Darya Firasti

कनयाळे ची नवदुर्गा

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वात दक्षिणेला आहे वेंगुर्ला तालुका आणि त्याच्या दक्षिण टोकाला रेडी गाव. तिथला स्वयंभू गणेश बराच प्रसिद्ध आहे. पण तिथून तेरेखोल-गोव्याच्या दिशेने जात असताना कनयाळे गावात नवदुर्गेचे अतिशय सुंदर देऊळ आहे. रेडी तलाव आणि खाणीच्या अलीकडे असलेल्या वनराईत हे देऊळ आहे. तेरेखोलच्या दिशेने जाणाऱ्या उतारावर उजव्या बाजूला हे देऊळ दिसते.

कोकणातील देवळांमध्ये सजावट पाहत असताना काही न काही नवीन गवसत असते. इथं मंदिर देवीचे असले तरीही सभामंडपात प्रवेश करण्याआधी महाभारतातील श्रीकृष्णाची अतिशय सुंदर अशी दोन चित्रे दिसतात. एक कुरुक्षेत्री गीता सांगतानाचे दृश्य तर दुसरे विश्वरूप दर्शनाचे. कोकणात गावोगावी इतके प्रतिभावंत कलाकार आहेत की अशा ठिकाणी दृश्य कला आणि अभिकल्पनेची विद्यापीठे नाहीत हे दुर्दैवच म्हंटले पाहिजे.

ही नवदुर्गा मूळची गोमंतकातील गावसची. पोर्तुगीजांच्या धार्मिक दहशतीचे जेव्हा तिथं थैमान सुरु होते तेव्हा देवी भक्त ग्रामस्थ मंडळी मूर्ती घेऊन उत्तरेकडे निघाली. कनयाळे गावाजवळ ती मूर्ती जड झाली म्हणून तिची स्थापना इथं केली गेली अशी आख्यायिका आहे. गावस घराण्यातील पाच घरे आता उभा-दांडा वेंगुर्ला येथे आहेत अशी माहिती प्राध्यापक प्र के घाणेकरांच्या पुस्तकात आहे. सभामंडपातील छतावर लाल रंगात रंगवलेली नक्षी आवर्जून पाहावी अशी आहे.

चार हातांच्या महिषासुरमर्दिनी रूपातील ही दुर्गा मला भक्तांनी अर्पण केलेली साडी परिधान केलेल्या रूपात दिसली. मूळ मूर्ती १९७१ साली भंग पावल्याने नवी मूर्ती घडवली गेली. वरच्या उजव्या हातात त्रिशूल, खालच्या उजव्या हातात खड्ग, वरच्या डाव्या हातात शंख सदृश आयुध आणि खालच्या डाव्या हातात महिषासुराचे धडावेगळे केलेलं मुंडकं असं देवीचे मूळ रूप आहे.

जसे जसे आपण गोव्याच्या दिशेने जाऊ लागतो तशी मंदिरांची स्थापत्यशैली हळूहळू गोमंतकाशी साधर्म्य सांगणारी होत जाते. नवदुर्गा म्हणजे पार्वतीचे रूप. इथं बाराचा पूर्वस आहे. देवी आणि पूर्वस या दोन्ही देवतांना इथं रोज नैवेद्य दाखवला जातो. वर्षातून चार वेळेला देवीची पालखी निघते. नवरात्रात तिचा मोठा उत्सव साजरा केला जातो. गौड सारस्वत मंडळींमध्ये नवदुर्गा देवीचे भक्त मोठ्या प्रमाणात आहेत. कामत आणि गावस्कर ही मंडळी देवीची खास सेवेकरी मानली जातात.

माघ महिन्यातील नवमीची जत्राही इथं जोशात साजरी केली जाते. २०२२ साली मी इथं गेलो होतो तेव्हा आरती करण्याची संधी मला मिळाली. नवदुर्गा भक्तांच्या तीन पिढ्या इथं समर्पण भावाने देवीची आराधना करतात पाहून फारच छान वाटले. दुर्गेच्या नऊ रूपांना मिळून नवदुर्गा म्हणतात. त्यांचं वर्णन आणि नावे दुर्गा सप्तशतीत पुढीलप्रमाणे आहेत.

प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी।
तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च।
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता:।
उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ।।

सावंतवाडीहून इथं बसने येणे शक्य आहे. स्वतःचे वाहन आणि हातात वेळ असेल तर रेडीचा यशवंतगड नक्की पाहायला हवा. जवळच पण गोव्याच्या हद्दीत असलेल्या तेरेखोल किल्ल्यावर गोमंतक मुक्ती संग्रामाच्या आठवणी जगण्यासाठी जायला हवे. तिथं आता गोवा सरकारचे हेरिटेज हॉटेल असून शेकडो वर्षे जुन्या किल्ल्यात राहणे हा खास अनुभव इथं घेता येतो. तितका वेळ नसेल तर दुपारचे जेवण तेरेखोल नदीच्या मुखाशी बसून केरी किनारा पाहता पाहता घ्यायला हरकत नाही. वेंगुर्ल्यातील सातेरी देवीचे मंदिरही पाहायला हवे.. त्याची गोष्ट पुन्हा कधीतरी.

Leave a comment