कोकण किनाऱ्यावरील नवीन दीपगृहांपैकी एक म्हणजे ताडाचा कोंड दीपगृह. कोणी याला आंजर्ले दीपगृह म्हणते तर कोणी केळशी लाईट हाऊस. हे ठिकाण आंजर्ले गावाच्या तसे जवळच. केळशीहून आंजर्ल्याला समुद्र किनाऱ्यामार्गे जात असताना आडे, पडले हे किनारे ओलांडल्यानंतर एका शंभर मीटर उंच टेकडीवर हे दीपगृह आहे. तिथं समोरच लाल मातीने भरलेल्या सड्यावर गाडी पार्क करून सागर निळाईच्या शेकडो छटा पाहत उभे राहायचे.. आपलं स्वागत करायला बहुतेक वेळेला थंडगार झुळूक तिथं असतेच..

कोकण म्हंटलं की शुभ्र वाळूच्या स्वच्छ किनाऱ्यावर निळ्याशार समुद्रात डुंबणे हे समीकरण डोक्यात असतेच. पण अनेक ठिकाणे अशी आहेत, जिथे समुद्रालगत असलेल्या टेकडीच्या कड्यावरून भरतीच्या लाटांची किनाऱ्यावरील खडकांशी चाललेली झटापट पाहायला मजा येते. पावसाळ्यात जर समुद्राला उधाण असेल तर कैक ठिकाणी लाटांची कारंजी पाहायला मिळतात.. अनेक फूट उंच उसळणारे फेसाळते तुषार आणि लाटांच्या प्रहाराचा धीरगंभीर लयबद्ध आवाज हे सगळं त्या ठिकाणाला एक गहिरेपण देत असतं

पडले नंतर सावणे किनारा येतो. तिथं रस्ता अगदी समुद्राला लागूनच आंजर्ल्यापर्यंत पुढं जात राहतो. आपल्याला दीपगृह आणि पलीकडे क्षितिजावर सुवर्णदुर्ग किल्ला दिसू लागतात.

तीस मीटर उंच असलेल्या या अष्टकोनी दीपगृहाच्या गॅलरीत जाण्यासाठी २० रुपये तिकीट काढून आणि दीडशे पायऱ्या चढून जावं लागतं. दीपगृहांच्या पोटात असलेले स्पायरल जिने मला फारच आवडतात. त्यांच्या मधोमध असलेल्या पोकळीतून आपल्याला जवळजवळ सर्व थर पाहता येतात. झेनी लाईट बॉय या जपानी कंपनीचा १२० वॉट ऊर्जा वापरणारा संच इथे वापरला गेला आहे. दीपगृहाची ओळख म्हणजे काळे पांढरे पट्टे आणि दर पंधरा सेकंदाला एक पांढरा फ्लॅश हे या दीपगृहाचं टायमिंग. (प्रत्येक दीपगृहाच्या झोताचे स्वतःचे वेगळे पॅटर्न आणि टायमिंग असतात). या दीपगृहाचा झोत सुमारे २३ नॉटिकल माइल्स म्हणजे साधारणपणे ४२ किमी अंतरापर्यंत दिसू शकतो


लाईट हाऊसच्या गॅलरीत चारी बाजूला दूरवर पाहता येते. समुद्रसपाटीपासून दीपगृहाचे ठिकाण ५७ मीटर उंच आहे तर दीपगृह अजून तीस मीटर उंच म्हणजे ८७ मीटर किंवा २८५ फूट उंचीवरून आपण आंजर्ले ते उटंबर हा सर्व परिसर न्याहाळू शकतो. पूर्वेच्या डोंगरावर वनराई आणि त्याच्या खालच्या अंगाला आंब्याच्या बागा दिसतात तर पश्चिम दिशेला अथांग सागराचे दर्शन घेता येते. उत्तर बाजूला उटंबरची टेकडी आणि सावणे गावचा सागरतीर दिसतो तर दक्षिणेला आंजर्ले समुद्रकिनाऱ्याची जवळपास एक किमी लांब पट्टी दिसते. जर आकाश स्वच्छ असेल तर सुवर्णदुर्गाची तटबंदीही स्पष्ट दिसते.


समुद्रकिनारी एखाद्या टेकाडावर, नदीच्या मुखाजवळ अशा ठिकाणी ही दीपगृहे असतात त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला तिथे उभे राहून आसपासचा परिसर आणि मावळतीला कललेला सूर्यनारायण पाहण्याचा आनंद पर्यटकांना घ्यायचा असतो.. त्यामुळे कोकणातील पर्यटन अनुभवात नाविन्यपूर्ण काही करण्याच्या दृष्टीने दीपगृह पर्यटन हा एक महत्वाचा विषय आहे. याबाबतीत जर केंद्र सरकारचा दीपगृह विभाग, स्थानिक ग्रामपंचायत आणि राज्य सरकारचा पर्यटन विभाग एकत्र येऊन काही करू शकले तर ते खूपच उपयुक्त ठरेल. दीपगृह पाहण्याची वेळ दिवसातून दोनदा असणं. तिथं यायला-जायला व्यवस्थित पायवाट असणं, तिकिटे म्हणून चिठोरी देण्यापेक्षा नीट डिझाईन केलेली तिकिटे असणं ज्यातून इतर दीपगृहे आणि जवळची पाहण्याजोगी ठिकाणे यांची माहिती मिळू शकेल.

आसपास खाण्यापिण्याची व्यवस्था, वीजेच्या वाहनांच्या चार्जिंग ची सोय, वेबसाईट वर माहिती आणि ऑनलाईन बुकिंग ची व्यवस्था अशा अनेक गोष्टी करता येऊ शकतील. प्रॉन्ग्ज रीफ किंवा वेंगुर्ला रॉक्स सारखी दीपगृहे सर्वांना पाहता येत नाहीत, त्यासाठी मर्यादित संख्येत लोकांना पूर्वपरवानगीने तिथं जाण्याची व्यवस्था अशा अनेक गोष्टी होऊ शकतील आणि त्यातून संबंधित विभागांना उत्पन्नही मिळेल. आजूबाजूच्या होम-स्टे आणि खाऊघरांचा व्यवसायही वाढेल. काही दीपगृहे नवीन आहेत तर काही शंभर वर्षांपेक्षाही जुनी आहेत.. त्यांची ऐतिहासिक माहिती, त्यांचा वापर कसा होतो याबद्दल रंजक प्रेझेंटेशन यातून शाळकरी मुले बरेच काही शिकतील. या गोष्टी करण्यासाठी स्थानिक मुलांना विशेषतः कॉलेज विद्यार्थ्यांना विद्यावेतन सुद्धा देता येईल. कोणीतरी नेत्याने अधिकाऱ्याने जर दीपगृह पर्यटन मनावर घेतले तर खूप काही होऊ शकते.. ते होईल अशी आशा करूया