
कोकण किनारपट्टी आणि गणपती बाप्पा यांचं नातं अतूट आहे. इथं गणेशोत्सव मोठ्या आनंदात, उत्साहात, जल्लोषात साजरा केला जातो. कोकणात अनेक ठिकाणे आहेत जिथं श्रीगणेशाचा अधिवास आहे. त्याची कायमस्वरूपी पूजा अर्चना केली जाते. अशी २१ ठिकाणे आज आपण या दर्या फिरस्ती ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात पहिली प्रतिमा आहे गणपतीपुळे आणि जयगडच्या मध्ये कचरे येथे असलेल्या जयविनायक मंदिरातील भव्य गणेशमूर्तीची

वेंगुर्ला तालुक्यात रेडी किनाऱ्याला खाणकाम चालते. तिथं सदाशिव कांबळी नामक एका गणेश भक्ताला खाणीच्या भागात श्री गणेशाची मूर्ती पुरलेली आहे असा दृष्टांत झाला आणि मग खरोखरच तिथं खोदकाम केल्यानंतर अशी मूर्ती सापडली व समुद्र किनाऱ्याला लागून असलेले हे गणपतीचे स्थान निर्माण झाले असे स्थानिक लोक सांगतात. मूर्ती मिळाल्यानंतर दोन महिन्यांनी मूषक मूर्ती सुद्धा सापडली.

गणपती म्हणजे विघ्नहर्ता. भक्तांना संकटातून सोडवणारी देवता. उफराटा गणपती असं वैचित्रपूर्ण नाव असलेल्या गुहागरमधील गणेश मंदिराची अशीच कहाणी आहे. गुहागरचा सागरतीर शांत, नीरव.. पाण्यात डुंबण्यासाठी तसा सुरक्षित मानला गेलेला. पण कोणे एके काळी, कदाचित ५०० वर्षांपूर्वी समुद्राला उधाण आले. खवळलेला समुद्र गुहागर ग्राम गिळंकृत करेल की काय असं वाटू लागलं. तेव्हा कोण्या भक्ताने श्री गणेशाला साकडं घातलं. पूर्वाभिमुख असलेल्या गणेशाने आपलं तोंड फिरवून पश्चिमेला समुद्राकडे केलं आणि तेव्हा कुठं सागराचे थैमान संपले अशी ही गोष्ट आहे. दिशा बदलून बसलेला म्हणून उफराटा गणपती असे नाव प्रचलित झाले. परंतु व्याडेश्वर माहात्म्य ग्रंथात श्रीधराने गुहागर वसवले तेव्हापासून ही मूर्ती पश्चिमाभिमुख आहे अशी नोंद आहे.

हे आहे कुलाबा किल्ल्यातील सिद्धिविनायक गणेश मंदिर. या मंदिराचे बांधकाम रघुजी आंग्रे दुसरे यांनी १७६१ साली केले. मंदिराजवळ असलेली दीपमाळ खूप सुंदर आहे. इथं केलं गेलेलं कोरीवकाम नक्की पाहायला हवं. मला इथं पाहिलेलं तुळशी वृंदावन खूपच आवडलं होतं. इथं बाजूलाच शिवमंदिर आणि हनुमान मंदिरही आहे.

गुहागरकडून तवसाळकडे जाणाऱ्या रस्त्यावर म्हणजेच सागरी महामार्गावर हेदवी गावा नंतर दगडी बांधकाम केलेलं गणेश मंदिर दिसतं. ते म्हणजे हेदवीचे दशभुज गणेश मंदिर. हे मंदिर पेशवेकालीन असावे आणि माधवराव पेशव्यांच्या काळात ते बांधले गेले असावे असा कयास आहे. केळकर स्वामी नामक गणेशभक्त गृहस्थांनी पेशव्यांच्या कृपेने हे मंदिर उभारले आणि उर्वरित रकमेत हरेश्वराचे मंदिर गावात बांधले. मी गेलो होतो तेव्हा मंदिरात पूजा सुरु होती त्यामुळे आतून फोटो काढता आले नाहीत. सभामंडपात जय-विजय द्वारपाल रूपात दिसतात तिथेच केळकर स्वामींच्या पादुकाही आहेत. मंदिरासमोर अतिशय सुंदर अशी दगडी दीपमाळ आहे.

कोकणात जात असताना अनेकदा पालीमार्गेच जाणे होते आणि अशा वेळेला श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊनच पुढील प्रवास होतो.

एलिफंटा लेणे म्हणजे एक प्रचंड मोठे शिवालयच. तिथं खांबावर कोरलेल्या गणेशप्रतिमा सुबक आहेत.

या विहिरींच्या जवळच एक गणेश मंदिर आहे. त्याच्या दोन दीपमाळांपैकी एक सुस्थितीत असून एकाचे तुकडे तिथेच विखुरलेले दिसतात. मंदिरातील गणेश मूर्ती पाहून प्रसन्न वाटते. तिथंच काही क्षण बसून ध्यानस्थ होण्याची अनिवार इच्छा मला झाली.

आवासचे हे देवस्थान स्वयंभू गणेश मंदिर म्हणूनही ओळखले जाते. आवास गावाचे नाव खांदेरीवर तैनात असलेल्या आबासिंग नामक सरदाराच्या नावावरून पडले अशीही एक आख्यायिका आहे पण तिला लिखित आधार नाही. स्वयंभू मूर्तीबरोबरच या मंदिरात पाहण्यासारखी विशेष गोष्ट म्हणजे मंदिराच्या आत असलेले नाजूक लाकडी कोरीवकाम केलेले खांब. श्री गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर हे खांब आवर्जून पाहायला हवेत.

१८९० साली बांधले गेलेलं हे फडके गणपती मंदिर, मुंबईतील आद्य गणेशस्थानांपैकी एक म्हणावे लागेल.

मुंबईतील प्रभादेवी येथे असलेलं श्री सिद्धिविनायक मंदिर. आज इथं विसाव्या शतकात बांधलेली इमारत दिसते पण प्रथम मंदिर इथं १८०१ साली बांधलं गेलं होतं असं सांगितलं जातं.

मुंबईतील सर्वात जुनी श्री गणेशाची मूर्ती कुठं आहे असं कोणी विचारलं तर उत्तर आहे जोगेश्वरी लेण्यातील हे गणेश शिल्प. जवळजवळ ४-५व्या शतकातील ही गजाननाची प्रतिमा.

पन्हाळेकाजी लेण्यातील ही भव्य गणेशप्रतिमा अतिशय आकर्षक रीतीने कोरण्यात आलेली आहे.

पन्हाळेकाजीजवळच असलेल्या गौर लेण्यातही गणेशप्रतिमा पाहता येते. तिथं रिद्धी-सिद्धी श्रीगणेशाच्या सोबत आहेत.

दापोलीजवळ आंजर्ले येथे असलेला कड्यावरचा गणपती म्हणजे पेशवेकालीन स्थापत्याचा एक उत्कृष्ट अविष्कार आहे. या ठिकाणाहून समुद्र आणि सभोवतालच्या परिसराचे अतिशय सुंदर दृश्य दिसते.
दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मंदिरात पूर्वी सोन्याची गणेशप्रतिमा होती. नंतर दुर्दैवाने दरोड्यात ती नष्ट करण्यात आली. आता ग्रामस्थांनी तिथं अतिशय सुंदर मंदिर उभारले आहे आणि तशी चांदीची प्रतिमा स्थापन करण्यात आली आहे.

काशीद आणि मुरुडच्या मध्ये असलेल्या नांदगाव येथे श्री सिद्धिविनायक मंदिरात अतिशय मांगल्यपूर्ण वातावरण अनुभवता येते.

केळशी प्रसिद्ध आहे श्री महालक्ष्मी मंदिरासाठी, परंतु इथं अतिशय सुरेख असं आशापूरक सिद्धिविनायक गणपतीचं पेशवेकालीन मंदिरही आहे.

रायगड जिल्ह्यातील चौल हे खूप प्राचीन ठिकाण. इथं असलेलं मुखरी गणेश मंदिर आवर्जून पाहायला हवं.

कोकणातील कदाचित सर्वात प्रसिद्ध असलेलं गणेशमंदिर म्हणजे गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर असलेलं बाप्पाचं मंदिर.

पावसहून पूर्णगडाच्या दिशेने जात असताना उजवीकडे एक फाटा समुद्रकिनारी असलेल्या गणेशगुळे गावात घेऊन जातो. वाटेत स्वयंभू गणपतीचे मंदिर लागते. गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला अशी आख्यायिकाही इथं सांगितली जाते. कोकणातील अशा अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टीने महत्वाच्या ठिकाणांची भ्रमंती आमच्या या दर्याफिरस्ती ब्लॉगद्वारे तुम्ही करू शकता. तेव्हा नेहमी इथं या ही अगत्याची विनंती. आपल्या मित्रांना, कोकणवेड्या भटक्यांनाही दर्याफिरस्तीबद्दल आवर्जून सांगा बरं का!
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात पाली पासून साधारण तीन किमी अंतरावर सिद्धेश्वर मंदिर आहे तसे गावाचे नाव पण सिद्धेश्वर आहे.. जवळच २१ गणपती बाप्पा आहेत..
नाडसुड फाटा म्हणता येईल.