गेल्या पावसाळ्यात आचरे किनाऱ्यावर मनसोक्त पायपीट केली होती. या किनाऱ्याच्या उत्तर टोकाला आचरा नदीच्या मुखाशी उभे राहून नदीचा प्रवाह आणि भरतीच्या लाटांची झुंबड पाहता पाहता समोरच्या किनाऱ्यावरील टेकाडावर असलेल्या दीपगृहाने लक्ष वेधून घेतले होते. दुसऱ्या दिवशी वाडेकर काकांबरोबर कांदळवन सफारी केल्यानंतर टेकडी चढून दीपगृहाचे दर्शन घेतले होते.. पण तिथूनच पुढं उत्तरेला मुणगे गावाच्या दिशेने दोन अडीच किलोमीटरच्या टप्प्यात दोन अस्पर्श किनारे पाहायचे राहून गेले होते. ते म्हणजे धाकटा आणि थोरला केउंडला.. जानेवारी २०२५च्या कोकण वारीत इथं जायचं ठरलं आणि मग वाडेकर काकांना फोन केलाच. वाडेकर काकांचा मुलगा अक्षय मला या दोन्ही किनाऱ्यांवर घेऊन जाणार होता आणि त्याला आडबंदर जेट्टीवर भेटायचे ठरलं.

सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास मी तिथं पोहोचलो. आचरा नदीच्या पल्याड जामडूल गावातून अक्षय होडी घेऊन निघालेला दिसला.. नदीचे पात्र रुपेरी लकाकीने उजळून निघाले होते. वाडेकर काका इथल्या कांदळवनाची उत्तम सफर घडवतात आणि युट्युबवर ते बरेच लोकप्रिय आहेत. माझ्या कांदळवन सफारीच्या अनुभवाबद्दल मी एक स्वतंत्र ब्लॉग लिहिणे बाकीच आहे. आडबंदर सुद्धा एक विलक्षण जागा आहे. एक छोटीशी वाडी आणि खाडीचा शांत किनारा.. मागच्या वेळेला इथं एसटीची लालपरी आलेली मी पाहिली होती.. ती बससेवा सध्या बंद आहे असे अक्षय म्हणाला. सुमारे साडेतीन किलोमीटरचा चढ पार करून आम्ही पुन्हा सड्यावर आलो आणि गाडी डावीकडे घेतली. सड्यावरच्या खडकाळ रस्त्यावर दगड रचून वाट दाखवायची सोय केलेली होती. तिथून सुमारे अर्धा पाऊण किलोमीटर एका मांगराच्या पलीकडे जाऊन गाडी पार्क केली आणि अकरा नंबरची बस पकडून पश्चिमेकडे निघालो. गाडी थोडी पुढे सुद्धा गेली असती पण खडकाळ वाटेत कुठेतरी गाडी किंवा टायर खराब होण्याची जोखीम मला पत्करायची नव्हती.

उन्हाची तिरीप अजून जाणवत नव्हती आणि वाऱ्याची झुळूक थंडावा देत असल्याने चालताना प्रसन्न वाटत होते. दीपगृहाकडे जाणारा रस्ता डाव्या बाजूला सोडून आम्ही एका वाय जंक्शन वरून काहीसे वायव्य दिशेने निघालो. सुमारे पन्नास मीटर उंच सड्यावरून उतरून आम्हाला समुद्र सपाटीला जायचे होते. थोरला किंवा मोठा केउंडला इथं खाली होता.. धाकट्या केउंडल्याला जाणारा रस्ता लांबून जातो असे अक्षय म्हणाला. मला मात्र वाटले की भरती नसल्याने कदाचित दक्षिण टोकाला दगडांच्या पलीकडे मार्ग काढत गेले तर किनाऱ्यावरूनच पलीकडे धाकट्या केउंडल्याला जाता येईल.

सडा ओलांडून टोकाजवळ आलो तेव्हा हलकासा उतार लागला होता. समुद्राची गाज आता ऐकू येऊ लागली होती.. भरती नव्हती तेव्हा गर्जनेचा सूर न लावता सागराची सौम्य आवर्तने सुरूच होती.. वाऱ्याचा गारवाही आता तुलनेने जास्त जाणवत होता.. झुडुपांची एक जाळी ओलांडली आणि समोर किनाऱ्याचे पहिले दर्शन झाले. उजवीकडे माडांची एक रांग होती आणि तिच्या बाजूने समुद्राच्या दिशेने गेलेला एक छोटा ओहोळ किंवा छोटी खाडी दिसत होती.. या खडकाळ आणि गवताळ भागातून उतरत आम्ही केउंडला किनाऱ्याच्या पुळणीवर उतरणार होतो.

स्वच्छ पांढरी वाळू, तितकेच स्वच्छ पाणी आणि उत्तर टोकावर सागराला जाऊन भिडलेली हिरवट रंगाची टेकडी असा परिचयाचा तरीही नवा भासणारा देखावा तिथं पाहिला. दर्या फिरस्तीच्या या टप्प्यात जमेल तिथं विविध समुद्र किनाऱ्यांच्या दोन्ही टोकांपर्यंत चालत जायचे असे ठरवलेले असल्याने माझी पावले समोरच्या टेकाडाकडे वळली. बूट काढून ठेवले.. पॅन्टला घडी घातली आणि मखमली वाळूचा पाहुणचार अनवाणी पायांनी घेत घेत चालायला लागलो.

जांभा दगडांच्या रांगोळीतून लाटांची येजा सुरु होती.. ओहोटी असल्याने पाणी अलगद पुढे येत होते.. खडकांच्या अध्येमध्ये असलेल्या जागांमधून येणाऱ्या पाण्याचा आवाज तालबद्ध आणि मंजुळ होता. खडकांमधून खेकड्यांची लगबग सुरु होती.. अक्षयराव किनाऱ्याच्या मधल्या भागात खेकडे पकडायचा त्यांचा उद्योग करत होते.. सोबत ते घेऊन जायला काहीही आणलेले नसल्याने हा बहुतेक फक्त विरंगुळ्याचाच मामला असावा. आता दक्षिणेकडे किलोमीटरभर चालत गेल्यानंतर मला थोरल्या केउंडल्याचे टोक दिसायला लागले. किनाऱ्यावर काहीतरी मोठी वस्तू पडलेली दिसली.. ती परत येताना पाहू असे म्हणून मी पुढं निघालो. गुगल मॅप पाहून माझे ठिकाण जोखायचा प्रयत्न केला पण ऑफलाईन डाउनलोड केलेला असूनही नकाशा उघडेना आणि त्यावर निळ्या बिंदूने माझी जागाही नक्की होईना. ओहोटी अजून बराच वेळ असणार आहे याची चौकशी आधीच केलेली असल्याने टोकापर्यंत जाऊन पुढं धाकट्या केउंडल्याला जायला वाट सापडते का ते पाहायला अजून अर्धा किलोमीटर चालत पुढं गेलो.

सड्यावर जिथे गाडी सोडली होती तिथून जवळपास अडीच किलोमीटर पुढं चालत गेल्यानंतर मला धाकटा केउंडल्याचे दर्शन झाले. कोकण किनारपट्टीवर जिथं जायला गाडीवाट नाही अशा मोजक्या किनाऱ्यांपैकी हे दोन किनारे. देवगड तालुक्यातील दक्षिण टोकावरचे हे दोन किनारेही आता सर झालेले असल्याने इथून उत्तरेला विजयदुर्ग किल्ल्याच्या किनाऱ्यापर्यंतचे देवगड तालुक्याचे सगळे समुद्रकिनारे मी डॉक्युमेंट केले आहेत असे म्हणू शकतो.. धाकटा केउंडल्याच्या दक्षिणेला आचरा पॉईंट दीपगृहाचा कडा आहे. त्यापलीकडे आचरा नदी आणि ती ओलांडली की मालवण तालुका सुरु होतो.

परतीच्या वाटेवर मी पाण्यापासून थोडे दूर येऊन मी काय पडले आहे ते पाहिले… एक मोठे कासव मारून पडलेले दिसले. या क्षेत्रात काम करणाऱ्या मोहन उपाध्येंना फोटो पाठवला आणि ते ऑलिव्ह रिडले आहे का विचारले. त्यांच्या मते हे ग्रीन टर्टल असावे. हिरव्या कासव (Green Turtles) हे समुद्रातील मोठ्या आकाराचे कासव आहेत, ज्यांचे शास्त्रीय नाव Chelonia mydas आहे. हे कासव समुद्राच्या उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय भागांमध्ये आढळतात. हिरव्या कासवांचे वजन साधारणपणे ११०-१५० किलोग्रॅम (२४०-३३० पाउंड) असू शकते, आणि त्यांची लांबी १ मीटरपर्यंत (३.३ फूट) पोहोचू शकते. त्यांच्या आहारामध्ये मुख्यत: समुद्री गवत, मासे आणि इतर जलचर वनस्पतींचा समावेश होतो. त्यांच्या हाडांचे जाड आवरण असते, ज्यामुळे ते जलद पोहण्यास सक्षम असतात.


हिरव्या कासवांचा प्रजनन कालावधी साधारणपणे २५-३० वर्षांचा असतो. या प्रजजनाच्या प्रक्रियेदरम्यान, त्यांना अनेक धोकादायक गोष्टींशी सामना करावा लागतो, जसे की किनाऱ्यावर उंच लाटांमुळे अंडी नष्ट होणे, माणसांकडून अंडी नष्ट केली जाणे आणि समुद्र प्रदूषणामुळे त्यांच्याअधिवासावर होणारे दुष्परिणाम. आजकाल हिरव्या कासवांची संख्या कमी होत आहे, आणि म्हणूनच त्यांचे संरक्षण करण्यासाठी विविध जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. “आंतरराष्ट्रीय वन्यजीव संरक्षक संघटना” (IUCN) या कासवांना संकटग्रस्त प्रजाती म्हणून ओळखते.

पुन्हा एकदा आम्ही त्याच पायवाटेने सड्यावर आलो आणि गवताळ मैदानातून मांगराच्या दिशेने चालायला लागलो. मनात एकीकडं देवगड तालुक्यातील सर्व समुद्रकिनारे पाहून झाले याचे समाधान होते तर दुसरीकडं मृत कासव पाहिल्याने आलेले नैराश्य होते. कोकणातून भ्रमंती करत असताना मनात हे द्वंद्व नेहमीच डोकावत राहते की इथले पर्यटन वाढले तर स्थानिक मंडळींच्या उत्पन्नात वाढ होईल पण हे वाढीव पर्यटन जर डोळस नसेल तर मग निसर्गाला भकास करून टाकणाऱ्या विकासाला हातभार लावल्यासारखे होईल.. अर्थात आजच्या काळात एखादे ठिकाण सापडणे किंवा न सापडणे हे कोण्या एकाच्या लेखनावर अवलंबून नाही.. या किनाऱ्यावर उतरलेल्या मंडळींचे युट्युब व्हिडीओ मी आधीही पाहिलेले आहेतच. पण जसे वेळास, आंजर्ले, गावखडी इत्यादी भागात जोमाने टर्टल इको टुरिझम सुरु आहे आणि त्यातून स्थानिकांचा उत्कर्ष होत आहे तसेच सर्वत्र करावे लागेल.. अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांना इथं शिस्तबद्ध काम व्हावे यासाठी अधिकार द्यावे लागतील. अक्षय रावांना पुन्हा एकदा आडबंदराच्या जेटीवर सोडून मी देवगडच्या दिशेने निघालो. आज माझा मुक्काम कुणकेश्वर जवळच्या सड्यावरील एका आलय नावाच्या कॉटेजला होता.. . कुणकेश्वर देवळाच्या जवळ माझी वडापाव खाण्याची एक आवडती जागा आहे.. तिथं गरमागरम वडापाव मस्त ओली चटणी लसूण चटणी आणि चिरलेला कांदा वगैरे घालून पॅक करून घेतला… ऑफिसची वेळही जवळ आलेली असल्याने लवकर मुक्काम गाठून लॉगिन करायचं म्हणून मी परतीच्या वाटेला लागलो.