आचरा हे कोकण किनारपट्टीवरील देवगड आणि मालवण तालुक्याच्या सीमेवर असलेले, खाडीच्या मुखाशी वसलेले गाव. पूर्वीच्या काळातील एक महत्त्वाचे बंदर. कोकण रेल्वे वरील कणकवली हे या गावाच्या सगळ्यात जवळचे रेल्वे स्टेशन. 1555 साली पोर्तुगीजांनी विजापूरच्या सैन्यावर इथे विजय मिळवला असं डी कुटो च्या संदर्भात दिसतात. 1819 साली इंग्लिश सैन्यानी या जागेवर कब्जा मिळवला त्याच्यानंतर फार काही ऐतिहासिक महत्त्वाचं इथं झालेलं दिसत नाही. परंतु या गावाचा मानबिंदू म्हणजे या गावातील रामेश्वराचे देऊळ.

संयुक्त रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेट मधील नोंदीप्रमाणे या मंदिराचा इतिहास पुढील प्रमाणे कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी इसवी सन 1742मध्ये या मंदिराला आसपासची गावे मिळून वार्षिक अडीच हजार रुपयां च्या उत्पन्नाचा प्रदेश इनाम दिला होता. गॅजेट असे सांगते की इथून मिळणाऱ्या कर संकलनापैकी 88% कर हा मंदिराच्या व्यवस्थापनासाठी वापरला जातो तर 12 टक्के रक्कम सरकार जमा होते. या मंदिराचा अगदी दरबारी थाट आहे आणि या देवळाचे नाव इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे असे आहे.

मंदिराच्या आवारात आल्यानंतर सगळ्यात आधी माझे लक्ष वेधून घेतले ते इथल्या अतिशय रेखीव अभिकल्पना असलेल्या दीपमाळांनी. या देवळाची कोनशीला शके 1684 मध्ये किंवा इसवीसन 1762 मध्ये झाली अशी नोंद आहे किंबहुना या सालाच्या आधीच्याही नोंदी मंदिराच्या दस्तऐवजांमध्ये सापडतात. कोकणातील इतर मंदिरांप्रमाणेच इथेही लाकडाचे अतिशय सुंदर कोरीव काम सभामंडपात पाहायला मिळते.



या मंदिरात असलेल्या लाकडी स्तंभांमध्ये अनेक धार्मिक आकृती कोरलेल्या आहेत या कोरीव कामाला अतिशय जिवंत स्वरूप आहे अगदी साध्या हत्यारांनी कोरलेलं हे काम पाहताना आपण मुग्ध होऊन जातो. कोकणामधील जुन्या मंदिरांचे संवर्धन करणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आव्हानात्मक काम. पण अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे मंदिराचे गुरव पुजारी आणि मंदिर व्यवस्थापन समितीतील मंडळी या सगळ्यांना या पुरातन ठेव्याची किंमत ठाऊक आहे त्यामुळे संवर्धन करत असताना त्याच्या मूळ स्वरूपाला धक्का न लावता ते करावे असा त्यांचा अगदी योग्य आग्रह आहे आणि त्यासाठी तज्ञ मंडळींचा सल्ला ते घेत आहेत ही गोष्ट भूषणावह मानली पाहिजे.



हा ब्लॉग श्री कपिल गुरव यांनी तपशीलवार माहिती आणि विविध उत्सवांचे फोटो दिल्यामुळे परिपूर्ण होऊ शकला. दर्या फिरस्ती प्रकल्प त्यांचा ऋणी आहे.
इथं रोज पहाटे चौघडा आणि सनई वादन करून दिवसाची सुरुवात होते त्यानंतर देवाचे रात्रीचे अलंकार उतरून पूजा केली जाते. यानंतर भाविकांची विविध कार्य जसे की लघु रुद्र आवर्तने आणि इतर पूजा पार पडतात सोमवारच्या दिवशी यांचे प्रमाण जास्त असते त्याच्यानंतर गाभारा धुतला जातो आणि दुपारचा महानैवैद्य देवाला दाखवला जातो. दुपारी एक ते चार या वेळेमध्ये कौलप्रसादाचे काम होते. यानंतर साडेचार ते पाच च्या आसपास अलंकार आणि पोशाखाने देव सजवला जातो रात्री आठच्या सुमारास आरती मंत्र पुष्प शेजारती तीर्थप्रसाद झाल्यानंतर देऊळ बंद केले जाते.



रामनवमीच्या उत्सवात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते एकादशी, लळीताची रात्र, हनुमान जयंती, महाशिवरात्री अशा दिवशी मंदिर 24 तास उघडे असते. या मंदिराची खासियत म्हणजे पु ल देशपांडे कुमार गंधर्व सुनीताबाई देशपांडे अशा अनेक कलासक्त मंडळींचं गायन वादन इथं गायन वादन इथे श्री देवासमोर झाले आहे. तिथल्या उत्सव परंपरा मंदिराने अतिशय काटेकोरपणाने जपल्या आहेत.

येथे दर महिन्याच्या दोन्ही पक्षांच्या दशमी एकादशीला पालखी मशाली, हुद्देदार, ढालदार, चोपदार, ढोल, चौरी, अबदागिरी या सगळ्या गोष्टींसह निघते. हे देऊळ जरी भगवान शंकराचे असले तरी पालखी श्री विष्णूची आहे.





कोजागिरी पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा येथे कार्तिक उत्सव उत्सव साजरा केला जातो दसऱ्याच्या दिवशी फुरसाई देवी जवळ येऊन सर्व ग्रामस्थ मंडळी सीमोल्लंघन साजरे करतात इथे होळी सुद्धा अगदी जोशात साजरी होते. या ठिकाणी पोफळीची होळी केली जाते, वायंगणी गावातून हे पोफळीचे झाड वाजत गाजत मिरवणूक काढून आचऱ्याला आणले जाते. रंगपंचमी पर्यंत इथं बोंबाबोंब करून अगदी सागर संगीत पूजा केली जाते असे मानले जाते की ज्याप्रकारे कॅथरसिसनी माणसाचे दुःख मोकळे होते तसेच काहीसे या रितीतून साध्य होत असावे.

देवाचे तरंग दर तीन वर्षांनी गावातून फिरतात, त्याला डाळपस्वारी असे म्हणतात. दोन वेळा ते होडीतून येतात गाऊडवाडी मधून जामडूल बेटावर येताना आणि जामडूल मधून पिरावाडीत जाताना हे होडीतून प्रवास करत असतात असे आपल्याला कपिल गुरव सांगतात.









इथली एक अतिशय खास परंपरा म्हणजे गावपळण. दर तीन वर्षांनी हा गाव पूर्णतः तीन दिवसांसाठी ओस पडतो. गावकरी गुरे कोंबडी कुत्री सर्वकाही घेऊन गावाबाहेर पडतात. तीन दिवस पूर्ण झाल्यानंतर देवाला कौल लावला जातो त्यानंतर चौघडा इशारत देतो आणि मग गावकरी परततात.

नेमका पुरावा उपलब्ध नसला तरीसुद्धा ही परंपरा 300 ते 400 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे असे गावातले जाणकार सांगतात विशेष महत्त्वाचं म्हणजे या काळात कोणाच्याही मालमत्तेला कोणतेही नुकसान पोहोचल्याची किंवा काही चोरीला गेल्याची घटना नोंदवली गेलेली नाही. आता पुढचे गाव पळण 2024 च्या वर्षअखेरीस होण्याची शक्यता आहे त्या वेळेला हवामान थंड असल्याने लोक रानात राहतील आणि उल्हासित वातावरणात या परंपरेचा एकत्र अनुभव घेतील अशी आशा आहे.

या मंदिरातील पंचमुखी महादेवाचे हे जिवंत काष्ठशिल्प पाहून ही संस्कृती घडवणाऱ्यांची प्रतिभा, तिला जतन करणाऱ्यांची निष्ठा आणि तिला नवीन दिशा देणाऱ्यांची ऊर्जा या सर्वांना वंदन करावेसे वाटते. दर्या फिरस्तीच्या माध्यमातून या सगळ्याचा मागोवा आणि दस्तऐवजीकरण आपण करत राहणार आहोत.