
चिपळूण हे कोकणातील एक महत्वाचे शहर, रेल्वे स्टेशन आणि ऐतिहासिक महत्व असलेले ठिकाण. गुहागर या माझ्या अतिशय आवडत्या ठिकाणी जायला चिपळूण सोयीचे पडते. सध्या या रस्त्यावर पुलाचे आणि रुंदीकरणाचे काम सुरु आहे पण लवकरच हा मार्ग अजून उत्तम होईल अशी आशा. पण या हमरस्त्याला सोडून थोडी भ्रमंती करण्याची तयारी जर असेल तर काही नितांतसुंदर ठिकाणे पाहता येतात. असेच एक ठिकाण म्हणजे बिवली. चिपळूणहून वसिष्ठी नदीच्या पात्राला समांतर २५-३० किमी पश्चिमेकडे गेले की मालदोली नावाचे ठिकाण लागते. तिथं हल्ली नदीतून बॅकवॉटर सफारी करण्याची सोय झाली आहे. मालदोली कडे जात असताना केतकी या नावाचे गाव लागते.. नदीचे पात्र उजवीकडे ठेवत २० किमी अंतरावर श्रीराम मंदिर आहे तिथून सरळ डाव्या बाजूला बिवली कडे जाणारा रस्ता लागतो. शेवटचा काही भाग थोडा कच्चा आहे पण गाडी व्यवस्थित गावा पर्यंत जाते. गुगल मॅपमध्ये शेवटचे २००मी अंतर हे पायी जावे लागते असे दर्शवले असले तरीही कच्च्या मार्गावरून गाडी मंदिराच्या समोर पोहोचते.

पेशवाईत अतिशय कठोर न्यायदानासाठी प्रसिद्ध असलेल्या न्यायशास्त्री प्रभुणे यांच्या नंतर बिवली गावातील नीळकंठशास्त्री थत्ते यांची नेमणूक झाली. इथली लक्ष्मीकेशवाची मूर्ती थत्तेंना सापडली आणि त्यांनी बिवलीत प्रतिष्ठापना करून मंदिर बांधले. या मंदिराचा जीर्णोद्धार सन १८३० मध्ये केला गेला. (संदर्भ श्री आशुतोष बापट) थत्ते मंडळींचे हे देवस्थान कुलदैवत मानले जाते.

पद्म-शंख-चक्र-गदा अशा क्रमात मूर्तीच्या हातातील आयुधे असल्याने ही मूर्ती केशव रूप मानली जाते. कोकणात अनेक ठिकाणी अतिशय सुंदर कोरीवकाम असलेल्या विष्णूमूर्ती पाहता येतात. ११-१२व्या शतकात कोकणावर शिलाहार राजांचे शासन होते तेव्हा यापैकी बहुतांश मूर्ती कोरल्या गेल्या. लेखाच्या शेवटी इतर काही केशव शिल्पांची लिंक देतो त्याही नक्की पहा. मूर्तीच्या गळ्यातील माळेत आंबा कोरला आहे म्हणजे मूर्तिकार स्थानिकच असावा का? मूर्तीच्या पायाशी श्रीदेवी आणि नमस्कार मुद्रेतील गरुड दिसतो आणि सोबत सेविका आहेत. मूर्तीच्या हातातील कमळ हे एका बाजूने स्त्री रूपाचा आभास निर्माण करते यालाच लक्ष्मी मानले जाते. अतिशय सुंदर मुकुट, कोरीवकाम असलेली प्रभावळ आणि अगदी खरी वाटावीत अशी आभूषणे असं नाजूक कोरीवकामाने नटलेलं हे शिल्प आहे. गाभाऱ्यासमोर गरुड शिल्प आहे ते नवीन असावं. जसं शिवमंदिरात नंदी असतो तसाच इथं गरुड आहे.

कोकणातील इतर काही महत्वाच्या विष्णू शिल्पांची माहिती असलेले खालील ब्लॉग नक्की वाचा –
शेडवई श्री केशरनाथ | https://daryafirasti.com/2020/04/07/mshedwaikesharnath/ |
सडवे विष्णूमूर्ती | https://daryafirasti.com/2020/04/07/msadwevishnu/ |
सप्तेश्वर मंदिरातील मूर्ती (पंचनदी) | https://daryafirasti.com/2020/04/20/पंचनदीचा-सप्तेश्वर/ |
लक्ष्मीकेशव कोळिसरे | https://daryafirasti.com/2020/11/05/mkolisare/ |
टाळसुरे चा केशव | https://daryafirasti.com/2020/04/07/mtalsurekeshav/ |
याशिवाय संगमेश्वरच्या जवळ धामणी येथे असलेली लक्ष्मीकेशवाची मूर्तीही अगदी आवर्जून पाहावी अशी आहे.
दर्या फिरस्ती ही प्रामुख्याने समुद्रकिनाऱ्यालगतच्या कोकणची भ्रमंती आहे. परंतु कोकणाचा भौगोलिक, सांस्कृतिक पसारा हा किनारपट्टीपुरता मर्यादित नाही. सह्याद्रीच्या पश्चिमेकडील पायथ्यापासून समुद्रापर्यंतच्या ३०-४० किलोमीटर रुंद पट्ट्यात आवर्जून पाहावे असे खूप काही आहे. त्यामुळे आडवाटेवरील पण महत्त्वाच्या ठिकाणांचा आढावा दर्या फिरस्तीत घ्यायला हवा असं ठरलं. या निर्णयामुळे प्रकल्पाची व्याप्ती बरीच वाढणार आहे पण जसं जमेल तसं वर्षाला एक-दोन ट्रिप करून हे काम पूर्ण करायचं आहे.