Darya Firasti

मिठबावची गजबादेवी

कोकणातील सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक म्हणजे तांबळडेग मिठवाब ची लांबलचक पुळण. इथं तारकर्ली-देवबाग सारखी पर्यटकांची तोबा गर्दी आणि त्याबरोबर येणारे विक्रेते, बोटिंग वाले यांचा गोंगाट नसल्याने हे ठिकाण अजून तरी शांत आणि मनाला प्रसन्न शांतता देईल असं आहे. या किनाऱ्याच्या उत्तर टोकाला असलेल्या एका टेकडीवर गजबादेवीचे मंदिर आहे. इथून संपूर्ण पुळण एका नजरेत दिसते. भरती-ओहोटीची आंदोलने दिसतात. देवीला गाऱ्हाणे सांगायला आलेल्या भक्तांच्या भक्तिभावाने इथलं वातावरण भारलेलं असतं. समुद्राच्या स्वच्छंद फेसाळत्या लाटा इथं पांढऱ्या शुभ्र वाळूला चिंब भिजवत असतात.

देऊळ तसं छोटंसं आणि साधंसं असलं तरीही मिठबावच्या पंचक्रोशीत हे फार महत्वाचं ठिकाण मानलं जातं. याचा नेमका इतिहास किती वर्षे जुना आहे हे जरी ठाऊक नसलं तरीही गेली शंभर वर्षे तरी भक्तांसाठी हे ठिकाण जागृत आहे हे नक्की.

जवळच एमटीडीसी तर्फे एक अद्ययावत रिसॉर्ट चालवले जाते त्यामुळे रस्त्यांची स्थिती तर चांगली आहेच शिवाय अनेक ठिकाणी सुशोभीकरणही केलेले दिसते. मंदिराच्या अलीकडच्या वळणावर तुम्हाला अचानक हे कोळी जोडपे दर्शन देते.

मूळ आद्यस्थानाचा पहिला जीर्णोध्दार शालिवाहन शके 1842 रौद्र नाम संवत्सर माघ शुध्द एकादशी शुक्रवार दि.18 फेब्रुवारी 1921 रोजी फाटक-मिराशी या गावकरी मंडळींनी केला. देवळात लावलेला फलक सांगतो की २०व्या शतकाच्या अखेरीस या गावच्या रवींद्र सदानंद फाटकांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्याप्रसंगी १९९७ साली धर्मवीर आनंद दिघे इथं आले होते. इथल्या शांत, रम्य वातावरणात लाटांच्या गजरात आणि वाऱ्याची तान यांच्या सोबतीला देवीची आरती अनुभवणे म्हणजे एक अद्वितीय अनुभव.

मंदिरासमोर खास कोकणी पद्धतीची सुंदर दीपमाळ आहे. तिथं उभे राहून सकाळी आणि मावळतीला समुद्राचा देखावा पाहताना कसा वेळ निघून जातो कळतही नाही. संध्याकाळच्या वेळेला इथं सूर्यास्त पाहायला पर्यटक गर्दी करतात. किनाऱ्यावरील जांभा खडकांवर आदळणाऱ्या लाटांची कारंजी पाहणे आणि ते तुषार अंगावर घेत घेत समुद्र लीला पाहत बसणे ही इथली खास पर्वणी..

सकाळी सूर्य थोडासा वर आल्यानंतर आणि उन्हाची धग वाढण्याआधी तांबळडेग मिठबांव च्या किनाऱ्यावरून चालत चालत गजबादेवीच्या टोकाला यायचे. इथल्या किनाऱ्याला थोडासा उतार असल्याने लाटांच्या आवाजाचा सूर थोडासा वेगळा लागतो. साधारणपणे पावणेतीन तीन किलोमीटर चालत आपण तांबळडेग च्या दक्षिण टोकाला आलो की समोर मोर्वेचा निर्मनुष्य सागरतीर दिसतो आणि नारिंग्रे नदीच्या मुखाशी वाळूच्या स्वच्छ शुभ्र दांड्यावर बसून समुद्रगीत ऐकत आपण पुढच्या दर्या फिरस्तीचे नियोजन करू लागतो.

Leave a Reply

Discover more from Darya Firasti

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading