Darya Firasti

आंजर्ल्याची दुर्गादेवी

कोकणातील दीड-दोन किमीचा सुंदर किनारा लाभलेलं आणि पर्यटनासाठी लोकप्रिय असं एक गाव म्हणजे आंजर्ले. या गावातून फेरफटका मारत असताना जुन्या काळातील वास्तुरचनेचा वारसा जपणारी कित्येक घरे आपण पाहू शकतो. ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनासाठीही हे गाव प्रसिद्ध आहे. सरदार शिर्के आणि खामकरांनी आंजर्ले गाव वसवले असे मी काही पुस्तकांत वाचले होते.

आंजर्ले गावाचा दक्षिण किनारा जोग नदीच्या मुखाशी आहे. तिथेच असलेल्या टेकडीवरील कड्यावरचा गणपती अतिशय प्रसिद्ध आहे. जोग नदीपलीकडे पाजपंढरी आणि हर्णे गावे येतात तर उत्तर दिशेने गेले तर पाडले आणि आडे ही गावे लागतात.

थोरले बाजीराव पेशवे यांनी प्राणप्रतिष्ठा केलेली दुर्गादेवीची मूर्ती असलेलं अतिशय सुंदर लाकडी बांधकाम आणि कोरीवकाम केलेलं मंदिर इथं पाहता येते. चैत्र महिन्यातील दुर्गादेवीचा उत्सव हे या गावाचे वैशिष्ट्य आहे. गावातील मुख्य रस्त्यावरच दुर्गादेवीचे कौलारू मंदिर आहे. त्याचा फोटो काढत असताना माझ्या लक्षात आले नव्हते की माझ्यासमोरून करडा धनेश म्हणजेच ग्रे हॉर्नबिल उडत जातोय. अनेक महिन्यांनी फोटो एडिट करत असताना ही गंमत कळली.

मार्च एप्रिलच्या सुमारास इथं कासवांची पिल्लेही सोडली जातात त्यामुळे कासव महोत्सवासाठीही इथं बऱ्यापैकी गर्दी असतेच. दुर्गादेवीची धीरगंभीर मुद्रा पाहून मनाला एक अनोखी शांतता लाभते. एखाद्या भक्ताने अर्पण केलेली साडी, ताजी फुले, उदबत्तीचा दरवळ, तेवणारी समई असं सगळं अनुभवत आपण तिथेच स्तब्ध होतो.

कोकणातील लाकडी बांधकाम अन कोरीवकाम असलेली मंदिरे हा खरोखरच एक आर्ट हिस्ट्री आणि स्थापत्याच्या अभ्यासाचा विषय आहे. विशेषतः जुन्या बांधकामाच्या संवर्धनाच्या दृष्टीने हे एक आव्हानात्मक पण तरीही महत्वाचं काम आहे. अशा प्रकारचे बांधकाम असलेली शंभर तरी मंदिरे मी कोकणात पाहिली असतील.

अशा दीडदोनशे वर्ष जुन्या मंदिरांचा जेव्हा जीर्णोद्धार केला जातो तेव्हा कधीकधी या पुरातन ठेव्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. कोकणातील हवामानात लाकडाची काळजी घेणे कठीण आणि तसेच बांधकाम पुन्हा करायचे तर खर्चिक. अशावेळेला कमी उत्पन्न असलेल्या छोट्या मंदिरांसाठी हे शिवधनुष्य उचलण्यासारखेच असते.

अश्या कोरीवकामासाठी पटाशी सारखी प्राथमिक हत्यारेच वापरली जात. या पटाश्या प्रामुख्याने तीन प्रकारच्या असतात. त्यांची पाती चपटी, अर्धगोलाकार आणि इंग्रजी v च्या आकाराची असतात. कूर्ग आणि केरळ प्रमाणे इथेही फणसाचे लाकूड त्याची उपलब्धता आणि उपयुक्तता लक्षात घेऊन वापरले असावे ही शक्यता डॉ. दीपक कन्नल यांच्यासारखे ज्येष्ठ शिल्पकार आणि शिल्पकला अभ्यासक वर्तवतात. त्यांच्यामते या कोरीवकामात एक fleshy feel आहे. म्हणजेच लाकडाला अगदी बारीक हत्यारे वापरून एक गुळगुळीत, मृदू, मानवी त्वचेसारखे वाटावे असे texture दिले गेलेले दिसते. हे कोरीवकाम करणारे लोक कोण होते, त्यांचे नेतृत्व करणारे अभिकल्पक कोण होते, इथं कोरलेले मोटिफ त्यांना कसे सुचले, त्यांच्यावर कोणत्या शिल्पकला शैलीचा प्रभाव होता असे अनेक प्रश्न अभ्यासनीय आणि आजमितीला तरी अनुत्तरित आहेत. एक जोडपे कलश आणि रोपटे घेऊन उभे आहे असे एका खांबावर कोरलेले दिसते जे मला इतर मंदिरांतील कोरीवकामापेक्षा काहीसे वेगळे वाटले.

कोकणातील ज्येष्ठ भूगोल प्राध्यापक सुरेंद्र ठाकूरदेसाई या कोरीवकामासाठी फणसाचे लाकूड वापरले जाते याला दुजोरा देतात. या लाकडाचे मोठ्या आकाराचे जाडजूड सरळसोट तुकडे मिळतात आणि ते फाटत नाही त्यामुळे बांधकाम आणि शिल्पकला दोन्हीसाठी ते सोयीचे पडते. इथं असलेल्या एका लेखाप्रमाणे शके १८८६ मध्ये म्हणजे इसवीसन १९६४ मध्ये कृष्ण पक्षात रवीच्या मीन राशीत बुध सौम्य असताना या देवीच्या मंडपाची स्थापना झाली. मूळ मूर्तीची स्थापना इसवीसन १७३१ ला झाली असे गर्भगृहावरील लेख सांगतो.

हे मंदिर कोकणात मी पाहिलेल्या सर्वात सुंदर मंदिरांपैकी एक आहे असे म्हणता येईल. सभामंडपाबाहेर देवीच्या यात्रेची लाकडी पालखी, देवळाची बाग, विहीर, शेजारीच असलेले अगदी साधे कोकणी घर अशा गोष्टी लक्ष वेधून घेतात. सगळं कसं सुबक नीटनेटके एकत्र मांडले आहे असे दिसते.

या मंदिराच्या सभामंडपाच्या बाबतीत मला खूपच रंजक वाटलेली गोष्ट म्हणजे इथं असलेले फोटो. अनेक धार्मिक प्रसंग, देवदेवता, आख्यायिका यांचे फोटो तर आहेतच शिवाय विविध राजकीय विचारसरणीच्या मंडळींनीही इथं जागा पटकावली आहे. अगदी डावे किंवा कट्टर कम्युनिस्ट सोडले तर साधारणपणे ही निवड सर्वसमावेशक म्हणायला हरकत नाही. मध्यभागी दीनदयाळ उपाध्याय.. एका बाजूला गोळवलकर, विवेकानंद, महाकवी रवींद्रनाथ ठाकूर असा संमिश्र राजकीय अध्यात्मिक मामला .. मग टिळकांसारखे  व्यक्तिमत्व आणि उजवीकडे नेताजी सुभाषचंद्र बोस, लाल बहादूर शास्त्री, वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू अशी मंडळी.

चित्पावनांची कुलदेवता अंबेजोगाईची योगेश्वरी. पण कोकणातील दुर्गा हे तिचेच रूप असेही मानले जाते.. त्यामुळे दुर्गादेवी हे चित्पावनांसाठी महत्वाचे आराध्य. दुर्गादेवीचे ध्यान करण्यासाठीचा श्लोक आणि सभामंडप बांधला त्या खर्चाचा ताळेबंद या दोन्ही गोष्टींची माहिती इथं रंगवलेल्या तपशीलातून लक्षात येते. साधारणपणे सतरा हजार रुपयांत हे काम झाले असे दिसते आहे.

आमची दुसरी कासव महोत्सव सहल २०२३ साली याच गावात झाली. भटकरांच्या शतकभर तरी जुन्या असलेल्या घराच्या बाजूला किनाऱ्यावरच आम्ही राहिलो.. तो अनुभव विलक्षणच होता.. त्याबद्दल पुन्हा कधीतरी सविस्तर. आंजर्ले या गावाने दर्या फिरस्तीला कोकण आणि निसर्गप्रेमी अक्षता बापट नामक मैत्रीण दिली. भारतातील विविध जंगलांतील वन्यजीव पर्यटन हा तिचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अशा मंडळींबरोबर डोळस पर्यटन करणे हा समृद्ध करणारा अनुभव असतो. इथे जवळच ताडाचा कोंड दीपगृह सुद्धा पाहण्याजोगे आहे.

One comment

  1. Nitin Karkare's avatar Nitin Karkare

    अप्रतिम. आत्ताची आधुनिक हत्यारे नसताना केलेलं कोरीवकाम लाजवाब. मंदिराच्या सभामंडपात लावलेले फोटो बघून लहानपण आठवलं. तुरळच्या देवळात व इतर बरेच ठिकाणी असे फोटो होते. कालांतराने ते गायब झाले. मध्यंतरी तुरळला तसे फोटो लावायचे ठरवले होते पण राहून गेलं आत्ता वरील फोटो बघून पून्हा ईच्छा झाली.

Leave a reply to Nitin Karkare Cancel reply