना आमच्या ब्लॉगबद्दल नक्की सांगा.
कोकणात खेड तालुक्यात दहिवली गावाजवळ महिपतगडावर असलेलं पारेश्वराचं मंदिर खूप पुरातन आणि तालुक्यात प्रसिद्ध आहे, बेलदार वाडीजवळ हे पुरातन शिवमंदिर आहे, इथे महाशिवरात्री निमित्ताने दरवर्षी मोठी जत्रा भरते तसेच महिपतगडावर गिर्यारोहणासाठी आल्येला गिर्यारोहकांना रात्रीच्या निवसासाठी हे मंदिर अतिशय उपयुक्त आहे, जवळच असलेल्या बेलदार वाडीवरही भाविकांची राहण्याची सोय होते