Darya Firasti

चपटीचा शाप

कोकणातल्या एका अनाघ्रात, ऑफबीट, पर्यटकांच्या गर्दीपासून दूर अशा समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही मोठ्या उत्सुकतेने गेलेले असता. पायवाटेने झुडुपे, काटेकुटे, चिखल यातून वाट काढत आपण किनाऱ्यावर येतो. मनात एक चित्र तयार मोठ्या अपेक्षेने तयार होत असते… स्वच्छ वाळूची पुळण… स्वच्छ पाणी.. भेळेच्या मॅगीच्या गाड्या नाहीएत.. आरडाओरडा करणारे पर्यटक नाहीएत.. मऊ वाळूवरून अनवाणी चालण्याचा आनंद आपण अनुभवतोय.. किती स्वप्नील आहे ना हा अनुभव.. पण आपल्याला पटकन वास्तवाचे भान येते.. प्लॅस्टिक, चिप्सची पाकिटे, दारूच्या बाटल्या, शॅम्पू तेल वगैरेंच्या रिकाम्या बाटल्या, वापरून फेकलेल्या चड्ड्या असल्या गोष्टी तुमच्या समोर तिथं विचकट हसत उभ्या ठाकलेल्या असतात.. इथं माणसांना येणे सोपे नाही.. गाडी वगैरे येत नाही.. मग हे सगळं इथेही कसं पोहोचलं असा प्रश्न आपल्याला पडतो.. आणि लक्षात येते की इतर ठिकाणी वायझेड लोकांनी समुद्राच्या पोटात टाकलेली घाण समुद्र पुन्हा तुमच्याकडे आणून सोडतोय.. पण ही घाण फेकणाऱ्यांना कुठं काय फरक पडणार आहे.. ते त्यांची २ दिवसांची मजा करून घाण करायला स्वगृही गेले आहेत.. ही पापे फेडायचे काम स्थानिकांचे आणि डोळस पर्यटकांचे…

मोरवे नावाच्या नितांत सुंदर समुद्र किनाऱ्यावर मला सापडलेली ही चपटी.. दर्या फिरस्तीच्या माध्यमातून आपण कोकणातील विविध प्रेक्षणीय स्थळांची माहित घेत आलो आहोत.. फोटो आणि व्हिडीओज च्या माध्यमातून आपण विविध पुरतं स्थळे, निसर्गाच्या सान्निध्यातील सुंदर जागा पाहत आलोय… या ब्लॉगमध्ये कचरा पाहूया आणि एका अनोख्या पर्यटन संस्कृतीची माहिती घेऊया.

आचरा खाडीजवळ असलेल्या आडबंदर जेटीवरील हे कलेक्शन पहा.. किती वैविध्य आहे इथे. स्वच्छ निर्मळ अति शुद्धीकृत पाणी पोटात गेल्यावर इथं समुद्रस्तुप्यन्तु झालेल्या विविध आकाराच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या पहा.. किती कृतज्ञ असतील हे पाणी पिणारे.. पाणी जरी गट्टम केलं असलं तरी कोकण भूमीला या बाटल्यांचे दान देऊन गेले आहेत.. किती दिलखुलास दानशूर आणि मोकळ्या मनाची असतील ही माणसे.. इथं येऊन तुम्ही कदाचित फ्राईड चिप्स खायला विसरला असाल… त्यांची आठवण करून द्यायला विविध ब्रँड आणि फ्लेवर्सची पाकिटे इथं तुम्हाला दिसतील.. तुमच्या मनात चिप्स खाण्याची ओढ निर्माण होईल.. मग परत हमरस्त्यावर गेल्यावर तुम्ही तिथल्या एखाद्या दुकानातून चिप्स घ्याल.. अशाने इथल्या अर्थ व्यवस्थेला किती हातभार लागतोय याची तुम्हाला जाणीवच नाहीए..समजा तुम्हाला फॅमिली किंवा मित्रांबरोबर लंगडी वगैरे खेळायचं असेल.. तर विविध रंगांच्या आणि साईझच्या एक एक चपला सुद्धा आहेत बरं! इतक्या रखरखीत उन्हात कोकणातील आर्द्रता सहन करत तुम्ही बापडे हिंडताय.. बियरचा कॅन पाहून मनाला थंडावा मिळेल… खोबरेल तेलाची बाटली पाहून उन्हात पोळलेली त्वचाही शांत होईल… किती कनवाळूपणे हे सगळे मागे सोडून गेली आहेत ही मंडळी. तुंमच्या मुलांना टाकाऊ पासून टिकाऊ ची असाइनमेंट करायला काही प्रेरणा हवी असेल तर इथे आहे पहा.. फक्त बाटल्या आहेत असेही नाही, पाईप वगैरे सुद्धा आहे म्हंटलं.. किती विविध कलाकृती या सामानातून तयार होऊ शकतील विचार करा..

मोरवे किनाऱ्यावर शिरता शिरता पायवाट संपली की लगेचच हे कचराशिल्प किंवा Garbage mural तुमचे सहर्ष स्वागत करते.. किनाऱ्यावर दगड रचून केलेल्या पायवाटेचा इतका कल्पक वापर करणे ज्याच्या प्रतिभेला सुचले त्याला काय पुरस्कार द्यावा सांगा.. दगड, वाळू, मर्यादावेलीची जाळी, ओल्या वाळूचा चिखल, नारळ, औषधांच्या ट्यूब, काचेच्या फुटक्या बाटल्या या सगळ्यातून चालत असताना तुमची चाल कधी सुधारते आणि आकर्षक दिसू लागते हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही.. शिवाय चुकून काचेच्या टोकाने पाय कापला तर फेकलेल्या क्रीमच्या ट्यूबपैकी कुठलंतरी क्रीम लगेच लावून औषधोपचार सुद्धा होईल.. किती विचार करून हा कचरा इथं जमा केलाय ते पहा.. ज़ख्म देनेवालाही उसपर मरहम लगाता है का काहीतरी कुठल्यातरी शेरो-शायरीत कोण्या अनाम शायराने म्हंटले आहेच की.

आता बाकाळे चे पहा ना.. इथं शेवटपर्यंत गाडी जात नाही.. पक्का रस्ताही नाहीए.. गावातून सड्यावर जायचे आणि मग कच्च्या रस्त्याने गाडी दीड किलोमीटर दूर न्यायची आणि मग नंतर पुढे पायवाटेने अर्धा किलोमीटर चालले की आपण एका निर्मनुष्य किनाऱ्यावर पोहोचतो.. पण तिथेही कचरा नाहीए असं दिसून तुम्हाला शॉक लागून त्रास होऊ नये याची तजवीज अनाम पर्यटकांनी करून ठेवली आहेच.. किनारा अगदी सुंदर आहे हो..एका अद्वितीय ठिकाणी निसर्गाने दिलेला अलौकिक अनुभव .. कोणताही गोंगाट नाही.. कानावर पडतो फक्त सागरघोष .. सागराची गाज ऐकताना आपण इतके तल्लीन होऊन जातो की त्या नीरव शांततेत आता आपल्याच श्वासाचा तालही आपल्याला ऐकू येऊ लागतो… अशा रम्य ठिकाणाला आपली दृष्ट लागायला नको ना म्हणून इथं समुद्र देवतेने कचरा परत पाठवून काळी तीट लावली आहे म्हणा ना!

आणि तुम्ही मुंबई पुण्याच्या गोंधळ गोंगाटापासून दूर इथं आलाय, तुम्हाला तुमच्या घरची आणि घरातील सुसज्ज बार ची फार आठवण येत असेल.. नेमके तुम्ही एखाद्या सात्विक होम स्टे मध्ये राहत असाल.. आणि एकदम होम सिक व्हाल.. अशावेळी तुम्हाला एकटेपणा आणि औदासिन्य वाटू नये म्हणून केळशी सारख्या निर्मळ सागरतीरावर सुद्धा अशा कलाकृती या लोकांनी उभ्या केल्या आहेत.

या मंडळींचे औदार्य, प्रेम, करुणा फक्त शहरे आणि माणसे यांच्यापर्यंत मर्यादित आहे असे नाही बरें! मुक्या प्राण्या-पक्ष्यांना चमचमीत खुसखुशीत खमंग खाऊ देणे हे पुण्य ही मंडळी अगदी भक्तिभावाने करत आली आहेत. शेव फाफडा क्रिस्पी नूडल्स वगैरे अभिजन खाद्य या बिचाऱ्या सीगल्सच्या प्रारब्धातही नसेल.. पण ही दानशूर मंडळी सकाळी सकाळी हा खाऊ मुक्तहस्ताने उधळतात आणि हे मुके जीव त्याचा आनंद घेतात.. आपल्या कोवळ्या पिल्लांसाठी अन्न शोधून थकलेल्या या पक्षांना आधार या फ्राईड नूडल्सचाच…

एक दिवस या मंडळींच्या कृपेने मला आंबोळगडला एक विलक्षण अनुभव आला. संध्याकाळची वेळ. नीरव शांतता.. फक्त समुद्राची गाज.. पक्ष्यांचे आवाज आणि वाऱ्याची फडफड.. अशा रटाळ ठिकाणी खूप कंटाळा आला होता.. मग अचानक तिथं एक स्कॉर्पिओ आली.. गाडीतून ४-५ युवक युवती उतरले आणि आपले पार्टी स्पीकर बाहेर काढून त्यांनी बॉलिवूडची लेटेस्ट हिट्स अगदी झंकार बीट्स वर तिकडे वाजवायला सुरुवात केली. एक सळसळतं चैतन्य त्या वातावरणात निर्माण झालं. किती आभार मानावेत त्या पार्टी ऍनिमल मंडळींचे… कोकणातील पर्यटनाला एक नवीन दिशा देणारी ही मंडळी आहेत.

कोकणातील लोकांना चविष्ट घरगुती स्थानिक काहीतरी खायला घालायची वाईट खोड आहे.. आपण जाऊ तिथं पनीर लबाबदार, चिकन अमृतसरी, मैदा बटर नान वगैरे उपलब्ध असायला हवं. चुकून मोदक वगैरे खाण्याची इच्छा झालीच तर पाच ते दहा मिनिटांत ते हजर व्हायला हवे. हॉटेलमध्ये रूम सर्व्हिस वाले कसा फोन केला की चहा आणून देतात तसं लगेच मिळायला हवं.. होम स्टे असला म्हणून काय झालं.. हॉटेल मध्ये जी सेवा मिळते ती सेवा मिळालीच पाहिजे.. कोकणातील होम स्ट वाले उगीच स्थानिक रेसीपी, चांगली पोषणमूल्ये वगैरे असलेल्या गोष्टी खाऊ घालायचा प्रयत्न करतात.. आता रात्री आमच्या पोरांनी पिझ्झा पास्ता मागितला तर आम्ही काय करायचं?

उपहासाचा भाग सोडला तर कोकणातील विविध अस्पर्श जागांची माहिती सांगत असताना मला वाटणारी भीती आहे की कोकणचा वाईट अर्थाने गोवा तर होणार नाही ना? हरिहरेश्वरला दारू पिऊन आलेल्या टोळक्याला रूम दिली नाही म्हणून मालकाला मारहाण करण्यापर्यंत आता मस्तवाल मंडळींची मजल गेली आहे. त्यात भांडण सोडवायला गेलेल्या भगिनीच्या अंगावर गाडी घालून तिचा जीव घेण्याइतपत ही मुजोर प्रवृत्ती पोहोचली आहे. ते सुद्धा हरिहरेश्वरसारख्या धार्मिक महत्व असलेल्या गावात. कोकणातील पर्यटन वाढले तर स्थानिकांचे उत्पन्न वाढेल, उत्कर्ष होईल यात वादच नाही, पण पैसा फेकला की आपण समोरच्याला विकत घेतले असून आपण काहीही करायला मोकळे आहोत या मानसिकतेला आळा घालणे गरजेचे आहे. यासाठी अनेक धोरणात्मक बदल करावे लागतील. ग्राम पंचायतींना अधिक अधिकार देऊन निधी संकलनाची व्याप्ती वाढवावी लागेल. टुरिझम पोलिस विविध ठिकाणी तैनात करावे लागतील. एकदाच वापरायच्या प्लॅस्टिकच्या वापर आणि विक्रीवर बंदी घालावी लागेल. काही महत्वाच्या आणि पर्यावरणाच्या दृष्टीने नाजूक ठिकाणी समुद्र किनारा वापरणे सशुल्क करावे लागेल. अंदमान सारख्या ठिकाणी छोट्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांच्या विक्रीवर बंदी आहे तसेच काही निर्णय कोकणच्या बाबतीत घ्यावे लागतील. पण सगळ्यात महत्वाचा भाग पर्यटकांच्या वागणुकीचा आहे. अगदी शाळेत असल्यापासूनच नागरी जबाबदाऱ्या आणि डोळस-जबाबदार पर्यटन म्हणजे काय याचे संस्कार व्हायला हवेत. वेळासला कासव महोत्सव पाहायला गेलो होतो २०२१ ला तेव्हाची गोष्ट आहे.. समुद्रकिनाऱ्यावर पाण्याच्या बाटल्या फेकणाऱ्या मुलांना हटकले तर त्यांनी माजोरडेपणाने गावकरी कचरा उचलतात आणि ते त्यांचे कामच आहे असे उत्तर दिले. अशावेळेला या प्रवृत्तीला हटकणाऱ्या लोकांना मारहाण होऊ शकते. या ठिकाणी वनविभागाचे रेंजर आणि पर्यटन पोलीस तैनात करून या विकृत मानसिकतेला आळा घालावाच लागेल. काही प्रमाणात काजवा महोत्सवाच्या बाबतीत हे केलेले दिसते आहे. भारतात कमी उत्पन्न गटाला विविध उत्पादने वापरता यावीत म्हणून छोटी पॅक उपलब्ध झाली हे उत्तम आहे पण त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम भयानक आहे. तळीरामांना खिशाला परवडणाऱ्या चपटीचे वरदान जरी मिळाले असले तरीही कोकणासारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील जागेसाठी तो शापच आहे.

Leave a comment