स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबाराव सावरकर, सचिंद्रनाथ सन्याल, भाई परमानंद, बटुकेश्वर दत्त, मोहन मोईत्रा, पंडित राम राखा, बाबा भान सिंह, इंदुभूषण रॉय, हरिपद चौधरी, महावीर सिंह अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी भोगलेल्या यातना आणि बलिदानांच्या पवित्र स्मृती जपलेलं राष्ट्रीय स्मारक आणि स्वातंत्र्य देवीचे तीर्थक्षेत्र म्हणजे अंदमानचे सेल्युलर जेल कारागृह. १८५७ सालच्या स्वातंत्र्ययुद्धाने हादरून गेलेल्या ब्रिटिशांना क्रांतिकारी बंदीवानांना मुख्य भूमीपासून दूर कुठेतरी भयानक ठिकाणी डांबून ठेवण्याची गरज भासू लागली आणि यातूनच अंदमानच्या कैदी वसाहतीचा संकल्प केला गेला. आर्चिबाल्ड ब्लेयर नामक अधिकाऱ्याने इथं चांगले कारागृह आणि कैदी वसाहत निर्माण केली जाऊ शकेल असे सुचवले होते. पुढे त्याचेच नाव पोर्ट ब्लेयर या ठिकाणाला देण्यात आले. मंगल पांडेने केलेल्या क्रांतीनंतर जवळपास एक वर्षाने इथल्या वसाहतीची बांधणी सुरु झाली. कर्नल जेम्स पॅटीसन वॉकर नामक डॉक्टर आणि आग्रा कारागृहाचा जेलर असलेल्या अधिकाऱ्याने इथं कैदी वसाहतीची बांधणी सुरु केली. सक्तमजूरी करण्यासाठी कैद्यांना मोकळे केले गेले तेव्हा अनेकांनी पळण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी अनेकांना पकडून फाशी देण्यात आले. एका दिवशी कर्नल वॉकर ने ८६ लोकांना फाशी दिल्याची नोंद आहे. काहीजण पळण्यात यशस्वी ठरले त्यांना स्थानिक ग्रेट अंदमानी आदिवासींनी ठार केले. त्यांच्यापैकी एक कैदी दूधनाथ तिवारी आदिवासी समूहाबरोबर काही काळ राहिला आणि नंतर निसटून परत पोर्ट ब्लेयरला आला. आदिवासी हल्ला करणार आहेत अशी सूचना त्याने ब्रिटिशांना दिली. नंतर झालेल्या आबर्डीन युद्धात आदिवासी सैन्याचा पराभव झाला आणि अनेक ग्रेटर अंदमानी मारले गेले.

सुरुवातीच्या काळात कैदी वसाहत वायपर बेटावर होती. तिथेच मृत्यूदंड मिळालेल्या कैद्यांना फाशी दिले जात असे. ब्रिज किशोर सिंह देव या जगन्नाथपुरीच्या राजाला इथं कैदी म्हणून ठेवले गेले होते. शेर अली नामक पेशावरच्या कैद्याने इथं लॉर्ड मेयोला ठार करून इतिहास घडवला होता. पुढं सेल्युलर जेल तयार झाल्यानंतर वायपर बेटाचे महत्व कमी होत गेले. मी गेलो तेव्हा रॉस द्वीपावर जाता आले परंतु वायपर बेटावरील पर्यटन मात्र बंद होते.

१८९६ ते १९०६ या काळात स्टारफिश च्या आकारातील या कारागृहाचे बांधकाम करण्यात आले. तीन मजले उंच आणि ६०० हून अधिक कोठड्या असलेले हे कारागृह प्रचंड होते. आज याच्या ७ पैकी ३ विंगच उभ्या आहेत. उर्वरित ठिकाणी रुग्णालय आणि इतर बांधकामे करण्यात आली आहेत. मध्यभागी असलेल्या टॉवर वरून सगळीकडे लक्ष ठेवणे शक्य होते. एकूण ६९८ कैद्यांना इथं एकांत कारावासाची शिक्षा देणे शक्य होते. कारागृहाची रचना अशी होती की एका कोठडीच्या समोर दुसऱ्या विंगेतील कोठडीची मागची बाजू आणि अरुंद खिडकी असावी. जेणेकरून एकटेपणाचा असह्य त्रास कैद्यांना व्हावा. ज्यांचे विशेष मानसिक खच्चीकरण करायचे असेल त्या कैद्यांना फाशी देण्याच्या जागेच्या जवळची कोठडी दिली जात असे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना अशाच ठिकाणी एकांतवासात बंद केले गेले होते. फाशी जाणाऱ्या माणसाचा आरडाओरडा, विव्हळणे, त्याच्या यातना सगळंकाही इथं सतत कानी पडत राहील अशी व्यवस्था होती.



एकेका कोठडीची लांबी-रुंदी साधारण साडेतेरा फूट गुणिले साडेसात फूट अशी होती. इथल्या कैद्यांचा छळ करण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरल्या जात असत. काथ्याचे काम, कोलू ओढणे, कारागृहाबाहेरील जंगलांमध्ये भाज्या आणायला जाणे अशी अनेक कामे कैद्यांना दिली जात असत. एकेक कैद्याने कोलूवर रोज ३० पौंड तेल काढणे अभिप्रेत असे. ते पुरेसे झाले नाही तर मारहाण, बेड्यांमध्ये तासंतास डांबणे असा विविध पद्धतीने छळ केला जात असे.


जेवण म्हणून या कैद्यांना नारळाच्या अर्ध्या करवंटीत मावेल इतकीच भाताची कांजी रोज दिली जात असे. त्याबरोबर कधी भाज्या मिळत.. पण त्या भाजा नीट साफ केलेल्या नसत आणि तशाच चिरलेल्या असत त्यामुळे त्यात मेलेले उंदीर, पाली, साप असत. प्रत्येक कैद्याला दोन भांडी देण्यात आली होती. एक मातीचे मडके आणि दुसरे स्टीलचे. स्टीलच्या भांड्यात अन्न ठेवले जायचे. मातीचे भांडे रात्रीच्या वेळेला शौच किंवा मूत्रविसर्जन करण्यासाठी होते. सकाळच्या अगदी थोड्या वेळात कैद्यांना प्रातर्विधी उरकायला बाहेर काढले जात असे. कारागृहातील घाणेरडे अन्न खाऊन डायरिया झाला तर स्वतःच्याच मलमूत्राच्या दुर्गंधीला सहन करत रात्र काढण्याची नामुष्की कैद्यांवर येत असे. ब्रिटिशांनी इथेही हिंदू-मुस्लिम भेदाभेद उत्तम रणनीती म्हणून वापरला. मुस्लिम जमेदार हिंदू कैद्यांना विशेष त्रास देण्यात धन्यता मानत. त्या त्रासापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी इस्लाम पत्करला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मग आर्य समाजाच्या दयानंद सरस्वतींपासून प्रेरणा घेत शुद्धीचे आंदोलन सुरु केले आणि कर्मठ हिंदू मंडळींचा विरोध पत्करून अनेक बाटलेल्या कैद्यांची शुद्धी म्हणजे आजच्या भाषेत घरवापसी केली.

इंदुभूषण रॉय या क्रांतिकारकाने इथल्या छळाला कंटाळून आपल्या सदऱ्याचा फास बनवला व आत्महत्या केली. त्यानंतर कैद्यांवर अधिक कडक निर्बंध आणले गेले. हिंदू कैद्यांची जानवी इथं आणल्यावर कापली जाऊ लागली. पंडित राम राखा यांनी या नियमाच्या विरोधात आमरण उपोषण केले. त्यांना जबरदस्तीने अन्न देण्याचे प्रयत्न फसले व त्यांचे बलिदान अजरामर झाले. बाबा भान सिंह नामक क्रांतिकारकांचा जेलर डेव्हिड बेरीच्या माणसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. महावीर सिंह, मोहित किशोर आणि मोहित मैत्रा या कैद्यांना त्यांचे उपोषण तोडण्यासाठी नळीने बळजबरी दूध पाजताना फुफ्फुसांत दूध जाऊन त्यांचा मृत्यू ओढवला. उल्लासकर दत्त या क्रांतिकाऱ्याला इथं झालेल्या छळामुळे वेडाचे झटके येऊ लागले. हे नाटक असल्याची शंका आल्याने खातरजमा करण्यासाठी डॉक्टर करवी त्यांना वीजेचे झटके देण्यात आले. पुढं त्यांना चेन्नईमधील रुग्णालयात हलवले गेले असे दिसते.




हरिकृष्ण कोनार, एम एन रॉय असे पुढे समाजवाद/ वामपंथाकडे वळलेले क्रांतिकारी सुद्धा इथं होते. आज स्वातंत्र्यदेवतेच्या ज्योतीद्वारे इथल्या कैद्यांच्या बलिदानाचे स्मरण जपलेले आहे. १९३७ च्या सुमारास अनेक आंदोलने होऊन इथल्या राजकीय कैद्यांना मुक्त केले गेले. नंतर आझाद हिंद फौजेच्या ताब्यात हे बेट आले आणि नेताजी सुभाषचंद्र बोसांनी इथं ध्वजावरण केले.

१९४२ ते १९४५ इथं जपानी सैन्य छावणी होती. सुरुवातीला ब्रिटिशांपासून मुक्तता करणारी शक्ती म्हणून त्यांचे स्वागत झाले खरे पण त्यांनी ब्रिटिशांपेक्षाही जास्त क्रूर अत्याचार इथले कैदी आणि लोकांवर केले. स्वातंत्र्यानंतर या कारागृहाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळाला.संध्याकाळी एक उत्तम लाईट अँड साऊंड शोच्या माध्यमातून इथल्या इतिहासाची माहिती पर्यटकांना करून दिली जाते.

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे बंधू गणेश म्हणजेच बाबाराव सावरकर दोघेही इथं होते. त्या दोहोंना २ वर्षे इथं असून पत्ता नव्हता की आपला सख्खा भाऊ याच कारागृहात आहे. इथं बंदिवास भोगलेल्या सर्व मंडळींची नावे आणि त्यांच्यावर चालवलेल्या गेलेल्या खटल्यांचे तपशील इथल्या संग्रहालयात पाहता येतात. केवळ स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याच यातनांना रास्त सन्मान मिळाला आहे या आरोपात अजिबात तथ्य नाही. अजून एक लक्षात घ्यायला हवे की त्या काळात महात्मा गांधी किंवा पंडित नेहरूंसारख्या नेत्यांना झालेले बंदिवास तुलनेने बरेच सुसह्य होते. महात्मा गांधी तर आगाखान पॅलेस सारख्या राजवाड्यात कैद होते. यावर असे समर्थन दिले जाते की राजबंदी विरुद्ध सशस्त्र क्रांतिकारी असा भेद असल्याने यातनामय कारावास त्यांना सहन करावा लागला नाही. अंदमानातील अनेक कैदी केवळ प्रक्षोभक लेख लिहिले म्हणून इथं डांबले गेले होते त्यांचा सशस्त्र आंदोलनात सहभाग नव्हता आणि त्यांनाही राजबंदी म्हणून dignified वागणूक मिळणे हा त्यांचा हक्क होता. अंदमानात स्वच्छ जेवण, अंघोळीसाठी साबण अशा अगदी प्राथमिक गरजांसाठीही या मंडळींना आंदोलने आणि सत्याग्रह करावे लागले. हा सगळा इतिहास फक्त वाचण्याचा नसून तिथं जाऊन अनुभवण्याचा आहे. स्वातंत्र्यदेवीच्या या तीर्थस्थळी भारतीयांनी आयुष्यात एकदा तरी जायला हवे. एकेकाळी कालापानी म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या या मंदिरात आता पवित्र तीर्थ प्राशन करायला आपण जायला हवे.