
रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड जवळ चाफे फाट्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर कोळिसरे येथे जाणारा मार्ग डाव्या बाजूला आहे. तिथून जवळपास ४ किमी अंतर नदीच्या दिशेने पुढे गेले की कोळिसरे गाव लागते. त्याच उतारावरून पायऱ्या उतरून लक्ष्मीकेशव मंदिराच्या आवारात आपण जाऊन पोहोचतो.
इथली उत्कृष्ट कोरीवकाम केलेली गंडकी शिळेची विष्णुमूर्ती म्हणजे शिल्पकलेचा अद्भुत अविष्कार असं म्हणायला हरकत नाही. मूर्तीच्या डाव्या बाजूला देवी श्री लक्ष्मी आणि उजवीकडे गरुड मूर्ती कोरलेली आहे. दोहोंच्या बाजूला जय आणि विजय हे द्वारपाल कोरलेले आहेत. पद्म, शंख, चक्र आणि गदा या क्रमाने आयुधे धारण केलेलं हे विष्णूचे रूप केशवाचे रूप ठरते. साधारणतः ही मूर्ती ८०० वर्षे जुनी आहे. याच काळातील विष्णू मूर्ती दापोलीजवळ सडवे, टाळूसरे, पंचनदी आणि शेडवई अशा ठिकाणी आढळतात. मूर्तीचे संपूर्ण पाषाणरूप पाहायचे असेल तर सकाळी सात-साडेसातला जायचे. पूजेआधी हे पाहणे शक्य होते.

इथेच श्री रत्नेश्वर महादेवाचे मंदिर असून मागे एक हनुमान मंदिर आणि झरा सुद्धा आहे. शास्त्री नदीच्या परिसरातील अतिशय रम्य अनुभव मनाला शांतता देणारा असतो.

या पाच फूट उंच मूर्तीची कथा अशी की मालखेड येथील राष्ट्रकूट घराण्याच्या काळात ही रचना झाली. पुढे इस्लामी शासनाच्या काळात या मूर्तीचे संरक्षण करण्यासाठी ती रंकाळा तलावात बुडवण्यात आली. वरवडे गावातील काणे-जोशी-विचारे घराण्यातील तीन पुरुषांना दृष्टांत झाला आणि त्यांनी कोल्हापूरच्या रंकाळा तलावातून ही मूर्ती काढली. देवरुख संगमेश्वर मार्गे ही पेटी कोळिसरे येथवर आली आणि जड झाली. रात्रीच्या आरामानंतर मजुरांना ही पेटी हलवणे अशक्य झाले. इथले ग्रामस्थ भानू प्रभू तेरेदेसाई यांना देवास इथेच राहावयाचे आहे असा दृष्टांत झाला. इसवीसन १५१०च्या आसपास इथं लक्ष्मीकेशव मंदिराची स्थापना झाली. केसराज या नावाने सुद्धा हे दैवत बघून समाजात प्रसिद्ध आहे.

हे देवस्थान अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे. काश्यप गोत्रातील – काशीकर, ठोसर, पंडित, पुराणिक, फडतरे, फडणीस, फाळके, बिनीवाले, बेंद्रे, भट, बेंद्रे, भेंडे, महाजन, माखलकर, मेहळकर, मेढेकर, राणे, लेणे, वेंगुर्लेकर, शिवणेकर, सुंकले, सुनाके. वसिष्ठ गोत्रातील – कुटुंबे, दांडेकर, वाटवे. विष्णुवृद्ध गोत्रातील – करवीर, मेहेंदळे, नेने. शांडिल्य गोत्रातील – उत्तूरकर, काणे, कानडे, केम्पवाडकर, घनवटकर, घुले, घोरपडे, जोशी, टकले, तुळपुळे, दणगे, पावसकर, पोतनीस, फडणीस, बावडेकर, बेहेरे, बोरगावकर, भाटे, मेघश्याम, मेडदकर, राजवाडे, राशिनकर, लकडे, लावेकर, विद्वांस, सारवरे, सुभेदार, सुरनीस, हरिश्चंद्रकर, हवालदार, हुपरीकर
रत्नागिरी जिल्ह्यातील विष्णुमूर्ती
Pingback: बिवलीचा श्री लक्ष्मीकेशव | Darya Firasti