
या ब्लॉगचे प्रायोजक सिद्धेश काजरेकर आहेत. न्यू जर्सी येथील सिद्धेश यांच्या योगदानातून लक्ष्मी नारायण मंदिर, गुहागरचे चित्रण होऊ शकले.
गुहागर म्हंटलं की डोळ्यासमोर येतं ते व्याडेश्वराचे प्रशस्त देवालय आणि सुंदर समुद्रकिनाऱ्याला लागून वसलेलं एक अतिशय विलक्षण पर्यटन स्थळ. गुहागर म्हणजे व्याडेश्वर हे ऐतिहासिक समीकरण नाकारता येणार नाहीच, परंतु या ठिकाणी इतरही अनेक अतिशय प्रेक्षणीय मंदिरे आहेत ती सुद्धा आवर्जून पाहायला हवीत. त्यापैकी एक म्हणजे लक्ष्मीनारायण मंदिर. पेशवेकालीन बांधणीचे हे मंदिर म्हणजे मराठा शैलीच्या बांधकामाचा परिचय करून देणारी एक खास वास्तू आहे असं म्हंटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.
गुहागरातून असगोळी कडे जाणाऱ्या रस्त्यावर लक्ष्मीनारायण मंदिराचे शिखर आपले लक्ष वेधून घेते. सध्या (२०१९) या मंदिराला लाल रंगात रंगवून ताजे टवटवीत केले गेले आहे. पेशवाईतील एक महत्वाचे सरदार हरिपंत फडके यांनी हे मंदिर बांधले असे सांगतात. परंतु विश्वनाथ महादेव शास्त्री यांनी १७ व्या शतकात लिहिलेल्या श्री व्याडेश्वर माहात्म्य या ग्रंथात या ठिकाणाचा उल्लेख आहे म्हणजे हे स्थान प्राचीन असावं.

मंदिराचे गर्भगृह आणि सभामंडप वरून ड्रोनने पाहिल्यास बांधणीतील गुंतागुंत आणि विविध कोनांतून विविध थरांच्या रचनेतून साधलेला प्रमाणबद्ध परिणाम लक्षात येतो. या पद्धतीत कोरीवकामातून साधलेल्या सजावटीपेक्षा भौमितीय रचनेतून एक वेगळी सौंदर्य दृष्टी दृष्टी अभिकल्पित केलेली दिसते. हे वैशिष्ट्य कोकणातील अनेक समकालीन मंदिरे पाहत असताना आपल्याला जाणवते.

मंदिरातील संगमरवरी मूर्ती ही श्री विष्णू लक्ष्मीची असून तिथेच गरुड मूर्तीही दिसते. या मूर्ती हरिपंत फडकेंनी पुण्याहून घडवून आणल्या होत्या असे सांगितले जाते. दगडी बांधकाम असलेल्या या मंदिराच्या सभामंडपात थंड वाटते. काही मिनिटे शांत बसून ध्यानस्थ होण्यासाठी हे अतिशय उत्तम ठिकाण आहे.

इस्लामी धाटणीच्या कमानी आणि दगडी भिंतीमध्ये घडवलेले अलकोव (भिंतीत आत जाणारी पोकळी) अशी वेगळ्या प्रकारची बांधणी इथं दिसून येते. पेशवेकालीन मंदिरांमध्ये असं वेगळेपण दिसतं. खरंतर आपल्याकडे मंदिर जितकं प्राचीन असेल तितकं त्याला दिलं जाणारं महत्त्व वाढतं परंतु पुरातत्व दृष्टीने अठराव्या एकोणिसाव्या शतकात झालेल्या या रचना अभ्यासल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटतं. या काळातील मंदिरांबद्दल अभ्यासक जॉन मिशेल काय म्हणतो ते पाहू –
Polygonal spired temples in Maharashtra and beyond – Another region which witnessed the evolution of unusual towered monuments is Maharashtra, where the Marathas commissioned a profusion of distinctive Hindu monuments in the 18th and 19th century. The typical Maratha temple is crowned with a twelve-sided, slender, tapering spire, constructed from plastered brickwork. The origin of this twelve-sided spire is obscured, being altogether unknown in the earlier temple architecture of Maharashtra and the adjacent zones. Such spires are usually relieved by superimposed tiers of Mughal styled niches headed by Bangla cornices, and crowned with diminutive petalled domical finials. Cubical turrets with Bangla cornices carrying curving Shikhara like towers often appear at rooftop corners. (Late temple architecture of India – 15th-19th centuries – George Michell. page no. 113 Innovations)

या ठिकाणी असलेली एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे खिडकीत असलेली जाळी. दुरून पाहिले तर खिडकीला जाळी आहे एवढंच दिसतं लक्षपूर्वक पाहिलं की समजतं हा नाग फॉर्म आहे आणि त्याच्या वेटोळ्यातूनच जाळीची निर्मिती केली गेली आहे.

मंदिरासमोर पुष्करणी तर मागच्या बाजूला विहीर आहे. कोणतेही ठिकाण पाहताना आपल्याला किती आनंद मिळेल हे त्या ठिकाणच्या सौंदर्याबरोबरच ते पाहण्याची आपली कुवत किती यावरही अवलंबून असते. आपण जितकं खुल्या दृष्टीने आणि बारकाईने पाहू तितकं नवं काही गवसत जातं. पूर्वी मी केवळ फोटोग्राफी करण्यासाठी भटकंती करत असे तेव्हा अनेक गोष्टी न पाहता काही चांगल्या फ्रेम्स मिळाल्या की पुढे निघायचो. डिझायनर म्हणून प्रशिक्षण घेतल्यानंतर माझ्यात रचना, त्यासाठी वापरलेली साधने, सजावटी साठी वापरलेल्या आकृती याबद्दल कुतूहल निर्माण झालं.

साधारणपणे प्राचीन ते सुंदर असं आपण मानतो. कोकणात कर्णेश्वर सोडलं तर खूप प्राचीन मंदिरे पटकन डोळ्यासमोर येत नाहीत. पण अनेक पेशवेकालीन मंदिरे आहेत ज्यांच्याबद्दल सविस्तर संशोधन होण्याची गरज आहे. कोकणातील अशा वैविध्यपूर्ण ठिकाणांची चित्र भ्रमंती करण्यासाठी आमच्या या ब्लॉगला भेट देत रहा हे अगत्याचे आमंत्रण. आणि ब्लॉग आवडला तर फेसबुक, व्हाट्सअप वर शेयर करायला विसरू नका.