Darya Firasti

पोखरबाव शिव गणेश

देवगड तालुक्यात काही खूप विलक्षण मंदिरे आहेत, त्यापैकी सगळ्यात लोकप्रिय आणि तरीही शांत, रम्य असा परिसर असलेलं देऊळ म्हणजे पोखरबाव चा सिद्धिविनायक. विस्तीर्ण कातळ सड्यावर वाहणाऱ्या एका खळाळत्या ओढ्याला लागून असलेलं एक देवस्थान. आचऱ्याहून देवगड कडे जाताना एका अरुंद पुलाजवळ डाव्या बाजूला या देवळाची पाटी दिसते.

सड्यावर सावलीत गाडी लावायची, अन मंदिरात जाऊन आधी गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायचे. तिथं बाजूलाच उंदीर मामा सुद्धा आहे, त्याला आपले काही गाऱ्हाणे असेल तर सांगायचे. गुरवाने लावलेल्या उदबत्ती चा मंद दरवळ वाऱ्याची झुळूक आली की पसरत असतो. मी सकाळी लवकर गेलो होतो त्यामुळे पक्षांची किलबिल ऐकू येत होती आणि खालच्या अंगाला पाण्याचा खळखळाट ऐकू येत होता

त्या आवाजाचा कानोसा घेत मी पुढे गेलो तर पायऱ्या दिसल्या. खाली उतरल्यानंतर एक छोटेसे टुमदार शिवमंदिर आणि त्याला लागून वाहणारा ओढा असे अद्भुत दृश्य दिसले.

देऊळ ओढ्याच्या पलीकडे होते आणि थंडगार वाहत्या मिनरल वॉटर ने पाय भिजले आणि क्षणार्धात ताजेतवाने व्हायला झाले. स्वयंभू शिवलिंग आणि त्यावर सुबक पणे वाहिलेली तगरीची फुले असा अगदी minimalist आणि प्रसन्न करणारा भक्तिभाव.

मागे वळून पाहिले तर नीलकंठ शंकराची एक पद्मासनात ध्यानस्थ बसलेली मूर्ती दिसली. तिथल्या एकंदर निसर्गरम्य वातावरणात ही बहुतेक फायबर ची असलेली मूर्ती मला देवाची असली तरी काहीशी odd god out वाटली. हरहर महादेव असं म्हणून मी शंकर बाप्पांना दंडवत घातला. पूर्वी ती मूर्ती ओढ्यात ठेवलेली होती त्यामुळे ती जास्त छान दिसत असे. मी चॅटजीपीटी ची मदत घेऊन ते दृश्य visualise केले.

सुमारे साडेदहा अकरा वाजले असावेत. सूर्याजी राव आता वर आले होते आणि झाडांच्या शेंड्यातून झिरपत येणारी किरणे आता थोडी ऊब त्या घळीत घेऊन येत होती. तिथल्या दगडांतील लहानसहान कपारीतून मुंगळे बेडूक सरडे लगबग करताना दिसले. पाठीवर सोनेरी पदर असलेल्या एका चपळ सुरवंटाने माझे लक्ष वेधून घेतले. पाण्याचा डोह स्वच्छ असल्याने ती किरणे अगदी तळाला स्पर्श करून परावर्तित होत होती. डोहात अनेक रंगीत माशांची मुक्त भ्रमंती सुरू होती. हे मासे बहुदा रासबोरा डॅनडिया प्रजातीचे असावेत.

पश्चिमेच्या दिशेने तो प्रवाह पुन्हा जंगलाकडे जात होता. तिथं मला पाण्यात अजून एक शिवलिंग दिसले. शिवलिंगाला निसर्गदेवता अखंड अभिषेक करत होती.

तिथून जवळच कुणकेश्वर मंदिराच्या समुद्र किनाऱ्यावर जांभा दगडातील अनेक शिवलिंगे आहेत त्यांची मला आठवण झाली. देवळाच्या सभामंडपात एक सिंह शिल्प होते. जंगलाकडे पाहणारी, डरकाळी फोडणारी वनराजाची ती आकृती रुबाबदार दिसत होती.

मी जवळपास तासभर तरी तिथं पाण्यात पाय बुडवून बसलो होतो. ना जगाची आठवण ना वेळेचे भान. तिथल्या शांततेत तल्लीन होऊन गेलेल्या मला डोक्यात पंडित जितेंद्र अभिषेकींनी गायलेलं बा. भ. बोरकरांचं काव्य घोळतंय हे लक्षात आलं. अशा शांत गूढ ठिकाणी मला अगदी समर्पक पद्य आठवलं म्हणायचं.. कदाचित सकाळी रेडियोवर कुठंतरी ऐकलं असेल.

नाही पुण्याची मोजणी नाही पापाची टोचणी जिणे गंगौघाचे पाणी
कशाचा न लागभाग कशाचा न पाठलाग आम्ही हो फुलांचे पराग
आम्हा नाही नाम-रूपआम्ही आकाश स्वरूपजसा निळा निळा धूप
पुजेतल्या पानाफुलामृत्यू सर्वांग सोहळाधन्य निर्माल्याची कळा

या मंदिराच्या समोरच सड्यावर एका गडग्यामध्ये दाभोळे कातळशिल्प आहे. आणि ७-८ किलोमीटर अंतरावर कोटकामते गावातील सरखेल कान्होजी आंग्रेंनी जीर्णोद्धार केलेलं भगवती मंदिर सुद्धा आवर्जून पाहण्यासारखे आहे.

Leave a comment