Darya Firasti

माहात्म्य श्री व्याडेश्वराचे

कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवालयांपैकी एक म्हणजे गुहागरातील श्री व्याडेश्वर देवस्थान. उपलब्ध आख्यायिका आणि साधनांनुसार कोकणाची निर्मिती झाल्यानंतर ज्या महत्वपूर्ण शिव मंदिराची निर्मिती केली गेली ते समुद्रकिनाऱ्याजवळ असलेले वाडेश्वराचे देऊळ. आज आपण जे मंदिर पाहतो ते पेशवेकालीन असावे आणि त्याचा कालावधी दीडशे ते दोनशे वर्षे जुना असावा. परंतु कोकणातील इतर धार्मिक स्थानांप्रमाणेच मूळ देवस्थान बरेच जुने आहे हे लक्षात येते. इसवीसन १६३७ मध्ये विश्वनाथ शास्त्री पित्रे रचित व्याडेश्वर माहात्म्य या चौदा सर्गांच्या शिवकालीन ग्रंथानुसार काही महत्वाची माहिती आपल्याला मिळते त्या आधारे आपण श्री व्याडेश्वराचा इतिहास आणि महती जाणून घेऊ. खरे म्हणजे व्याडेश्वर माहात्म्य या ग्रंथावर एक स्वतंत्र लेखच व्हायला हवा. तोही यथावकाश लिहूच पण आता काही मंदिराशी संलग्न श्लोकांद्वारे व्याडेश्वर देवस्थानाची गोष्ट जाणून घेऊया.

रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटप्रमाणे या ठिकाणाला पोर्तुगीज इतिहासकारांनी ब्राह्मणांचे स्थान म्हणून उल्लेखले होते. नैर्नच्या इतिहासातही तसे उल्लेख आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात एका आयताकृती जमिनीच्या तुकड्यावर पंचायतन असल्याचा उल्लेख आहे. त्यात मध्यवर्ती मंदिर शंकराचे आणि काळ्या दगडात घडवलेले होते. १८१२ च्या आसपास इथे पेशवा उन्हाळ्याच्या काळात विश्रांती आणि काही कर्मकांडासाठी येत असे. १८२३ मध्ये रत्नागिरीतील शासकीय बांधकामासाठी इथल्या इमारती पाडून साधन सामग्री गोळा केली गेली. समुद्राला लागून तीन मैल लांब मार्गावर इथे बरीच घरे आहेत आणि नारळ सुपारीच्या समृद्ध बागा आहेत असेही वर्णन दिसते. जे आजच्या गुहागरला सुद्धा बरेचसे लागू होते. इथल्या नंदीचे गॅझेटकारांनी खूप कौतुक केले आहे.. नंदीचे शिल्प अतिशय भव्य आणि चैतन्य असलेले असून लांबून खऱ्या खुऱ्या जीवित प्राण्याप्रमाणेच ते भासते अशी नोंद आहे.

भगवान परशुरामाने कोकणाची निर्मिती केल्यावर कोकणाच्या कल्याणासाठी शिवाला येथे अधिवास करण्याचे आवाहन केले आणि भक्तवत्सल महादेव तेथे अवतरले.

भगवान्स्तु महादेवस्ततत्स्थाने स्थिरमानसः
उवास रामावात्सल्याद्वरदो भजतां भुवि
तदेतद्रुचिरं स्थानं पुण्यं चित्रवनं नवं
भगवान यत्र विश्वात्मा साक्षादीशः सदाशिवः

अर्थात – त्या ठिकाणी मन स्थिर केलेले भगवान महादेव पृथ्वीवरील भक्तांना वर देणाऱ्या परशुरामाबद्दलच्या वात्सल्याने तेथे राहू लागले. . ज्या ठिकाणी विश्वात्मा, सदैव कल्याणकारक असा साक्षात भगवान शंकर निवास करतो ते हे सुंदर पुण्यकारक विचित्र अरण्य असलेले नवीन ठिकाण आहे. ( श्री व्याडेश्वर माहात्म्य – सर्ग चौथा श्लोक 53-54)

व्याडेश्वर या नावाची उपपत्ती व्याड नामक विद्वान मुनीने हे मंदिर स्थापन केले म्हणून झाली असावी असा कयास व्यक्त केला जातो. परशुरामाच्या संगतीने दाल्भ्य (यांनी शिवरायांनी पुनःस्थापित केलेले दाल्भेश्वर देवस्थान स्थापन केले अशी आख्यायिका आहे) आदि मुनी त्या क्षेत्री गेले आणि त्यांनी अनेक पुण्यकारक तीर्थे आणि आश्रम तिथे स्थापून परशुराम क्षेत्र प्रसिद्ध केले असा उल्लेख व्याडेश्वर माहात्म्यात आहे.

तत्र व्याडो नाम मुनि: शम्भुदर्शनलालसः
विद्वान गुहावनेડवात्सीदाश्रमे रामसंमतः
स पदे संप्रतिष्ठाप्य शाम्भवं लिङ्गमङ्ग्वित्
निःसङ्गोડङ्ग् विमुक्त्यर्थं तपस्तेपे तपोधनः
(सर्ग पाचवा श्लोक 11-12)

अर्थात – तेथे एकदा भगवान शंकराच्या दर्शनाच्या अभिलाषेने व परशुरामाच्या संमतीने एका आश्रमातील गुहेत व्याड नावाच्या विद्वान मुनीने वास्तव्य केले. त्या साङ्ग विधी जाणणाऱ्या निःसंग तपोधनाने शंकराचे लिंग योग्य ठिकाणी स्थापून देहमुक्तीसाठी तप केले. अशाप्रकारे या ठिकाणाचा संस्थापक व्याड मुनी होता हे लक्षात येते.

आजचे भव्य देऊळ जरी पेशवेकालीन असले तरी या मंदिराच्या शोधाची कहाणी बरीच मागे जाते. सांकुराण नामक पराक्रमी राजाचा पुत्र कायुराणाच्या काळातील ही गोष्ट. इतिहास दृष्टीने या नांवांवरून काही कालनिश्चिती करणे अवघड आहे. व्याड मुनींनी स्थापन केलेले शिवलिंग आता बांबूच्या बेटात गायब झाले होते. तिथे बाजूलाच कायुराण राजाच्या लढाऊ घोड्यांचा तबेला होता. घोड्यांच्या शिंगरांना उत्तम दूध मिळावे यासाठी तांबूस रंगाची कामधेनू कपिला तेथे ठेवण्यात आली होती. तिचे दूध पुरेसे नाही त्यामुळे गवळी दूध चोरत असेल या संशयाने तबेल्याच्या अधिकाऱ्याने गवळ्याला धारेवर धरले. नेमका काय प्रकार आहे हे तपासण्यासाठी कपिलेला रानात सोडले व तो मागून लपतछपत गेला. तेव्हा बांबूच्या बेटातील एका दगडावर कपिलने दुग्ध अभिषेक केल्याचे त्याला दिसले. चिडून त्याने दगडावर प्रहार केला आणि मग तिथं मानवी रक्त वाहू लागले. स्तिमित झालेल्या गवळ्याने अधिकाऱ्याला तेथे आणले.. तोही चकित झाला व त्याने राजाला तिथं बोलावले. तिथे काही काळ खणल्यावर शिव लिंग दिसले आणि काही नाग तिथून भीतीदायक पद्धतीने बाहेर आले. त्या देशात जमदग्नी पुत्र परशुरामाने पूजलेला त्रिपुरशत्रू शंकर निवास करीत असे हे राजाने ऐकल्याचे त्याला आठवले आणि त्याने प्रासादतुल्य मंदिर बांधण्याचा संकल्प केला. आजही येथे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या मांगल्य आणि दिमाखात पूजन होते.

फोटो सौजन्य: सर्वेश रवींद्र भावे

राजाने त्रिक्रम नामक मंत्र्याला बोलवून भव्य मंदिर बांधायला सांगितले. तिथली जमीन गुडघाभर खोल खोदून सुगंधित माती घालायला सांगितले. पण राजाच्या स्वप्नात एक योगी आला आणि त्याने एका बुटक्या यवनाला पाठवून एखाद्या योग्याच्या मठी सारखे साधेच मंदिर बांधायला सांगितले. कोकणातील जवळपास सर्व जुनी मंदिरे साधी पण सात्विक आहेत याच्याशी ही आख्यायिका अगदी सुसंगत आहे. कोकणातील लाकडी मंदिरे प्रसिद्ध आहेत त्या दृष्टीने पूरक असे दोन श्लोक व्याडेश्वर माहात्म्याच्या दहाव्या सर्गात सापडतात.

भूमिपालोડथ तुष्टात्मा प्रारेभे सद्य शाम्भवं
बहुवित्तव्ययापेक्षी तक्षकै: कर्मकोविदै:
अथो जयश्रीराणाख्य: साङ्कुराणसखा किल
राजा बुद्धिलदुर्गस्थो जाईलालात्मजो विभु:
स प्रपर्याप्तदारुणि सारवन्ति महान्तिच
नौसाधने: समानीय वाडेश्वरमुपस्थितः

अर्थात- मग संतुष्ट झालेल्या व पुष्कळ संपत्तीचा वय करण्यात उत्सुक अशा त्या भूपतीने कार्य कुशल सुतारांकरवी शंकराचे मंदिर बांधण्यास सुरुवात केली. जयश्री राणा नावाचा जाईल राजाचा पुत्र व सांकुराणा चा मित्र हा प्रभावी राजा बुद्धीलदुर्गात राहत असे. तो राजा अतिशय मूल्यवान महान लाकडे अगदी पुरेशा प्रमाणात बोटीच्या सहाय्याने सांभाळून आणून वाडेश्वराजवळ हजर झाला.

वाडेश्वर महात्म्याप्रमाणे हे मंदिर; देवड्या, तोरणद्वारे, तुळया, मोठे खांब यांच्या विपुलतेने, युक्त नाना चित्रांनी आकर्षक वाटणारे व कारागिरांच्या कौशल्याने सजवलेले आहे असे होते. त्याचा गाभारा अत्यंत मोठ्या शिळाखंडांनी बनवलेला होता तसेच मंदिराच्या पूर्वेला हनुमान, सूर्य, विष्णू, आणि महिषासुरमर्दिनीचीही स्थापना केल्याची नोंद दहाव्या स्वर्गात 28 ते 30 व्या श्लोकात आहे. आज आपण या ठिकाणी शिवपंचायतन आहे असे पाहतो.

सतराव्या शतकातील या ग्रंथात सापडलेला एक महत्वाचा उल्लेख जातीपातीच्या नियमाच्या बाबतीत फार रोचक आहे. गुहागर नगराच्या रचनेमध्ये ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य मंडळींसाठी एक रस्ता, शूद्रांसाठी दुसरा आणि सर्वांसाठी तिसरा असे रस्ते आहेत असा उल्लेख सापडतो. पण मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सर्व वर्णांच्या मंडळींनी आणलेल्या भेटवस्तू देवाला अर्पण केल्या गेल्या असे सांगितले आहे.

अन्येડपि बहवो विप्राः क्षत्रिया वणिजोंડ घ्रिजा:
उपतस्थुर्महादेवम् नानोपायन पाणयः

अर्थात – इतर अनेक ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र निरनिराळ्या भेटीच्या वस्तू हातात घेऊन महादेवाच्या सेवेला हजर झाले. त्या काळात भक्तमंडळी या मंदिरात कशाप्रकारे पूजाअर्चा आणि विविध कर्मकांडे करत असत याच्याही नोंदी श्री व्याडेश्वर माहात्म्य ग्रंथात आहेत. छत्र, तुलसी वृंदावन, सोन्याने मढवलेली पालखी अशा विविध भेटवस्तूंचे उल्लेख आहेत. सकाळी, दुपारी, रात्री या तीन वेळेला तिथे धुपारतीचा उत्सव होतो आणि जयवादासह ब्रह्मघोष केला जातो अशी नोंद सापडते. तिथे आजही भक्तमंडळी गायन करतात, नाचतात ,प्रदक्षिणा घालतात आणि शिवाच्या स्तुतीची स्तोत्रे गात असतात असे म्हटले आहे कार्तिकी एकादशीला ब्राह्मणांकडून येथे सांकुराण राजासाठी भक्तांसाठी वर मागितले जातात असेही सांगितले आहे. हे सगळे उल्लेख सतराव्या शतकातील म्हणजे शिवकालीन आहेत. अनेक चित्पावन मंडळींचे श्री व्याडेश्वर कुलदैवत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे –

गोत्रआडनावांची यादी
अत्रिआठवले, कुर्लेकर, चिपळूणकर, फडके, भाडभोळे, वाडदेव, वाडदेकर, विंझे, हसबनीस
कपिकापरेकर, कामाडी, खाडविलकर, खांबेटे, चक्रदेव, जाईल, जोगदेव, जोशी, दलाल, धारप, नाईक, फडणीस, बाठे, भागवत, भाटे, मराठे, मायदेव, रटाटे, राणे, विद्वांस, शेवडे, शुक्ल, साने
काश्यपओगले, खाडिलकर, लेले, शिंत्रे
कौंडिण्यआचार्य, कटके, काकेतकर, कापशे, थत्ते, दीक्षित, पटवर्धन, फणसे, मांद्रेकर, मांजरेकर, मुजुमदार, शास्त्री
कौशिकआगाशे, आचार्य, आपटे, कानिटकर, खरे, खुळे, गद्रे, गोडबोले, छापखाने, दीक्षित, देवल, धोपावकर, पाळंदे, पुराणिक, पेठकर, फाटक. मुल्हेरकर, फडणीस, फणसूकर, रास्ते, वेळांदुरे, वेलवडकर, शारंगपाणी, शिवणेकर, शेवडे, सटकर, सासने
गार्ग्यलोंढे, वझे
जामदग्न्यअग्निहोत्री, आगिटकर, कुंटे, पेंडसे, भागवत
नित्युंदनभिडे, रसाळ
बाभ्रव्यबाळ, बेंद्रे, बेहेरे, वाकनीस, साकळे, साकले, सामळ
भारद्वाजवैद्य
वत्सउकिडवे, काकतकर, घांगरेकर, जोशी, नेवरे, मायले, मालशे, सखदेव, सुगवेकर, हिरे, होले, हेर, हले
वासिष्ठअभ्यंकर, आगरकर, ओक, ओंकार, कारंजे, कार्लेकर, काशीकर, कवडीकर, कुटुंबे, कोपरकर, गांगल, गोगटे, गोकटे, गोडसे, गोंधळेकर, घारे, घारपुरे, चोकर, तिरंडे, दातार, दिवेकर, दोणेकर, दीक्षित, देशमुख, धारू, नातू, नगरकर, पागेकर, पेठे, पोंक्षे, फडणीस, बागूल, बापट, बोडस, भट, भवाने, भस्मे, भातखंडे, भाभे, मधुमते, महाबळ, राणे, विंझे, वेलवडकर, वेलणकर, शारंगपाणी, शेवडे, शिद्रस, श्रीखंडे, साठे, साठ्ये, हरबुले, हरबुडे
शांडिल्यआंबेकर, आमडेकर, उपाध्ये, कानडे, किल्लेदार, खरवळे (डोंगरे), गणपुले, गानू, गैलाड (पाटणकर), गोडसे, गांगल, तिवरेकर, दातार, दामले, देसाई, देशमुख, धामणकर, दीक्षित, नरवणे, पद्मे, परचुरे, पाटणकर, पावगी, पावशे, भागणे, मन्ये, माईल, रिसबूड, व्यास, शिंत्रे, सिद्धये, शिदोरे, शिधोरे, शेंडे, शेंड्ये, शेरकर, सरंजामे, सहस्रबुद्धे, सिधये

अनाथबन्धुं करुणैकसिन्धुं प्रसन्नमुर्तिं सुपवित्रकीर्तिं
गौरीकलत्रं कमनीयगात्रं वाडेश्वरं नौमि जगन्निवासं

अनाथांचा मित्र, करुणेचा एकमेव सागर, प्रसन्न मूर्ती, सुपवित्र कीर्ती आणि कमनीय गात्रे असणाऱ्या गौरीपती जगन्निवास वाडेश्वराचे मी स्तवन करतो. अशा भक्तिपूर्ण आशयाच्या श्लोकासह आपण या ब्लॉग पोस्टचा शेवट करूया. कोकणातील अशाच ऐतिहासिक, सांस्कृतिक स्थळांचे ससंदर्भ आणि प्रकाशचित्र सहित वर्णन आपण दर्या फिरस्ती ब्लॉग वर वाचू शकता. विविध पोस्ट आवर्जून वाचा आणि आपल्या कोकणवेड्या मित्र, आप्तेष्टमी स्नेह्यांनाही नक्की पाठवा

Leave a comment