मराठेशाहीच्या इतिहासातील एक मोठे नाव म्हणजे सेनाकर्ते बाळाजी विश्वनाथ भट पेशवे. १६६२ साली श्रीवर्धन येथे जन्म घेऊन कोकणात देशमुखी करणारे बाळाजी आपल्या कर्तृत्वाला वाव मिळावा म्हणून देशावर आले आणि मराठेशाहीच्या विस्ताराचा पाया भक्कम करण्यात मोठी कामगिरी त्यांनी बजावली. त्यांनी १७१३ ते १७२० छत्रपती शाहू महाराजांचे पेशवेपद भूषवले आणि मुघल आक्रमणातून सावरलेल्या मराठा संघराज्याला पुढची दिशा आखून दिली. श्रीवर्धन शहरात जिथं त्यांचा वाडा होता त्या ठिकाणी आता ब्रॉन्झ धातूचा सुंदर पुतळा उभारून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला आहे.

महादजी विसाजी भट म्हणजे बाळाजींचे पणजोबा. त्यांच्याकडे श्रीवर्धन व दंडाराजपुरी परिसराची देशमुखी होती. पुढे बाळाजींचे आजोबा व वडील हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चाकरीत होते असा कयास इतिहासकारांनी मांडला आहे. महादजीचे पुत्र परशुराम उर्फ शिवाजी यांचे पुत्र विश्वनाथ म्हणजे बाळाजींचे वडील. बाळाजींना कृष्णाजी, जानोजी, विठ्ठल आणि रुद्राजी असे चार भाऊ होते. वयाच्या १०-१२ व्या वर्षी त्यांचा बर्वे घराण्यातील राधाबाईंशी विवाह झाला.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर कोकणात सिद्दी बलिष्ठ झाला आणि श्रीवर्धन येथील भट कुटुंबाचा त्रास वाढू लागला. सरखेल कान्होजी आंग्रेंना सामील असल्याच्या संशयावरून जानोजी भट यांना पोत्यात बांधून समुद्रात बुडवले असे सांगितले जाते. तेव्हा काही दिवस मुरुड येथे वैशंपायन कुटुंबाकडे आश्रय घेऊन बाळाजी साताऱ्याच्या दिशेने निघाले. सोबत भानू कुटुंबही होते. नाना फडणवीस हे याच भानू घराण्यातील. वैशंपायन घराण्याने मदत केली म्हणून त्यांना कृतज्ञ भावनेतून कुलोपाध्याय नेमले गेले. एका वैशंपायन तरुणाने १२०० सैनिकांची सरदारकी मिळवली व तो मध्य प्रदेशातील सागर येथे गेला असे दिसते.
भानू कुटुंबात तीन भाऊ होते. हरी महादेव, बाळाजी महादेव आणि रामजी महादेव त्यापैकी बाळाजी महादेव हे नाना फडणवीसांचे आजोबा. १७१९ मध्ये मुघलांनी कट करून बाळाजी विश्वनाथ यांना मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आपल्या प्राणांची आहुती देऊन बाळाजी महादेव यांनी बाळाजी विश्वनाथ यांचा जीव वाचवला.
पुढे रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडे कारकून असलेल्या बाळाजींचे गुण धनाजी जाधवराव यांच्या दृष्टीस पडले आणि आपल्याकडे दिवाण म्हणून त्यांची नेमणूक करून घेतली. छत्रपती राजाराम महाराजांचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांचा लहानगा पुत्र शिवाजी गादीवर विराजमान झाला आणि महाराणी ताराबाई साहेब राज्य चालवू लागल्या. औरंगजेबाचा मृत्यू १७०७ मध्ये झाला आणि त्याचा मुलगा आझमशाहाने स्वतःला बादशहा घोषित केले व शहाआलम शी लढण्यासाठी तो उत्तरेस निघाला. त्यावेळी झुल्फीकारखानाच्या सल्ल्याने त्याने छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांची सुटका केली. येसूबाई मात्र कैदेतच राहिल्या. त्यानंतर ताराराणी आणि छत्रपती शाहूंच्या पक्षात सत्तासंघर्ष झाला. धनाजी जाधवांना बाळाजी विश्वनाथांनी शाहू पक्षात आणले. तिकडे कान्होजी आंगरे ताराराणींच्या पक्षात होते. त्यांनी राजमाची आणि लोहगड जिंकला.. कान्होजींचे पारिपत्य करायला छत्रपती शाहूंनी पेशवा बहिरोपंत पिंगळेंना ससैन्य पाठवले. पण कान्होजी आंगरेंनी त्यांचा प्रभाव करून पेशव्याला कैद केले. त्यानंतर बाळाजी विश्वनाथांनी छत्रपती शाहू महाराजच मराठेशाहीचे योग्य वारसदार असून त्यांचे सहकार्य लाभले तर कान्होजी आंगरे कोकणावर वर्चस्व निर्माण करू शकतील हे त्यांना पटवून दिले आणि छत्रपती शाहू महाराजांची बाजू बळकट झाली. १७१८ साली थोरला मुलगा बाजीराव यासह बाळाजी विश्वनाथ यांनी दिल्ली मोहीम काढली सय्यद बंधूना फर्रुखसियरला पदच्युत करून रफीउद्दौजरात ला बादशाह करण्यास साहाय्य केले. त्या मोबदल्यात सनदा, चौथाईचा हक्क घेऊन बाळाजी विश्वनाथ पेशवे साताऱ्याला आले. खर्च वजा जातात ३० लाखांची मिळकत त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना नजर केली. याचवेळी महाराणी येसूबाई साहेब आणि राजपरिवाराची सुटकाही करण्यात आली. दिल्ली मोहिमेनंतर आजारी पडलेल्या बाळाजी विश्वनाथ पेशव्याचे १७२० साली निधन झाले आणि थोरले बाजीराव वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी पेशवेपदावर नियुक्त झाले.
संदर्भ – विकिपीडिया सौरभ वैशंपायन यांचे संकलन