Darya Firasti

कोकणातील सर्वोत्तम समुद्रकिनारे

रेवस ते तेरेखोल या जवळपास ७०० किमी लांब किनारपट्टीवर शंभर सव्वाशे समुद्रकिनारे आहेत. यापैकी अनेक किनारे पर्यटकांच्या यादीत हक्काचं स्थान कमावलेले आहेत तर काही थोडे आडबाजूला दुर्लक्षित आहेत. दर्या फिरस्तीच्या प्रवासात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्याच समुद्र किनाऱ्यांचं चित्रण आम्ही केलं. त्यापैकी काही किनारे हे समुद्र सौंदर्य अनुभवण्याच्या दृष्टीने अद्वितीय आहेत. वाळूची पुळण, समुद्राच्या लाटांनी धरलेला ताल, निळ्या आकाशाशी क्षितिजरेषेला भिडणारी सागर निळाई. प्रत्येक किनाऱ्यावर या सगळ्या गोष्टींचा एक वेगळा अनुभव आपल्याला मिळतो. कुठं पर्यटकांचा गजबजाट तर कुठं अस्पर्श किनाऱ्यावर मिळणारा एकांत अनुभव. कोकण भ्रमंतीत गवसलेली अनेक ठिकाणं मी या पोस्टद्वारे तुमच्या पर्यंत आणणार आहे. पण तुम्ही सुद्धा एक वचन द्यायला हवं. किनाऱ्यावर स्वच्छता, सुरक्षितता आणि पर्यावरण यांचा विचार करून एक जबाबदार पर्यटक म्हणून प्रवास करण्याचं वचन. काही गोष्टींची काळजी नक्की घ्या – १) प्लॅस्टीक नेऊ नका, न्यावं लागलंच तर परत घेऊन या २) पाण्याच्या बाटल्या, खाण्यापिण्याचा किंवा इतर कोणताही कचरा किनाऱ्यावर टाकू नका ३) शांत नीरव ठिकाणी आरडाओरडा, शिवीगाळ, गाणी लावून गोंधळ करणे अशा गोष्टी जाणीवपूर्वक टाळा ४) भरती-ओहोटीचा अंदाज घेऊन स्थानिकांचे मार्गदर्शन घेऊनच पाण्यात उतरा ५) सेल्फी काढायला स्वतःचा किंवा तुमच्या स्नेह्यांचा जीव धोक्यात घालू नका. ६) जर गाडी किंवा वाहन घेऊन जाणार असाल तर परत येताना जमेल तितका कचरा गोळा करून किनाऱ्यापासून दूर त्याची विल्हेवाट लावा.

कोणता किनारा जास्त चांगला हे ठरवणं खरंच खूप कठीण आहे. आणि प्रत्येक समुद्र रसिकाला विचारलं तर प्रत्येकाचं मतही वेगळं असणारच. त्यामुळे कोणतेही रँकिंग करणं म्हणजे वादाला आमंत्रण देणं. तरीही कोकण प्रवासात चुकवू नयेत असे सगळ्यात भारी 50 किनारे कोणते असं विचारलं तर मी माझी निवड ही असेल –

Awas beach

1) आवास – मुंबईपासून फार दूर नसलेल्या या गावातील समुद्रावर फेरफटका मारण्याचा अनुभव निराळाच. इथं जवळच सासवणेला करमरकर शिल्प संग्रहालयही पाहता येते.

2) किहीम – पक्षी अभ्यासक सलीम अली यांचे गाव आणि कोकणातील बेने इस्राईल समाजाचे आश्रयस्थान. जेव्हा पर्यटकांची गर्दी इथं नसते तेव्हा इथली निवांतता अद्भुत भासते.

Varsoli beach

3) वरसोली – अलिबागच्या अगदी जवळ पण गोंगाट नसलेला एक स्वच्छ, शुभ्र वाळूचा किनारा. कुलाबा किल्ल्याचे दृश्य आपण इथून पाहू शकतो.

Alibaug beach

4) अलिबाग – मुंबईच्या पर्यटकांचे अगदी लाडके ठिकाण आणि कुलाबा किल्ल्याच्या रूपाने एक महत्त्वाचे ऐतिहासिक स्थळही. अलिबाग हे कान्होजी आंग्रेंच्या आरमाराचे मुख्य ठिकाण होते.

5) रेवदंडा – पोर्तुगीज बांधणीचा किल्ला इथं ओहोटीच्या वेळेला येऊन आवर्जून पाहायलाच हवा.

6) कोर्लई – कोर्लईच्या दुर्गाला लागून असलेला छोटासाच पण रम्य किनारा. या गावात एक वैशिष्ट्यपूर्ण भाषा बोलली जाते बरं का!

7) मुरुड – छत्रपती शिवरायांनी बांधलेला पद्मदुर्ग आणि त्याच्या बरोबर अस्ताला जाणारा सूर्यनारायण हे अनुभवायला मुरुड-जंजिरा गाठावे लागते.

Adgaon beach

8) आदगाव – दिवेआगरला जाताना लागणारे एक छोटेसे गाव आणि तिथला रस्त्याला लागूनच असलेला हा आदगाव चा किनारा.

Kondvil beach

9) कोंडविल – बाईक किंवा गाडीने हिंडताना रस्ता कधी समुद्राशी गप्पा मारायला लागतो हे समजतच नाही. श्रीवर्धनजवळचा एक अप्रतिम समुद्रकिनारा.

Diveagar beach

10) दिवेआगर – दिवेआगर हे एक प्राचीन आखीव-रेखीव गाव. लांबलचक पुळणीवर उभे राहून सांजवेळी निवांतपणे दिवसाला निरोप द्यायचा.

Hariharehwar beach

11) हरिहरेश्वर – दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेले हरिहरेश्वर हे भगवान श्री शंकराचे स्थान. आणि तिथं असलेला विस्तीर्ण सागरतट.

Velas beach

12) वेळास – वेळास खरंतर कासवांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे पण इथल्या किनाऱ्यावर थंड हवा, तांबूस वाळू आणि सागराच्या लाटांचा ताल अनुभवायला सुद्धा यायला हवं.

Kelshi beach

13) केळशी – या छोट्या टुमदार गावातला समुद्रकिनारा म्हणजे बालपणीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीची आठवण करून देणारा अनुभव.

Savne beach

14) सावणे – पर्यटन नकाशावर परिचित नसलेला परंतु टेकडीवरून सागराचे आणि सुवर्णदुर्गाचे दर्शन देणारा सावणेचा किनारा हर्णेकडे जाताना खुणावत असतो.

Anjarle beach

15) आंजर्ले – कड्यावरील गणपतीचा आशीर्वाद घेऊन आंजर्ले किनाऱ्यावर फेरफटका मारायला यायचे. सोबत आंब्याची पेटी असेल तर बहारच. इथेही आता ऑलिव्ह रिडले कासवांचे संवर्धन सुरु झाले आहे.

Kolthare beach

16) कोळथरे – दाभोळ जवळचे एक छोटेसे गाव. कोळेश्वराचे देवालय आणि पंचनदी नदीच्या मुखाच्या उत्तरेला असणारा छोटासा सागरतीर.

Guhagar beach

17) गुहागर – विस्तीर्ण अथांग सागर. सुंदर स्वच्छ पुळण आणि किनाऱ्याला लागून असलेल्या नारळ-पोफळीच्या बागा ही गुहागरची खासियत.

Budhal beach

18) बुधल – सागरी महामार्गापासून पाच-सहा किलोमीटर आत आडवाटेवर असलेलं हे गाव. एरवी अगदी शांत. पण भरतीला इथं सागराच्या लाटा खडकांवर आदळून गर्जना करू लागतात.

Kunabiwadi beach

19) कुणबीवाडी – जयगड दीपगृहाजवळच असलेला सफेद वाळूचा हा किनारा. जांभा दगडाच्या नक्षीने नटलेला.

Ambuwadi beach

20) अंबुवाडी – जयगड गावाजवळ असलेला एक अप्रतिम किनारा.

Reel beach

21) रीळ – जयगड ते गणपतीपुळे प्रवासात रीळ-उंडीची लांबलचक किनारपट्टी आपलं लक्ष वेधून घेते.

Malgund beach

22) मालगुंड – कविवर्य केशवसुत यांचे हे गाव. गणपतीपुळ्यापासून जवळच आहे आणि लांबलचक सुंदर अस्पर्श किनारा या गावाला लाभला आहे.

Bhandarpule beach

23) भांडारपुळे – पर्यटकांची गर्दी जरी गणपतीपुळेला असली तरी काही अंतरावरील या सुंदर समुद्रकिनाऱ्याला आवर्जून भेट द्यायला हवी.


24) गणेशगुळे – गुळ्याचा गणपती पुळ्याला गेला अशी आख्यायिका या भागात सांगितली जाते. रत्नागिरीजवळच असलेला हा रम्य सागरकिनारा


25) वेत्ये – अडिवरेच्या महाकालीचा आशीर्वाद घ्यायचा आणि तिचं माहेर समजलं जाणारं वेत्ये गाव गाठायचं. नितळ पाणी, शुभ्र वाळू आणि निरभ्र आकाश असा योग इथं नेहमीच जुळून येतो.

26) गोडीवणे – आंबोळगडचा शेजारी असलेला हा समुद्रकिनारा. पर्यटकांची गर्दी आणि गोंगाट यापासून अजूनतरी अलिप्त असलेला. सकाळी लवकर इथं येऊन ३-४ किलोमीटरची समुद्र फेरी करायला इथं यायला हवं.

Madban beach

27) माडबन – विजयदुर्गाचा सखा असलेला हा किनारा. वाघोटण नदी जिथं समुद्राला जाऊन मिळते तिथं समोरच घेरिया किल्ल्याचे म्हणजेच विजयदुर्गाचे दृश्य आपल्याला दिसते.

Bakale beach

28) बाकाळे – या किनाऱ्यावर जायला गाडी रस्ता नाही. पण बाकाळे गावात चौकशी करून सड्यावर जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने दोन अडीच किलोमीटर पश्चिमेला जायचे. सड्यावर गाडी पार्क करून पायवाटेने हा रमणीय किनारा गाठायचा.

Devgad beach

29) देवगड – देवगडचे हापूस प्रसिद्ध आहेतच आणि तिथला किल्लाही. पण पवनचक्क्या आणि समुद्रकिनाराही तितकाच सुंदर.

Mithmumbari beach

30) मीठमुंबरी – देवगडहून कुणकेश्वरला जाणाऱ्या नवीन रस्त्याने सागराची अथांग निळाई अनुभवायला मिठमुंबरीला जाता येते.

Kunakeshwar beach

31) कुणकेश्वर – कोकणातील एका महत्त्वाच्या शिवमंदिराला लागून असलेल्या या किनाऱ्यावर कोळी बांधवांची लगबग पाहताना भटकंती करणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.

Munage beach

32) मुणगे – आचऱ्याच्या उत्तरेला थोडा आडबाजूला असलेला हा किनारा. गर्दी नाही, गडबड नाही, कसलीही घाई नाही. फक्त तुम्ही आणि व्हिटॅमिन सी.

Tondavali beach

33) तोंडवळी – समुद्र किनाऱ्याजवळ जंगल आणि वाघोबाचा वावर.. तोंडवळीच्या किनाऱ्याची बातच न्यारी.

Talashil beach
34) तळाशील - गड नदी जिथं समुद्राला जाऊन मिळते तिथं या संगमाचे दृश्य पाहणे एक स्वप्नवत अनुभव असतो. तळाशील ची दांडी मालवणपासून फार दूर नाही. सर्जेकोट बंदरातूनही ही झलक पाहता येते.
Devbag sangam beach

35) देवबाग संगम – कर्ली नदीच्या मुखाशी असलेला देवबागचा संगम म्हणजे जणू निसर्गाने काढलेलं चित्रच

Bhogawe beach

36) भोगवे – भोगवेचा हा किनारा लवकरच ब्लू फ्लॅग प्रमाणपत्राचा मानकरी ठरणार आहे. माझा हा कोकणातील सगळ्यात लाडका किनारा.

Nivati beach

37) निवती – क्वार्टझाइट खडकांच्या सोबतीला एक छोटंसं गाव आणि टेकडीवरील किल्ला. ही आहे निवतीची कहाणी.

Shriramwadi Dandeshwar beach

38) दांडेश्वर-श्रीरामवाडी – दांडेश्वर श्रीरामवाडीच्या किनाऱ्यावर भरतीच्या लाटा जांभा खडकांना आदळून एक वेगळाच ताल धरतात.

Kelus mobar beach

39) केळूस-मोबार – केळूस किनाऱ्याला खाडीचे उथळ पाणी एक वेगळी शोभा आणते. सोबतीला नारळाची झाडे आणि आकाशात ढगांचे पुंजकेही असतात.

Falayefondwadi beach

40) फळयेफोंडवाडी – हमरस्त्यापासून दूर आतवर गेल्यावर काही अंतर चालून आपण फळयेफोंडवाडीच्या किनाऱ्यावर पोहोचतो. इथलं सागर सौंदर्य कितीही वेळ पाहत बसलं तरीही मन तृप्त होत नाही.

Kondura beach

41) कोंडुरा – खानोलकरांच्या कादंबरीत आणि शाम बेनेगलांच्या सिनेमात झळकलेला हा अगदी छोटासा पण अद्वितीय किनारा.

Dabholi Wayangani beach

42) दाभोळी – वेंगुर्ल्याजवळ असलेलं दाभोळी-वायंगणी गाव आणि तिथला हा रम्य सागरतीर. इथं समुद्राला हिरवळीची सोबत आहे.

Mochemad beach

43) मोचेमाड – मोचेमाडच्या छोट्याशा किनाऱ्यावर वाळूच्या ओंजळीत समुद्राचे स्वच्छ पाणी स्थिरावते. त्याचं नितळ सौंदर्य अनुभवताना मुग्ध व्हायला होतं.

Kadoba beach

44) कडोबा – आरवली-सागरतीर्थ किनाऱ्याच्या उत्तर टोकाला कडोबा किनारा असे म्हणतात. मोचेमाड नदीच्या मुखाशी सागराचे अनोखे रूप अनुभवण्याची आपल्याला इथं संधी मिळते.

Redi beach

45) रेडी – रेडीचा यशवंतगड हा मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दुर्ग. इथलं गणेश मंदिरही भाविकांच्या गर्दीने गजबजलेलं असतं. आणि गोव्याच्या गर्दीपासून सुटका करून निवांत भटकंती करण्यासाठी इथं अनेक विदेशी पर्यटक येतात.

Tarkarli beach

46) तारकर्ली – महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर मानाचे स्थान असलेला तारकर्ली किनारा.. रिसॉर्ट, वाटरस्पोर्ट आणि बरंच काही. अर्थातच मुख्य आकर्षण इथला स्वच्छ, मखमली वाळू असलेला समुद्रकिनारा.

Padavane Palye beach

47) पडवणे-पाल्ये – वाडा गावाकडून विजयदुर्गाच्या दिशेने जाताना डावीकडे एक फाटा खुणावतो. काही किलोमीटर वाट वाकडी करून जायलाच हवं असं हे ठिकाण. पडवणे-पाल्ये गावाला साथ देणारा सागरतीर.

Taramumbari beach

48) तारामुंबरी – देवगडचा शेजारी असलेला हा छोटासा समुद्रकिनारा. देवगडच्या पवनचक्क्यांचं दृश्य आपल्याला इथं टेकडीमागे दिसतं.

Nevare Kajirbhati beach

49) नेवरे-काजिरभाटी – गणपतीपुळे ते रत्नागिरी प्रवास आता आरे वारे मार्गे समुद्राच्या सोबतीने होतो. या मार्गावर नेवरे गावापाशी असलेला हा रम्य सागरकिनारा. क्षणभर विश्रांती म्हणून इथं थांबा किंवा मुद्दाम इथल्या सुरुच्या बनातून चालण्यासाठी या.

Velaneshwar beach
50) वेळणेश्वर - समुद्रकिनाऱ्याला लागूनच असलेलं शंकराचं रूप म्हणजे श्री वेळणेश्वर. अनेक कुटुंबांचे कुलदैवत असणारे हे मंदिर. समुद्र वेड्या पर्यटकांचेही लाडके ठिकाण.

तर मित्रांनो कोकण किनाऱ्यावरील सर्वोत्तम ५० किनाऱ्यांची ही गोष्ट! हे वर्णन आणि फोटो तुम्हाला कसे वाटले? तुमचे आवडते ३ किनारे कोणते आम्हाला नक्की सांगा. आणि कोकणातील भ्रमंतीसाठी दर्या फिरस्तीला भेट देत रहा.

8 comments

 1. Manasee

  Hi Chinmay ! Sundar photos ! And very useful captions. Me kokanat khup phirale nahi ahe. Unfortunately so. Mazhya maaherche gaav WADAD. Agadi chotasa kheda aahe. It doesn’t have a beach. Pan jaambhyaa dagadaacnchyaa bharpur paakhaadyaa aahet.

  So i have no comments to offer on my favourite beach in Konkan. Tasahi, nisargachi rupa comparitive nastaatach, Nahi ka?

  However, in our country, we do have the issue of cleanliness and crowds. Pan to vishay vegala.

  From all of your photos, the two beaches of Bhogave and Talashil looked the prettiest of them all !!

  Good luck for all of your future journeys.

 2. योगेश कुंभार

  धन्यवाद, आभारी आहे. खूप छान छायाचित्रे व माहिती.

  • योगेश घळसासी

   खुप सुंदर माहिती आणि छायाचित्रे
   काही अजून समुद्र किनारे उदा नागाव व आक्षी , केळवे , पण खुप सुंदर आहेत

 3. Vaishali paranjape gokhale

  सर आडिवरे ची महांकाली आणि मोगरा भराडे चे देव लक्ष्मी नारायण मंदिर दाखवा ना 🙏

  • मोगरा भराडे चे देऊळ अजून कव्हर झाले नाही पण लवकरच करू, आडिवरे महाकाली आठवडा दहा दिवसांत करतो पूर्ण

 4. Pramod Rawat

  आपल्या देशात पाहण्यासारखे काय आहे असे कोणी म्हणाले तर त्यासाठी सुंदर उत्तर

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: