चौलजवळ बागमळा परिसरात एका टेकडीवर महालक्ष्मीचे एक अतिशय सुंदर मंदिर आहे. हे मंदिर पर्यटकांच्या यादीत नाही. रायगड जिल्हा गॅझेट आणि आंग्रेकालीन अष्टागर या दोन्ही संदर्भात मला याची विशेष माहिती मिळाली नाही. परंतु दोन घुमट असलेले हे मंदिर अठराव्या किंवा एकोणिसाव्या शतकातील बांधकाम असावे असा माझा बांधकामाच्या शैलीवरून केलेला अंदाज आहे

नागाव पेट्रोल पंपाच्या जवळ एक पूर्वेकडे जाणारा रस्ता आहे तिथं हे देऊळ काही अंतरावर आहे. सुमारे पन्नास ते साठ पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण मंदिराच्या शांत रम्य परिसरात पोहोचतो.

मंदिराजवळ पोहोचले की लक्ष वेधून घेते ती इथली कोकणी पद्धतीची दीपमाळ. यावरील हनुमान प्रतिमा हे दीपमालेचे वैशिष्ट्य म्हणता येईल. परिसरात काही तुळशी वृंदावनेही आहेत… ही सतीची वृंदावने असावीत असा काही अभ्यासकांचा कयास आहे. पण त्याला काही ठोस शिलालेखासारखा आधार इथं सापडला नाही.


या मंदिराचे जुनेपण त्याच्या घुमटाखाली असलेल्या alcove मधून दिसते. अशा प्रकारची भौमितीय नक्षी अनेकदा इस्लामी बांधकामांमध्ये दिसते. पण दीडशे दोनशे वर्षे जुन्या मराठा बांधकामातही अनेकदा त्यांचा वापर केलेला आढळतो.

सुंदरे गुणमंदिरे करुणाकरे कमलोद्भवे |
सिद्धचारण पूजिती जनवंदिते महावैश्णवे ||१||
त्राहि हो मज पाही हो मज पाही हो महालक्ष्मी |
हेमभावन रत्नकोन्दण हे सिंहासन आसनी ||२||
कृष्णकेशव नामक मराठी साहित्यिकाने रचलेले महालक्ष्मी स्तोत्र म्हणत इथल्या प्रसन्न मूर्तीची आराधना करायची.

एक एक विचित्र माणिक जोडिले मुकुटावरी | त्यासि देखुनी लोपला शशि चालला गगनोदरी ||३|| कुण्डले श्रवणी रवि शशि मंडळासम वर्तुळे | डोलता सुरनायकावरि हालताती चंचले ||४|| कंचुकी कुचमंडळावर हार चंपक रुळती | पारिजातक शेवती बटमोगरा आणि मालती ||५|| पिवळा पट तो कटी तटी वेष्टिल्या बरवे परी | सौदामिनीहुनी तेज अधिक ते शोभते उदरावरी ||६|| कमुकावर मन्मथे शरसज्जिल्या तैशा निर्या | गर्जती पद पंकजी किती नुपुरे आणि घागर्या ||७|| इंद्र चंद्र महेंद्र नारद पाद पंकज अर्पिती |
कुंकुमागुरु कस्तूरी किती आदरे तुज चर्चिती ||८|| निर्जळे तुज पूजिता बहु शोभिसी कमलासनी | किती हो तुज वर्णु मी मज पाव हो कुलस्वामिनी ||९|| कोटि तेहतीस देवतांसवे घेऊनी विन्झणे करी | चामरे चिरपल्लवे तुज ढाळिती परमेश्वरी ||१०|| नामामृत दे निरंतर याचकाप्रती गिरीसुते | जोडुनी कर विनवितो मज पाव हो वरदेवते ||११|| संकटी तुज वाचुनी मज कोण रक्षिल अम्बिके |
कृष्णकेशव प्रार्थतो मज पाव हो जगदम्बिके ||१२||
|| जय जगदम्ब | उदयोस्तु | अंबे उदयोस्तु ||