Darya Firasti

सिद्दीची लंका: जंजिरा

मुरुड-जंजिऱ्याच्या सुंदर समुद्र किनाऱ्यावर निवांत सुट्टी घेऊन आराम करायचा. शहराच्या धकाधकीपासून दूर शांत, धीम्या आयुष्याची मजा घ्यायची.. आणि मग कंटाळा आला तर एखाद्या सकाळी जवळच राजपुरीला जाऊन जंजिरा किल्ला पाहायचा बेत आखायचा. छत्रपती शिवरायांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी अनेकदा प्रयत्न करूनही न जिंकलेला हा जलदुर्ग. महाराजांच्या कट्टर शत्रूचे बलस्थान. अबिसीनिया म्हणजेच आजच्या इथियोपियातून आलेल्या सिद्दी लोकांच्या कडवेपणाची आणि शौर्याची कथा समजून घ्यायला इथं गेलं पाहिजे. जंजिरा हे महाराजांचं अधुरं स्वप्नच.. त्यामुळे किल्ला पाहताना आम्हा शिवभक्तांना या गोष्टीची हुरहूर वाटणे साहजिकच आहे. परंतु हे समजून घेणं गरजेचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना लेचेपेचे शत्रू लाभले नव्हते. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग किंवा खांदेरीची महती कळण्यासाठी जंजिरा किती बेफाम, बेलाग, अभेद्य होता हे समजून घेणं आवश्यक आहे.

दंडा-राजपुरीतील सिद्दी समाजाचे लोक आजही तिथं राहतात. किल्ल्यावर जाणाऱ्या शिडाच्या होड्या हेच चालवतात. दिघी आणि राजपुरीच्या मध्यभागी असलेल्या या खाडीत पाण्याचा प्रवाह समुद्राच्या अफाट ताकदीची जाणीव करून देण्याइतपत उसळता असतो. सिद्दी जमात दर्यावर्दी असली तरीही आज या बोटींवर लाईफ जॅकेट किंवा इतर आवश्यक साधने नाहीत. जीव मुठीत धरून किल्ल्यावर २० मिनिटांत पोहोचले की फक्त ४५ मिनिटांत किल्ला पाहण्याची दटावणी केली जाते. अर्थात शिडाच्या बोटीने जाण्याचं आणि जंजिरा दर्शन घेण्याचं थ्रिल आपण अनुभवतो हे आहेच पण या ठिकाणी व्यवस्थापन सुधारणे गरजेचे आहे हे नक्की.

किल्ल्याच्या दारात पोहोचल्यानंतर आपले लक्ष वेधून घेते ते कोरीव शरभ शिल्प. मदमस्त हत्तींना आपल्या पंजात पकडणाऱ्या वाघाचे. दारावरच नगारखाना असून पहारेकऱ्यांसाठी बांधलेल्या देवड्याही आहेत. तिथं समोरच पीरपंचायतन दिसते. काही इतिहासकार आणि रायगड जिल्हा गॅझेट मधील उल्लेखांनुसार हे कोळ्यांची दैवते असलेले राम पंचायतन होते. इथं कार्तिक पौर्णिमेला जत्रा भरते. याच भागात सिद्दी कुटुंबातील लोकांच्या कबरी सुद्धा आहेत.

किल्ल्यात उंच ठिकाणी सिद्दी सुरुलखानाचा वाडा दिसतो. त्याच्या भिंती शाबूत असून खिडक्या आणि त्यावरील नक्षीही पाहता येते. सारसेनिक म्हणजे इस्लामी पद्धतीच्या या बांधकामाची भव्यता त्याच्या भग्नावशेषांतूनही स्पष्ट दिसते.

हुलमुख, अरबा, बहादूरशा, कापूरकस्तूरी, याकुतीखान, अल्वी अशा नावांचे बुरुज किल्ल्याला आहेत. या सगळ्या बुरुजांमध्ये सुमारे २७ मीटर अंतर असून हे बुरुज दुमजली तरी आहेत. कमळ पुष्पाचा आकार असलेल्या बुरुजांच्या वरच्या भागातून सैनिकांना आक्रमकांचा मुकाबला करण्याची सोय आहे. महादरवाजावळील बुरुजांच्या आकारामुळे अगदी जवळ येईपर्यंत दरवाजा दिसत नाही.

या किल्ल्याचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इथं आढळणाऱ्या देशी-विदेशी तोफा. मुख्य दरवाजाच्या जवळच असलेल्या तटांवर तीन मोठया तोफा आहेत. यापैकी सगळ्यात मोठी तोफ आहे कलाल बांगडी. या नावाचा अर्थ बत्ती दिल्यावर जी कोलाहल माजवते ती असा लावला जातो. ही तोफ साडेपाच मीटर लांब असून तिच्या तोंडाचा व्यास ३५ सेंटीमीटर आहे.

नंतर आपल्याला कीर्तिमुख असलेली चावरी नावाची तोफ दिसते आणि लांडा कासम नावाची तिसरी मोठी तोफही इथं आहे. या तोफेला शेपूट नसलेल्या नागाचा आकार दिला आहे असे भासते. या तोफांच्या व्यतिरिक्त किल्ल्यावर काही युरोपियन बनावटीच्या तोफाही आहेत.

स्वीडन, स्पेन, फ्रान्स आणि हॉलंडच्या हा तोफा असून एक तोफ ओळखता येत नाही. या तोफांवर विविध राजचिन्हे आणि बनावटीबद्दल काही तपशील कोरलेला दिसतो. तापलेल्या तोफा गोलंदाजी करताना वळवता याव्यात म्हणून मागे हॅन्डल सारखी रचना केलेली दिसते.

किल्ल्यात दोन तलाव आहेत आणि मशिदी सुद्धा आहेत. तटबंदीचे बुरुज एकमेकांना जोडलेले असून खालच्या मजल्यावरून सैन्य आणि दारुगोळा एका बुरुजावरून दुसऱ्या बुरुजावर नेणे सहज शक्य असे. किल्ल्याच्या उंच भागात बालेकिल्ला असून तिथं पायऱ्यांनी चढून जाता येते. या ठिकाणी आता ध्वजस्तंभ आहे. तिथे लागूनच जुने चुनेगच्ची बांधकाम दिसते ज्याला सदर म्हणतात.

किल्ल्यात अनेक पर्शियन शिलालेख आहेत. त्यांच्याबद्दल गॅझेटमध्ये माहिती दिली गेली आहे. मुसाफिराची मशीद नावाच्या इमारतीवर १५७६-७७ च्या काळात लिहिलेल्या शिलालेखात निजामशाहीत फहीमखानाची नियुक्ती इथं झाली आणि त्याने हा किल्ला बांधला अशी नोंद दिसते. १६९९-१७०० च्या सुमारास कोरलेल्या शिलालेखात सिद्दी सुरुरने हुलमुख बुरुज बांधले असा उल्लेख दिसतो तर

१७०५ च्या शिलालेखात सिद्दी सुरुरने दरवाजाजवळील बुरुजांचे काम पूर्ण केले असे सांगितले गेले आहे. १७१०-११ चा एक शिलालेख मुख्य दरवाजाजवळ आहे त्यात फहीमखानाने बांधलेल्या तटबंदीला याकूतखानाने पुन्हा बांधून उंच केले असे म्हंटले आहे. किल्ल्याचे डोके शनि ग्रहाच्या घुमटाला लागले आहे असा त्यात अतिरंजित उल्लेख आहे. शिवाय १७२७-२८ च्या शिलालेखातही याकूतखानाने हा किल्ला पुन्हा बांधून बुलंद केला असा उल्लेख दिसतो.

या किल्ल्याचा झुंजार इतिहास आणि दर्यावर्दी सिद्दी घराण्याचा इतिहास मोठा रोचक आहे! त्याबद्दल एक वेगळा ब्लॉग लिहावा लागेल! जो आम्ही लवकरच लिहितो आहोत. सिद्दी घराण्यातील नवाबांची थडगी खोकरी नावाच्या गावात आहेत. त्यांच्याबद्दल इथं वाचा. कोकणातील अशाच ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणांच्या चित्र-भ्रमंतीसाठी दर्या फिरस्ती वेबसाईटला जरूर भेट देत रहा.

2 comments

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: