Darya Firasti

देवगड दीपगृह

शेवटी एकदाचे देवगड दीपगृह पाहून झाले! यापूर्वी पाच वेळा देवगड किल्ल्यावर जाऊन आलो असलो तरीही तिथेच असलेले दीपगृह पाहण्याची संधी काही न काही कारणाने हुकत होती. एकदा वेळ चुकली, एकदा कोविड नंतर कर्मचारी पेशन्ट होता म्हणून बंद होते, एकदा वीज पडून नुकसान झाले म्हणून बंद होते आणि एकदा कुलूप होते म्हणून तसाच परत आलो होतो. यावेळेला मात्र मी वेळेच्या आधी अर्धा तास जाऊन थांबलो. (गुगल मॅप्स वर वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच दिली असली तरी पर्यटकांना प्रवेश संध्याकाळी चार ते पाचच असतो.) अर्धा तास किल्ल्याच्या बुरुजावर पायी भटकल्यानंतर मी चारच्या ठोक्याला दीपगृहाचा दरवाजा ठोठावला.

या दीपगृहाची उंची त्याच्या पायथ्यापासून सुमारे 30 मीटर आहे. सौरऊर्जेवर काम करणाऱ्या दीपगृहात दीडशे वॉट ऊर्जेचे तीन मेटल हॅलाईड दिवे आहेत त्यांचा उजेड सुमारे 25 नॉटिकल माइल पर्यंत जातो. या दीपगृहाला काळ्या-पांढऱ्या रंगांच्या पट्ट्यांची रंगसंगती आहे. दर 30 सेकंदांनी पांढऱ्या रंगाच्या चार दिव्यांचा झोत चमकणे हा इथला पॅटर्न आहे. या दीपगृहाचे बांधकाम 1960 साली सुमारे एक लाख 86 हजार रुपयांमध्ये झाले अशी नोंद सापडते.

देवगड किल्ल्याच्या तटबंदीच्या उत्तर टोकाच्या बुरूजाजवळच हे दीपगृह आहे. तिथून देवगड खाडी आणि पवनचक्क्या दोन्हींचे दर्शन होते. इसवीसन १८८५ पासून इथं खाडीत येणाऱ्या जहाजांना मार्गदर्शन करण्यासाठी विक लॅम्प म्हणजे वातीचा मोठा दिवा लावला जात असल्याच्या नोंदी गॅझेटमध्ये आहेत. पुढे १९१५ साली इथं साडेआठ मीटर उंच दगडी दीपस्तंभ बांधला गेला. एप्रिल १९६० मध्ये इथं बीबीटी कंपनीचा पॅरिस निर्मित दिवा लावला गेला जो पुढं १९९४ मध्ये बदलला गेला आणि १९९९ साली नवीन दिवा लावला गेला.

दीपगृहातील दिव्यांच्या आत ६०˚ कोनात प्रकाश झोत फेकणारी ४ भिंगे आहेत. आता इथं विविध मासेमारी जहाजे बोटी इत्यादींवर लक्ष ठेवण्यासाठीच्या रडार नेटवर्क मधील एक रडार लावण्यात आले आहे. साब या स्वीडिश कंपनीने निर्मिती केलेली AIS सिस्टीम इथं आहे.

किल्ल्याच्या तटबंदीवरुन देवगड खाडीच्या मुखाचा परिसर दिसतो. शिराळे गावाजवळ शिवगड खिंडीच्या नजीक सह्याद्रीच्या ओंजळीतून सुमारे ९०० मीटर उंचीवर देवगड किंवा खराडा नदीचा उगम होतो आणि सुमारे ८४ किमी प्रवास करून ही नदी वाडातर जवळ देवगड खाडीत विलीन होते.

कारवार ते जयगड या पट्ट्यात जहाजांना उत्तम आश्रय देऊ शकेल असे देवगड हे एकमेव बंदर मानले जाते. एक रंजक गोष्ट अशी की इथं दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला पाणबुड्या इंधन, अन्न व इतर सामग्री भरून घेण्यासाठी दोन लाख रुपये खर्च करून ब्रिटिशांनी एक जेट्टी बांधली होती. पुढे १९५८ च्या आसपास ५ लाख रुपये खर्चून नागरी वाहतूक करणाऱ्या बोटींसाठीही इथं एक जेट्टी बांधली गेली. आज मात्र इथं फक्त मासेमारीच्या बोटी नांगरलेल्या दिसतात. देवगडचे आंबे आपण सगळ्यांना ठाऊक आहेतच.. दरवर्षी देवगड हापूस आपण सगळे हौसेने विकत आणून मिटक्या मारून खात असतो.. परंतु यापूर्वी इथले अजून एक जागतिक बाजारपेठेतील लोकप्रिय उत्पादन होते ते म्हणजे भांगेचे. देवगडची भांग किंवा हेम्प हे अगदी मँचेस्टर पर्यंत निर्यात होऊन जात असे. राजापूर आणि देवगड हे दोन तालुके माझ्या दृष्टीने कोकणातील पर्यटनासाठी खूप महत्वाचे आहेत. किल्ले, मंदिरे, कातळशिल्पे, नद्या, समुद्रकिनारे असं सगळंच इथे पाहता येते. देवगडची माणसेही अगदी अगत्यशील आणि हापूस सारखीच गोड असतात.. इथल्या कोकणी तिरकसपणाला सहजपणे माणसे जोडणाऱ्या जिव्हाळ्याची जोड असल्याने इथली माणसेही हापसासारखीच गोड असतात. त्यामुळे कोकण अनुभवायचे असेल तर देवगडला नक्की मुक्कामाला जायला हवे.

त्या दिवशी अगदी अवचितपणे सूर्यास्ताचा एक विलक्षण अनुभव माझ्या नशिबी आला. दीपगृह पाहून, खंदकाचे फोटो काढून मी नैऋत्य टोकाच्या बुरुजावर येऊन बसलो. भगवा जरीपटका तिथं दिमाखात फडकत होता. स्वातंत्र्य आणि राष्ट्रप्रेमासाठी अगदी सहजपणे बलिदान देणाऱ्या दिलदार आणि रणझुंजार मराठ्यांच्या निशाणाला सूर्यनारायण भगव्या किरणांचे अर्घ्यच जणू वाहत होता. त्या किरणांची झळाळी काळ्याकभिन्न दगडी बुरुजांवरही आज दिसत होती. मला वाटतं की असे अनुभव शिदोरीत बांधायचे असतील तर वेळापत्रक आणि नियोजनापलीकडं थोडं रेंगाळायला हवं.

Leave a comment