Darya Firasti

सीतापूरची अविस्मरणीय सकाळ

पहाटे सव्वाचार च्या सुमारास माझ्या रूमची बेल वाजली. सूर्योदय होण्याच्या आत मला सीतापूर किनारा गाठायचा होता त्यामुळे ठरल्याप्रमाणे रिक्षावाला आलेला होता. खरंतर मला नील आयलंड वर (आताचे नाव शहीद द्वीप) सीतापूर किनाऱ्याजवळच हॉटेल हवं होतं, पण ते उपलब्ध नसल्याने मी लक्ष्मणपूर किनारा क्रमांक २ जवळ exotica square नावाच्या ठिकाणी राहिलो होतो. सूर्योदयाची वेळ त्या दिवशी सकाळी पाच दहाची होती. होय अंदमानला सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही मुंबईच्या तुलनेत लवकर, म्हणजे सुमारे दीड तास आधी होतात. खंडप्राय देशात एकच टाइम झोन असल्याचे परिणाम.

अनुप नावाचा बंगाली रिक्षावाला मला मिळाला होता. इथं १९७१ नंतर बांगलादेश हून आलेले अनेक बंगाली हिंदू शरणार्थी वसवले गेले त्यामुळे बंगाली ही अंदमानातील एक महत्त्वाची भाषा आहे. किनाऱ्यावर पोहोचलो तेव्हा १५-२० पर्यटक आलेले होते. सूर्योदयाला १५ मिनिटे तरी वेळ होता त्यामुळे गरमागरम आल्याचा चहा घेऊन किनाऱ्यावर उतरलो. पावसाळ्याच्या नंतरचे हे दिवस त्यामुळे आकाशात, विशेषतः क्षितिजावर ढगांची भाऊगर्दी कायमच.. त्यामुळे सूर्योदय किंवा सूर्यास्त दोन्ही पाहताना सूर्यबिंब दिसणे तसे कठीणच. पण तरीही सूर्य उगवला तेव्हा निसर्गाची सुंदर चित्रकला आकाशाच्या कॅनव्हासवर पाहायला मिळाली.. ओहोटीची वेळ संपत आली होती आणि भरती अजून सुरु व्हायची होती.. त्यामुळे पाणीही शांतपणे अलगद किनाऱ्यावर पसरत होते.

अंदमान निकोबार बेटांचे वैशिष्ट्य म्हणजे इथं अनेक झाडे समुद्र किनाऱ्याच्या पुळणीवर दिसतात.. त्यांना पाने मात्र दिसत नाहीत.. फक्त खोड आणि त्याला आलेल्या फांद्या .. यातून किनाऱ्याला एक राकट सौंदर्य मिळते.. क्षितिजावर विविध रंगांची उधळण सुरु असताना या झाडांची सिल्हाऊट पाहायला छान वाटतं. ढगांचीही इथं वेगळीच गंमत असते. आकाशात विखुरलेल्या ढगांपेक्षा इथं क्षितिजरेषेवर उभे राहून वर गेलेले पुंजके दिसत असतात. समोर एका द्वीपाची रेषा आकाश आणि समुद्राच्या सीमेवर दिसत होती. नकाशात पाहून ते रोज आयलंड आहे हे लक्षात आले.

भरतीचा जोर आताशा हळूहळू जाणवायला लागला होता.. शांतपणे किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा आता खळखळत फेसाळत येत होत्या. त्या फेसाळत्या लाटांसमोर रेंगाळलेले वाळूतले दगड आणि बिळातून विविध ठिकाणी जाऊन खाद्य घेऊन येणाऱ्या खेकड्यांच्या पायांचे नक्षीकाम ओल्या वाळूत उठून दिसत होते. विषुववृत्तापासून हे ठिकाण फक्त १२ अक्षांश उत्तरेला असल्याने उष्ण आणि दमट अशीच इथली हवा.. पण आज मात्र सकाळची वेळ असल्याने थोडासा थंडावा आणि गार वाऱ्याची झुळूक जाणवत होती.. नंतर जीपीएस ट्रॅकर वर तपासलं त्याप्रमाणे तापमान २५ डिग्री सेल्शियस होते आणि सुमारे ४ किमी प्रतितास वेगाने वारेही वाहत होते…

सूर्य आता वर येऊ लागलेला असल्याने त्याची ऊबही जाणवत होती. तिथं जवळच एक छोटीशी गुफा होती.. त्यातून समुद्रकिनारा कसा दिसतो हे पाहत बसलो. गुहेच्या आत लाटांच्या आवाजाला एक गंभीर खोली लाभत होती. तिथं उभं राहून समुद्राकडेनजर रोखलेल्या एका पर्यटकाची प्रतिमा पोस्टकार्ड सारखी भासत होती.

हा समुद्रकिनारा अंदमानातील नील बेटासारख्या एका महत्वाच्या ठिकाणी जरी असला तरीही अतिशय शांत आणि रम्य असा अनुभव इथं मला मिळाला. स्वच्छ शुभ्र वाळू, त्यावर खडक, प्रवाळ, शंख शिंपल्यांची नक्षी.. किनाऱ्याच्या कडेला उंच हिरव्या वृक्षांची शीतल छाया आणि तिथं चालत असताना ऐकू येणारी रानपाखरांची किलबिल हा सगळा माहौलच खूप अद्भुत होता.

मी तिथं साधारण पाऊण तास चाललो असेन.. पण फक्त एक दीड किलोमीटर लांबीच्या या किनाऱ्यावरून निघावं असं वाटेचना. पुढल्या खेपेला कुटुंबासोबत अंदमानला आलो तर मग इथं सीतापूर जवळच मुक्काम करायचा असं मनोमन ठरवलं आणि मग परत निघालो. सूर्योदय पाहून बरेचसे पर्यटक परतले होते त्यामुळे मी एकटाच चालत परतत होतो. लाटांच्या निरंतर आवर्तनांच्या गजराबरोबरच त्यातून पार होताना आपल्या पावलांनी केलेला आवाज त्या नीरव शांततेला एक लय देत होता. भारतात पर्यटन करत असताना अशी शांतता अनुभवायला मिळाली की अगदी कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. नाहीतर इथं नील आयलंडवरच लक्ष्मणपूर किनारा क्रमांक २ वर प्रवाळांचा पूल पाहताना जी झुंबड आणि गोंगाट सहन करायला लागला होता त्यामानाने सीतापूर अगदी शांत होतं

पायऱ्या चढून वर आलो आणि एक शहाळं घेऊन रिचार्ज व्हायचं ठरवलं. तिथं टाकलेल्या बाकड्यावर बसून सीतापूर किनाऱ्याचा चंद्रकोरीसारखा आकार स्पष्ट दिसत होता. आकाशात ढगांचे पुंजके विखुरले होते.. भरतीच्या लाटा आता शुभ्र किनाऱ्याला व्यापू लागल्या होत्या.. क्षितिजावर रेंगाळलेल्या ढगाची लांब काळी सावली एखाद्या चित्रकाराने आऊटलाईन काढावी तशी भासत होती. खडकाळ किनारा, काही उन्हात चमकणारे खडक तर काही शेवाळाच्या हिरव्या छटेने सजलेले.. त्या खळग्यांमध्ये आता पाणी साचू लागले होते. ते दृश्य आठवणीत आणि कॅमेरात कैद करून मी हॉटेलकडे परत निघालो.

Leave a Reply

Discover more from Darya Firasti

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading