
कोकणात आणि भारताच्या आरमारी इतिहासात लढाऊ वृत्ती आणि दर्यावर्दी कौशल्याने आपली ओळख प्रस्थापित करणाऱ्या सिद्दी घराण्याचा दबदबा मोठा होता. अबिसीनिया म्हणजेच इथियोपियातून आलेल्या आणि सुरुवातीला गुलामी करून यथावकाश आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर उत्कर्ष साधलेल्या सिद्दींनी उत्तर कोकणावर वर्चस्व प्रस्थापित केले. अभेद्य आणि अजिंक्य असा जलदुर्ग जंजिरा त्यांची राजधानी होता. मुरुडजवळ खोकरी आणि खारशेत नावाच्या गावांच्याजवळ आपण काही घुमट असलेले मकबरे पाहू शकतो. सिद्दी सत्ताधीशांची ही थडगी आहेत.

दगडाचे बांधकाम असलेले इंडो-सारसेनिक पद्धतीत बांधलेली ही थडगी आहेत, त्यापैकी सगळ्यात मोठे थडगे सिद्दी सिरूरचे आहे. सिद्दी सुरूल खान जंजिऱ्याचा १७०७ ते १७३३ प्रशासक होता. हे थडगे त्याच्या हयातीतच बांधले गेले असे ऐतिहासिक नोंदी सांगतात.

दुसरे थडगे हे सिद्दी याकूत खानाचे आहे जो १६७०-७७ जंजिऱ्याचा नवाब होता आणि १६७७-९१ मुघल आरमाराचा प्रमुख बनला. १६९६ ते १७०७ तो पुन्हा जंजिऱ्याचा नवाब बनला. त्याच्या थडग्यावर अरेबिक लिपीत मृत्यू जुम्मा दिलावल तिसरा दिवस हिजरी सन १११८ (इसवीसन १७०७) असा कोरीव लेख आहे.
तिसरे थडगे सिद्दी खैरियतखानाचे आहे. हा सिद्दी याकूतखानाचा भाऊ. खैरियतखान १६७०-७७ दंडा-राजपुरीचा प्रशासक होता आणि पुढं तो १६७७-९६ जंजिऱ्याचा प्रशासक झाला. त्याच्या थडग्यावर मृत्यू हिजरी सन ११०८ (इसवीसन १६९६) असा उल्लेख आहे.
फुलांची आणि विविध चिन्हांची नक्षी दगडी बांधकामावर शोभून दिसते. सिद्दी हे कडवे इस्लामी असल्याने इथं गुरुवारी रात्री कुराण पठण केले जात असे.

पूर्वी सावली मिठागर आणि दोडकल वगैरे गावांच्या महसूलातून काही रक्कम या मकबऱ्यांच्या देखरेखीसाठी खर्च केली जात होती. आजही या ठिकाणी उरूस भरतो. या वास्तूंच्या घुमट आणि कमानींतील प्रमाणबद्धता पाहण्यासारखी आहे. थडग्यातील खिडक्या जाळीचे म्हणजे लॅटिस वर्क असलेल्या आहेत आणि त्यातून प्रकाशाचे कवडसे येताना पाहणे एक खास अनुभव असतो. अशाच अनुभवांचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी दर्या फिरस्ती साईटला भेट देत रहा.
येथुन जाता येता नेहमी वाटायचं , हे काय असावं बरं? थडगं की अजुन काही!! आज माहिती मिळाली. खूप आभार.
आवर्जून अभिप्राय दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
Mahiti khup chan ahe. Siddi baddal ajun kalu shakel ka? Tyanchi family, mag te shevati kuthe gele, shevatcha siddi kon hota vagaire.
गुरुवारी कुराण पठण हे कळले नाही इस्लाम मध्ये शुक्रवार महत्वाचा मानतात ना ?
Pingback: सिद्दीची लंका: जंजिरा | Darya Firasti