Darya Firasti

गणेशगुळेचा दामोदर

कोकणातील अनेक विलक्षण सुंदर गावांपैकी एक म्हणजे गणेशगुळे. इथलं गणपती मंदिर तसे प्रसिद्ध आहेच. गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला ही म्हणही अनेकांना ठाऊक असते. पण समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या वनराईत दडलेलं लक्ष्मी नारायणाचे देऊळही अगदी खास. समुद्र भ्रमंतीतून वेळ काढून मुद्दाम जावं असं हे ठिकाण. म्हंटलं तर कोकणातील गावांमध्ये दोन अडीचशे वर्षे जुनी शंकर किंवा विष्णूची मंदिरे असतात तसं दिसणारं अगदी टिपिकल देऊळ.. म्हंटलं तर इथल्या शांत रम्य आसमंतात एक वेगळा अध्यात्मिक अनुभव देणारं हे ठिकाण. कोकणात मी अनेक ठिकाणी श्री विष्णूच्या मूर्ती पाहिल्या आहेत. इथली मूर्तीही निदान मध्ययुगीन तरी असेलच. पेशवेकालीन मंदिर स्थापत्यात दिसणारा लाकडाचा वापरही इथं दिसतो.

गणेशगुळे गावात समुद्रकिनाऱ्याला समांतर रस्त्याने उत्तरेकडे गेले की एक बाव येते. तिला डावीकडे ठेवत डांबरी रस्त्याने सुमारे दीड किमी चालत आपण मंदिर परिसरात येतो. समुद्र सपाटीपासून २० मीटर उंचीवर असलेल्या झाडीत या देवळाचा परिसर लपलेला आहे. इथल्या फळबागा आणि घरांच्या मधून जाणाऱ्या या रस्त्याने चालत असताना आपल्याला पक्षांचे आवाज येतात.. गुरांशी भेट होते.. गावातल्या कुत्र्या मांजरांना रामराम करता येतो.. पानांच्या जाळीतून झिरपत असलेल्या सोनेरी किरणांची ऊब अंगावर घेत आपण पंधरा मिनिटांत मंदिर परिसरात दाखल होतो.

मंदिर परिसरात आल्यावर सगळ्यात आधी समोर दिसतात इथल्या उंच दगडी दीपमाळा. कोकणी शैलीतील या दीपमाळांची प्रमाणबद्धता आणि भौमितीय रेखीवपणा बरोबरच जांभा दगडाचे खडबडीत रूप शोभून दिसते. तिथे जवळच मंदिराशी संलग्न पटवर्धन घराण्यातील पूर्वजांची समाधीही दिसते.

विष्णुमंदिराच्या समोरच त्याचे वाहन असलेल्या गरुडदेवतेची मूर्ती आणि हनुमानाची मूर्ती आपले लक्ष वेधून घेते. मूळ मंदिर पाचशे वर्षे तरी जुने असावे असे स्थानिक मानतात. अर्थात आज तिथं दिसणारे बांधकामे सुमारे दोनशे ते अडीचशे वर्षे जुने असू शकेल. एकाच वास्तूत काळाच्या विविध पिढ्यांच्या पाऊलखुणा आपल्याला पाहता येतात.

मंदिराला लागूनच श्री शंकराचे देऊळही आहे. जांभा दगडाच्या तटबंदीत दोन्ही देवळे संरक्षित करण्यात आलेली आहेत. आवारात एक खोल विहीर आहे. त्यातील पाण्यात आकाशाचे प्रतिबिंब छान दिसते. कोकणातील अशा विहिरींना एक गूढता आणि अद्भुततेचे वलय असते असे मला नेहमी वाटते.

मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करण्यापूर्वी तिथं ग्रामस्थ मंडळी सुतारकाम करत असलेली दिसली. या पुरातत्व वारशाचे जतन करण्यासाठीची कळकळ आणि ते करत असताना लाकडी कोरीव बांधकामाच्या मूळ रुपाला कोणताही धक्का न लावता ते करण्याची दक्षता या दोन्ही गोष्टी पाहून स्थानिकांचे खरंच खूप कौतुक वाटले. मंदिराच्या सभामंडपात गेल्यावर गर्भगृहावर छत्र धरलेल्या लाकडी सभामंडपाची भव्यता जाणवली. पताकांनी सजवलेला मंडप फारच सुंदर दिसत होता.

मंदिरात लक्ष्मी-विष्णूच्या दोन मूर्ती आहेत. दोन्हींमध्ये श्री विष्णू देवी लक्ष्मी वाहन गरुड दिसतात. जुनी मूर्ती बाहेर कोनाड्यात ठेवली आहे आणि गर्भगृहातील मूर्ती तुलनेने नवीन असावी…जुनी मूर्ती विसर्जन करण्याऐवजी बाहेर कोनाड्यात ठेवतात काही ठिकाणी. जुन्या मूर्तीच्या प्रभावळीत आपल्याला दशावतार कोरलेले दिसतात. इथे पद्म शंख गदा चक्र हा क्रम दिसतोय, म्हणजे ही दामोदराची मूर्ती ठरते. जिथं विष्णूच्या मांडीवर लक्ष्मी दिसते तिथं लक्ष्मी-विष्णू म्हणायची प्रथा आहे असं भारतविद्या तज्ज्ञ आशुतोष बापट सांगतात.

पुन्हा त्याच मार्गाने पायपीट करून आम्ही समुद्रकिनाऱ्याला लागूनच असलेल्या आमच्या विला मँगो मध्ये आलो. शतकभर तरी जुने असलेले घर सुंदर पद्धतीने जतन करून तिथं एक छानसा स्टे केलाय त्यामुळे नक्की तिथं राहण्याचा अनुभव घ्यावा. फक्त पूर्ण विला बुक केलात तर या अनुभवाचा आनंद जास्त चांगला मिळेल असे मला वाटते. तिथे बाजूलाच ओनेस्ट हॉटेल्स चे ओशियानो पर्ल रिसॉर्ट आहे तिथेही आम्ही राहिलो. इंटरनेट ची परिस्थिती सुधारली तर गणेशगुळे एक उत्तम वर्क-फ्रॉम-कोकण गाव होऊ शकेल असे प्रकर्षाने वाटते.

परत समुद्रकिनाऱ्यावर आलो तेव्हा एक विलक्षण सूर्यास्त या स्वच्छ सुंदर सागरतीरावर पाहायला मिळाला. केसरीया रंगाचे वस्त्र परिधान केलेला सूर्यनारायण आकाशात किरणांची उधळण करत दिमाखात क्षितिजरेषेकडे झेपावत होता. कोकणातील अशाच समृद्ध करणाऱ्या अनुभवांचे संकलन आम्ही दर्या फिरस्तीच्या माध्यमातून करतो आहोत. नक्की वाचा आणि तुम्हाला आवडले तर जरूर मित्र आप्तेष्ट आणि इतर कोकण प्रेमी मंडळींना पाठवा.

Leave a comment