कोकणातील चिपळूण तालुक्यात सावर्डे जवळ मुंबई-गोवा महामार्गापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर तुरंबव नावाच्या ठिकाणी शारदा देवीचे राजस्थानी पद्धतीचे अतिशय सुंदर मंदिर आहे. या मंदिराची जागा सर्व बाजूंनी वनराई आणि डोंगर असलेल्या ओंजळीमध्ये आहे इथला नवरात्र उत्सव विशेष उत्साहाने साजरा केला जातो.

संतती प्राप्तीच्या नवसाला पावणारी देवता म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे नवरात्र उत्सवात नऊ दिवसांची यात्रा येथे असते देवीचा जागर म्हणून जाखडी नृत्य भजन असे अनेक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम येथे होतात गौराईचा नवस इथं तिसऱ्या दिवशी सुरू होतो त्यामध्ये दर्शन व देवीची ओटी भरणे असे कार्यक्रम असतात.

मंदिरात शारदा देवी सह मानाई देवी वरदायिनी देवी आणि चंडिका देवीच्या ही मूर्ती आहेत इथल्या परंपरेनुसार स्थानिक गुरव गावकर यांच्याकडे दैनंदिन पूजा आर्चीचा मान आहे तिथे रोज सांज आरती केली जाते. अशी मान्यता आहे की हे कोकणातील सरस्वती किंवा शारदादेवीचे एकमेव मंदिर आहे. परंतु मी हल्लीच हिंदळे आणि मोरवेच्या मध्ये एक छोटेसे सरस्वती मंदिर पाहिले.

देवगड तालुक्यात हिंदळे जवळ तावडेवाडी नावाचं गाव मोरवे च्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यात लागतात तिथं हे 1951 सालात स्थापन केलेलं मंदिर मला दिसलं दुर्दैवाने दुपारची वेळ असल्याने आणि मंदिराला कुलूप असल्याने अधिक माहिती मिळाली नाही. देवी शारदेची कोकणातील अजून काही मंदिरे जर तुम्हाला ठाऊक असतील तर दर्या फिरस्तीला नक्की कळवा. कोकणातील दृश्य संस्कृतीचे दस्तऐवजीकरण करणे हा आमचा हेतू असून तुमच्या मदतीने हा संकल्प नक्की सिद्धीस जाईल.