
उत्तरेला रेवदंड्याचा पोर्तुगीज किल्ला, दक्षिण तीरावर भूशीर आणि त्यावर विराजमान कोर्लई किल्ला आणि अथांग सागरात विलीन होणारं नदीचं पात्र … कुंडलिका नदीच्या मुखाशी हा विलोभनीय देखावा पाहायला मिळतो. भिरा येथील विद्युत निर्मिती केंद्रातून दरररोज 750 क्युसेक पाणी कुंडलिका नदीत सोडले जाते. पुण्यातील मुळशी तालुक्यात कुंडलिका नदीचा उगम होतो आणि देवकुंड, कळंबोशी, डोलवहाळ धरण, कोलाड, रोहा, नवखार मार्गे रेवदंड्यापर्यंत कुंडलिका 84 किमी प्रवास करते आणि एकंदर 1070 वर्ग किमी क्षेत्र पाणलोट क्षेत्राखाली येते. माणगाव आणि रोहा तालुक्यातील साधारणपणे 13350 हेक्टर क्षेत्रफळात शेतीला कुंडलिका नदी सिंचन करते.

कुंडलिका नदीच्या खोऱ्यात राफ्टिंग आणि कॅम्पिंग साठी अनेक ठिकाणे पर्यटकांसाठी विकसित करण्यात आली आहेत. आंबे आणि कलिंगड या भागातील मुख्य फलोत्पादन आहे आणि भात व नाचणीच्या पिकाचे उत्पादन या भागात मोठ्या प्रमाणावर होते. सांबरकुंड, रामराज अचलबाग आणि बाळे या उपनद्या कुंडलिका नदीला येऊन मिळतात. मोगल काळात रेवदंडा हे महत्त्वाचे बंदर होते. अगदी १८८३ पर्यंत २० किलोमीटर आत ५० टनांच्या बोटी जाऊ शकत असत. रोह्यापर्यंत भरतीला वाहतूक १५ टन बोटींनी केली जात असे.

कोर्लई गावाची खास गंमत म्हणजे इथली विशेष भाषा. ही भाषा मराठी, पोर्तुगीज आणि इंग्लिशच्या मिश्रणातून निर्माण झाली असून तिला स्थानिक लोक ‘नो लिंग’ म्हणजे आमची भाषा असे म्हणतात. चौल-रेवदंडा भागाला जवळवळ दोन हजार वर्षांचा लिखित इतिहास आहे आणि एक प्रमुख जागतिक व्यापारी पेठ म्हणून चौल प्रसिद्ध होते. चेउल, चिवेल, जैमूर अशा विविध नावांनी ते ओळखले जात असे. आता साळाव येथे जिंदाल साऊथ वेस्टचा कारखाना असून विक्रम विनायक मंदिर नावाचे सुंदर गणेश मंदिरही पाहता येते.