Darya Firasti

आचरा पॉईंट दीपगृह

एका बाजूला नजर जाईल तिथवर समुद्र आणि त्याला आकाशात सामावून घेणारी क्षितिजरेषा तर दुसऱ्या बाजूला कांदळवनाने भरलेली शांत खाडी.. खाडीच्या दक्षिण तीरावर एक स्वच्छ शांत सागरतट आणि उत्तरेला वनराईने गच्च भरलेली टेकडी, या टेकडीची उंची साधारणपणे ६५ मीटर म्हणजे २१३ फूट असू शकेल. त्या आडबाजूच्या निर्मनुष्य टेकडीवरील आकर्षण पाहायला आज आपण चाललो आहोत. इथं सड्यावर आहे आचरा पॉईंट दीपगृह.

इथं जाण्याचे मार्ग दोन. एक म्हणजे मुणगे गावातून सड्यावर रिक्षा/ बाईक ने एका ठिकाणापर्यंत येणे आणि चालत पुढे जाणे, किंवा पुढे असलेल्या आडबंदर येथे आचऱ्याजवळील जामडूल बेटावरून बोटीने येणे व अर्धा तास चालत पायवाटेने दीपगृह गाठणे. मी इथेच सकाळी कांदळवन बोट सफारी साठी आलो होतो त्यामुळे सफारी चालवणाऱ्या वाडेकर काकांसोबत आचरा पॉईंट दीपगृहाकडे चालत गेलो. आचरा कांदळवन हे आशियातील एक महत्वाचे कांदळवन आहे, त्यामुळे या खारफुटीची भ्रमंती जरूर करायला हवी.. त्याची गोष्ट पुन्हा केव्हातरी.

जामडूल गाव मालवण तालुक्यात तर आडबंदर देवगड तालुक्यात, त्यामुळे आचरा गाव आणि आचरा पॉईंट दीपगृह दोन भिन्न तालुक्यात आहेत ही गमतीची गोष्ट. सुमारे दहा-साडेदहाच्या सुमारास आम्ही टेकडी चढायला सुरुवात केली.. टेकडीवरून खाडीकडे उतरणाऱ्या एका ओढ्याच्या वाटेने आम्ही वर चढत होतो. वाटेत एकदोन ठिकाणी रस्ता चुकून आपल्या कंपूपासून ताटातूट झालेली गुरेही भेटली. वाडेकर काका आचऱ्याच्या कांदळवनात जवळपास पंचवीस वर्षे पर्यावरण स्नेही पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहेत. आता त्यांचा मुलगा सुद्धा या कामात सहभागी आहे.

पावसाळा सुरू होता त्यामुळे सड्यावर सर्वत्र अगदी हिरवगार गालीचा पसरल्यासारखा वातावरण होतं. आकाश ढगाळलेलं होतं आणि वातावरणात खूपच आर्द्रता होती. त्यामुळे नेहमीपेक्षा जास्ती थकायला होत होता परंतु सोसाट्याचा वारा वाहत असल्यामुळे तेवढाच थंडावा मिळत होता जांभा दगडातील कपारींमध्ये उगवलेल्या रान वनस्पती लक्ष वेधून घेत होत्या.

दीड पावणे दोन किलोमीटरची पायपीट केल्यानंतर शेवटी एकदाचे दीपगृहाने दर्शन दिले या दीपगृहाची उंची त्याच्या पायथ्यापासून सुमारे 17 मीटर आहे. सौरऊर्जेवर काम करणाऱ्या दीपगृहात अमेरिकन बनावटीचे दिवे आहेत त्यांचा उजेड सुमारे 8 नॉटिकल माइल पर्यंत जातो.. दर 6 सेकंदांनी पांढऱ्या रंगाच्या दिव्यांचा झोत दोनदा चमकणे हा इथला पॅटर्न आहे. या दीपगृहाचे बांधकाम 2014 साली अशी नोंद सापडते.

दीपगृहाच्या उत्तर दिशेला नजर फिरवली तर दूर पसरलेला सडा दिसतो. या पूर्ण सड्यावर हिरवेगार झुडपांचे आणि गवताचे आच्छादन पावसाळ्यात असते. आम्ही तिथे बसलेलो असताना घिरट्या घालणारा पांढऱ्या पोटाचा समुद्री गरुडही आम्हाला दिसला परंतु तो इतक्या उंचावर होता आणि इतक्या वेगात उडत होता की त्याचा फोटो टिपणे शक्य झाले नाही. तिथे निसर्गाने केलेली एक करामत मात्र आम्हाला नक्की पाहता आली. पूर्वी कधीतरी आलेल्या ताकदवान वादळाच्या दरम्यान कडाडणारी वीज इथल्या जांभा खडकावर आढळून त्याला प्रचंड मोठे तडे गेलेले आम्हाला दिसले.

दीपगृहाच्या दक्षिण दिशेला आचरा गाव त्याचा समुद्र किनारा जामडूल बेट आणि आचरा खाडी यांचे अतिशय विलोभनीय दृश्य पाहता येते भरतीच्या वेळेला लाटा आचरा किनाऱ्याच्या इतक्या आत वर जातात की वाळूचा पट्टा ही जवळजवळ अदृश्य होऊन जातो. आचरा नदीचे कांदळ वनाच्या टोकावरील मुख इथे आपल्याला अगदी स्पष्ट दिसते ही नदी फोंडा घाटात सावरावच्या दक्षिणेला फोंडा गावाच्या नैऋत्येला कणकवली तालुक्यात उगम पावते आणि साधारणपणे पन्नास किलोमीटरचा प्रवास करून या ठिकाणी समुद्रात जाऊन मिळते.

इथल्या दिव्याची रचना आणि त्याच्याबरोबर जोडली गेलेली यंत्रणा पाहणे फारच रंजक होते. सौरऊर्जा कमी पडल्यास इथं बॅटरीच्या मदतीने विजेचा बॅकअप दिला जातो शिवाय अग्निशमन उपकरणे आहेत. नेहमीप्रमाणेच दीपगृहाच्या गोलाकार पायऱ्या उतरत खाली पाहत जाताना फारच मजा आली

या ठिकाणच्या जंगलामध्ये अस्वल बिबट्या कोल्हे अशी बरीच जंगली श्वापदे आहेत असं दीपगृहाची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं. या सड्यावर पूर्वी मोठ्या प्रमाणात भाताची लागवड होत असे परंतु कोकणातील लोकसंख्या कमी होत आहे आणि त्या हिशोबाने लागवडीखाली येणारे शेती क्षेत्र ही झपाट्याने कमी होत आहे इथं शेतीला माणसे मिळणे ही अतिशय मुश्कील असल्याने पूर्वी इतकी शेती चालू ठेवणे कठीण असल्याचे वाडेकर काकांनी सांगितले. जर स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला तर शेतीसारख्या बिनभरोशाच्या व्यवसायावर अवलंबून न राहता तिला जोड देणारे इतर उद्योग करूनही तरुणांना उत्कर्ष साधता येईल असं त्यांना वाटतं.

दुपारपर्यंत आम्ही खाली उतरलो, बोटीने पुन्हा एकदा जामडूला आलो आणि मग आसपासची काही मंदिरे पाहिल्यानंतर मी संध्याकाळी आचरा समुद्रकिनाऱ्यावर गेलो. पाऊस तर नव्हता पण पावसाळी हवामान होते. काहीसे धुके दाटल्यासारखे वाटत होते आणि किनाऱ्यावरून दुपारी आम्ही पाहिले ते दीपगृह आता अगदी ध्रुवताऱ्यासारखे अढळ त्या डोंगरावर उभे राहिले आहे असे भासत होते.

One comment

  1. Pingback: बीच ट्रेक: सागरसाद केउंडल्याची | Darya Firasti

Leave a comment