
हरिहरेश्वर आणि कालभैरव या देवतांचा अनेक पौराणिक कथांमध्ये उल्लेख असल्याने ती अतिशय महत्वाची दैवते आहेत. श्रीवर्धनजवळ रायगड जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या हरिहरेश्वर क्षेत्राला दक्षिणकाशी म्हणून गौरवले जाते. काळभैरवाला भूत-पिशाच्च निवारण करणारी आणि अतृप्त आत्म्यांना शांत करणारी देवता मानले जाते. मंदिर परिसरात पांडव तीर्थावर उत्तरक्रिया विधी केले जातात. टेकडी आणि किनारा परिसरात विष्णुपद, गायत्रीतीर्थ, शुक्लतीर्थ, सूर्यतीर्थ, विष्णुतीर्थ, ब्रम्हगुहा अशी ठिकाणे आहेत. या ठिकाणी अगस्ती ऋषींनी यज्ञ केला होता असेही सांगितले जाते.

इथं प्रथम कालभैरव योगेश्वरीचे दर्शन घेऊन मग नंदी, गणपती, हरिहरेश्वर आणि मग पुन्हा कालभैरव-योगेश्वरी असे दर्शन घेण्याची प्रथा आहे. कालभैरवाच्या चार हातांमध्ये डमरू, तलवार, त्रिशूल आणि शीर दिसतात. गळ्यात केतूमाला म्हणजे राक्षस मुंडमाला आहे.

मंदिरात अतिशय सुंदर लाकडी कोरीवकाम आहे आणि त्यात दशावतार कोरलेले काही ठिकाणी दिसतात. लाकडी कोरीवकाम हे कोकणातील मंदिर स्थापत्याचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे आणि ही परंपरा जतन करणे संवर्धनाच्या दृष्टीने एक फार मोठं आव्हान असणार आहे.

इसवीसन १६७४ मध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी दर्शनाला आले होते असं इतिहासकार सांगतात. मंदिराच्या गणेशपट्टीच्या बाजूला दोन कोरीव लेख आहेत ज्यातून इथली ऐतिहासिक पार्श्वभूमी उलगडते.
ईश्वाब्धी शोडशे शाके शोभकृत वैशाख शुद्ध वत्सरे प्रभू:
माधवैके शुक्ले प्रारंभे देवतालयम्
श्रीवर्धन देशाधिकृत बाळाजी विश्वनाथाभिदं
सूत विश्वनाथानत जीर्णोद्धार कृतः
थोरले बाजीराव पेशवे यांनी मंदिराचा इसवीसन १७२३ साली जीर्णोद्धार केला असे या लेखातून दिसते. सरखेल कान्होजी आंगरेंनी एक हजार रुपये देणगी दिली. मंदिराच्या पश्चिमेला टेकडीवर जाणाऱ्या पायऱ्या चंद्रराव मोरेंनी बांधल्या तर माधवराव पेशवेंची पत्नी रमाबाईंनी १६६७ साली इथं चौघडा वादनासाठी बांधकाम केले आणि ४ एप्रिल १७७२ रोजी माधवरावांच्या प्रकृती साठी त्या स्वतः इथं आल्या अशा नोंदी आहेत.

पायऱ्या चढून डोंगरावर गेलं की हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्याचे विलोभनीय दृश्य नजरेस पडते. पलीकडे दक्षिणेला घळीतून पायऱ्या उतरून खडकाळ किनाऱ्याला लागले की एक कोसाची प्रदक्षिणा सुरु होते. इथं समुद्र खवळलेला असताना काळजीपूर्वक चालायला हवे. भरती ओहोटीचे गणित लक्षात घेऊन स्थानिकांना नीट विचारून ओहोटीच्या वेळेला ही परिक्रमा जरूर करता येते.

समुद्राच्या लाटा आणि वारा यांनी अनेक शतके तासून तासून झिजवलेल्या खडकांचे भूगर्भीय सौंदर्य पाहत इथं रेंगाळण्याची इच्छा होते. पाण्याजवळ शेवाळे साचते आणि तिथं चालताना काळजी घ्यायला हवी. कधीकधी इथं डॉल्फिन दर्शनही होते. भूगोलाच्या धड्यांमध्ये शिकलेल्या गोष्टी इथं आपल्याला प्रत्यक्ष पाहता येतात.

इथं चालत असताना अनेक ठिकाणी पूजेची स्थाने आणि मूर्ती दृष्टीस पडतात. हरिहरेश्वर मंदिराला इसवीसन १७९३ साली आग लागली आणि १७९५ मध्ये मंदिर पुन्हा बांधले गेले. पेशवेकाळात मंदिराला खर्चासाठी ११५२ रुपये दिले जात असत, १९८१ मध्ये ही रक्कम वाढवून ३००० केली गेली आणि चौघडा वादनासाठी रायगड जिल्हा परिषदेने पाच हजार रुपये अनुदान निश्चित केले.

या परिसरात भटकंती करत असताना कोकणातील पक्षी जीवन, खाद्य संस्कृती, निसर्ग वैभव या सगळ्याचा मनसोक्त अनुभव घेता येतो. एका सकाळी गावात भटकंती करत असताना मला किंगफिशर म्हणजेच खंड्या महाशयांचे दर्शन घडले होते.

प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा मंदिराकडे यायचं आणि साधं पण चविष्ट जेवण किंवा न्याहारी घ्यायची व पुढच्या प्रवासासाठी सज्ज व्हायचं. हरिहरेश्वराची पंचामृत पूजा आणि लघुरुद्र अशी साधना केली जाते. कालभैरव-योगेश्वरीची चंदन पूजा केली जाते. मंगळवारी आणि रविवारी भाजणीचे वडे आणि दही असा नैवैद्य केला जातो. कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा तसेच कालाष्टमी या दिवशी यात्रा असते. महाशिवरात्रीला भक्तांची गर्दी होते.

अनेक कुटुंबांचे हरिहरेश्वर कुलदैवत असल्याने त्यांच्यासाठी हे ठिकाण विशेष महत्वाचे ठरते. कोणकोणत्या परिवारांचे हरिहरेश्वर कुलदैवत आहे ते पाहू.
गोत्र | आडनाव |
गार्ग्य | गांगल, कर्वे, कुडाळकर, केतकर, घाणेकर, जोशी, टोळे, थोरात, देशमुख, धामणकर, पंडित, पिटकर, पोतदार, पेशवा, बेडेकर, भट, महाजन, मरुकर, माटे, मायदेव, राजमाचीवर, वझे |
भारद्वाज | गांगल, आचवल, गांधारे, घांगुर्डे, घैसास, चिळकर, जोशी, टेणे, नेकणे |
वत्स | गांगल, गांगलेकर, गारगेकर, गोवित्रीकर, गोरे, घाटे, भैरव |
शांडिल्य | गोरे ताम्हणकर पळणीटकर |
अत्रि | दाबक |
काश्यप | करमरकर भानू गोगटे वर्तक |
धन्यवाद. तिथं जाऊनही पहाता, अनुभवता न आलेल्या बाबी ध्यानात आल्या.
abhishek karaychay kahi mahiti milu shakel ka?