Darya Firasti

निढळेवाडीचा आरमारी वारसा

या शब्दांत शिवरायांनी त्यांचा संकल्प स्पष्ट केला आहे. शिवपूर्व काळात पोर्तुगीजांच्या ४०-५० वसाहती हिंदी महासागराच्या विविध भागांत पसरल्या होत्या. पोर्तुगीज राजा स्वतःला हिंदी महासागराचा स्वामी म्हणवत असे आणि भरपूर रक्कम घेऊन काही मर्यादित जहाजांना समुद्र भ्रमंतीचे परवाने म्हणजे कार्ताझ दिले जात असत. शिवाय इंग्लिश, डच, फ्रेंच, जंजिरेकर सिद्दी अशा सत्तांचा ताप होताच. ही परिस्थिती शिवरायांच्या द्रष्टेपणाने बदलली आणि पुढे सरखेल कान्होजी आंग्रेंच्या काळात इतर कोणाचे परवाने न घेता मराठे स्वतःचा कौल जहाजांना देऊ लागले. फक्त वसईतून मराठ्यांनी ७ लक्षांचा महसूल मिळवला.

इंग्लिशांच्या १५ ऑगस्ट १६७४च्या  कागदपत्रात या आरमाराचा दर्जा अगदी हीन आहे, या नौका हलक्या आणि क्षुद्र आहेत, इंग्लिश फ्रिगेट्स समोर टिकणार नाहीत अशी घमेंड दिसते. पुढं १६७९ मध्ये हीच हीन गलबते वापरून मराठ्यांनी  भर पावसाळ्यात सुसज्ज इंग्लिश आरमाराच्या नाकावर टिच्चून खांदेरी बांधून काढला आणि त्यावरील अनेक आक्रमणे परतवली. शेवटी मराठ्यांचे खांदेरीवरील स्वामित्व त्यांना मान्य करावे लागले.

संगमेश्वरातून रत्नागिरीच्या दिशेने जात असताना शास्त्री नदीच्या काठावर निढळेवाडी नावाचे एक गाव दिसते. याचे नाव पूर्वी वाडा निढळ होते. छत्रपती शिवरायांच्या काळात इथं जहाज बांधणी सुरु झाली ती अगदी हल्ली हल्ली फायबरच्या नौकांचा वापर वाढेपर्यंत सुरु होती. या परिसरात कैक पिढ्या राहिलेले वाडकर कुटुंबीय सांगतात की त्यांच्या कुळाला शिवाजी महाराजांनी गुहागरजवळील जामसुद येथून आणून इथं वसवले आणि संगमेश्वरी नौका बांधण्याची जबाबदारी त्यांच्या पूर्वजांकडे सोपवण्यात आली. हॉटेल मैत्री पार्कच्या मागच्या बाजूला नदीकडे चालत गेले की ही जागा सापडेल.

आता फायबरच्या बोटी जास्त प्रचलित आहेत आणि लाकडी संगमेश्वरी नौका बांधल्या जात नाहीत. आम्ही २०२१च्या जुलै महिन्यात इथं एक अर्धवट बांधलेली बोट पाहिली. छत्रपती शिवरायांचे स्मारक म्हणून सगळीकडे पुतळे बांधत सुटण्यापेक्षा तिथे मराठा आरमारातील नौकांची मॉडेल्स बांधली आणि त्यावर तोफा, बंदुका, तलवारींच्या प्रतिकृती असलेली संग्रहालये केली तर मराठा आरमाराच्या वारशाला समर्पक असे स्मारक होऊ शकेल. प्रचितगडाच्या उतारावरून वेगाने सिंधुसागराकडे झेपावणारी शास्त्री नदी संगमेश्वर मार्गे तवसाळ-जयगडाच्या मध्ये समुद्राला जाऊन मिळते. एकेकाळी संगमेश्वर एक महत्त्वाचे बंदर होते आणि तिथून व्यापारी आणि लष्करी वाहतूक होत असे. आज नदीच्या शांत पात्रात पाय सोडून दोन्ही तीरावरील गर्द वनराई पाहत बसायचे.

या नौकांचे वैशिष्ट्य म्हणजे यांच्या बांधणीत खिळ्यांचा वापर केला जात नाही. नौकेच्या आकाराप्रमाणे लाकडाच्या फळ्या कापून त्यांना गरम केल्यानंतर विशिष्ट कोणामध्ये बाक दिला जातो. टीक लाकडाचा वापर करून या नौका बांधल्या जातात छत्रपती शिवरायांच्या काळात नौकेसाठी लाकूड मिळवत असताना फणस आंबा नारळ अशा शेतकऱ्यांना उत्पन्न देणाऱ्या झाडांच्या लाकडाचा वापर टाळण्याबद्दल शिवराय आग्रहाने आज्ञापत्रात सांगतात. या श्रेणीच्या झाडांचे जुने लाकूड घेता नाही शेतकऱ्याला किंवा बागायतदाराला त्याच्या परवानगीने आणि रास्त मोबदला देऊनच लाकूड घ्यायचे अशी सक्त ताकीद छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या नौदलाला दिली होती.

समुद्रामध्ये बोटीचे लाकूड नीट राहावे यासाठी विविध प्रकारच्या तेलांचा वापर केला जात असे नारळाचे तेल गोडेतेल, कडू तेल आणि चंद्रूस एकत्र उकळून केलेला पदार्थ अशा विविध गोष्टी वापरल्या जात असत. अशाप्रकारे संगमेश्वरी जहाजाप्रमाणेच शिबाड पाल गलबत फतेमार अशा विविध प्रकारांच्या जहाजांची निर्मिती मराठ्यांनी आपल्या नौदलासाठी केली ही जहाजे आज आपल्या नाविक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहेत.

Leave a comment