
कोकणातील शिवालयांबद्दल माझ्या मनात खूप खूप आकर्षण आहे. रानावनात एकांत स्थळी असणारी अनेक शिवमंदिरे आहेत जिथला आसमंतच आपण ध्यानस्थ व्हावं यासाठी पुरेसा असतो. पण अतिशय सुंदर समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या उंचवट्यावर बांधलेल्या प्राचीन कुणकेश्वराची महतीच न्यारी. इथं दर्शन घेताना असं वाटतं की खुद्द शिव कोकणाचा रक्षणकर्ता म्हणून इथं अधिवास करत आहे. वेंगुर्ल्याला सागरेश्वर देवस्थानही समुद्रकिनाऱ्याला लागून आहे. पण ते छोटंसं टुमदार देऊळ आहे. कुणकेश्वर मात्र भव्य आहे.. दक्षिण काशी म्हणून त्याची ओळख आहे. दर्या फिरस्तीच्या या सहलीत आपण श्री कुणकेश्वराची ऐतिहासिक माहिती घेऊया आणि काही दंतकथा काय सांगतात तेही पाहू

मी कुणकेश्वर किनारा पहिल्यांदा पाहिला २००९ नोव्हेंबरमध्ये.. ओहोटीची वेळ.. अथांग सागरनिळाई.. शुभ्र वाळूची पुळण आणि सखल भागात साचलेल्या पाण्याची चमक असं दृश्य मी तेव्हा पाहिलं होतं. मोटरसायकल वर स्वार होऊन पुणे-दापोली-तेरेखोल अशी समुद्राच्या किनाऱ्याने मी भ्रमंती केली होती तेव्हाच दर्या फिरस्तीचे स्वप्न आणि प्रवास सुरु झाला. हे वेड १२ वर्षांनीही टिकून आहे कारण अशा अप्रतिम समुद्रकिनाऱ्यांनी घातलेली भुरळ.

या ठिकाणी असलेले मंदिर हे चालुक्यकालीन होते असं इतिहासकार मानतात. शिवकाळात इतर अनेक ठिकाणांचे पुनरुज्जीवन संवर्धन झाले तसे इथेही सुरु होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबी वादळ महाराष्ट्रावर आले तेव्हा शाहआलमने इथं हल्ला केला आणि अमात्य नारोशंकर यांनी शौर्याने प्रतिकार केला असे रणजित हिर्लेकर सांगतात. या हल्ल्यात जबर जखमी झालेल्या आणि मंदिराच्या विध्वंसामुळे व्यथित झालेल्या नारोशंकरांनी इथं उडी मारून देहार्पण केले. या उडीचा उल्लेख नारोपंडिताच्या आरतीत आहे असं ते दाखवून देतात. पुढे करवीरचे छत्रपती संभाजी यांनी रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांच्याकडून कुणकेश्वराच्या जीर्णोद्धाराचे काम सिद्धीस नेले.

आपलं गलबत वादळातून वाचलं म्हणून एका अरब व्यापाऱ्याने हे मंदिर बांधले आणि मग मूर्तिपूजेचा अपराध आपल्याकडून घडला याने व्यथित होऊन जीव दिला अशी आख्यायिका कुणकेश्वराबद्दल सांगितली जाते. विविध ऐतिहासिक साधने वापरून ही दंतकथा बनावट असल्याचे रणजित हिर्लेकर सिद्ध करतात. जिथं आज अरब व्यापाऱ्याचे थडगे आहे तिथं गोमुख असलेले मंदिरच होते. ही उडी नारो नीलकंठ यांचीच होती हे संभाजी आंगरे यांच्या पत्रव्यवहारातूनही दिसते असं हिर्लेकर नमूद करतात.

देवगड आणि मिठबावच्या मध्ये कुणकेश्वर वसलेले आहे. मंदिराला चिरेबंदी आवार आहे. हा भाग शिवकालीन आहे असं इतिहासकार मानतात. आज दिसणाऱ्या मंदिराचे बांधकाम दक्षिणी पद्धतीचे आहे. ताऱ्याच्या आकाराच्या पायावर ही बांधणी केलेली दिसते. मंदिराचा सभामंडप मात्र अलीकडे बांधलेला आहे. इथं समुद्रकिनाऱ्यावर उतरून गेले की ओहोटीच्या वेळेला किनाऱ्यावरील खडकांत कोरलेली असंख्य शिवलिंगे दिसतात. स्थानिक आख्यायिकेप्रमाणे हे कोरीवकाम पांडवांनी केले असे ग्रामस्थ सांगतात. इथं जवळच एक अद्भुत गुहा आहे. कोकणातील इतिहासाचे हे एक विशेष दालन आहे असं नक्कीच म्हणता येईल. त्याबद्दलची माहिती इथं वाचा