अलिबाग शहराला ज्याप्रमाणे ऐतिहासिक महत्त्व आहे, त्याचप्रमाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान संशोधनाच्या बाबतीत सुद्धा अलिबागकडे एक खास वारसा आहे. तो म्हणजे इथली भू-चुंबकीय वेधशाळा. पृथ्वीच्या पोटात होणाऱ्या चुंबकीय हालचालींचा अभ्यास करण्यासाठी अशा केंद्रांची आवश्यकता असते. सुरुवातीला कुलाबा येथील वेधशाळेत हा अभ्यास व मोजमाप केले जात असे. १८२६ साली मुंबईच्या कुलाबा वेधशाळेची स्थापना झाली आणि १८४१ पासून इथं भू चुंबकीय मोजमापांची नोंद केली गेली. पुढे मुंबईत वीजेच्या जोडण्या, वीजेवरील ट्राम आणि इतर गोष्टी सुरु झाल्या तेव्हा या वेधशाळेच्या मोजणीत अडथळे येऊ लागले आणि मग अशा त्रासापासून दूर असलेल्या अलिबागच्या किनाऱ्यावर १९०४ साली नव्या वेधशाळेची या कामासाठी स्थापना झाली.
शंभर वर्षांहून अधिक काळातील नोंदी या वेधशाळेने घेतल्या आहेत. इतकेच नव्हे तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही फक्त ही वेधशाळा कार्यरत होती त्यामुळे इथल्या नोंदींचे महत्त्व विशेष मानले जाते.
ही वेधशाळा भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आहे आणि विषुववृत्तीय भू चुंबकीय इलेक्ट्रोजेट पासून दूर आहे. या वेधशाळेच्या दोन इमारती असून कोणत्याही प्रकारचे चुंबकीय गुणधर्म नसलेल्या पोरबंदर स्टोन नामक दगडातून या इमारतींची निर्मिती करण्यात आली आहे. ही वेधशाळा आता इंटरमॅग्नेट या आंतरराष्ट्रीय प्रणालीचा एक भाग असून इथं घेतली गेलेली मोजमापे या प्रणालीशी सामायिक करण्यात येतात. भारतीय नौदल आणि वायुदलाच्यासाठीही इथल्या चुंबकीय मापनांचा उपयोग केला जातो. डीआय फ्लक्स मॅग्नेटोमीटर, ओव्हरहाउसर इफेक्ट प्रोटॉन स्केलर मॅग्नेटोमीटर, जेम सिस्टीम, टाईप जीएसएम९०, प्रोटॉन प्रिसिशन मॅग्नेटोमीटर अशा विविध मोजणी यंत्रांनी ही वेधशाळा सुसज्ज आहे.
ही वेधशाळा आतून बघतां येते का?
हो. पूर्व परवानगीने पाहता येते. तिथं एक छोटं संग्रहालय सुद्धा आहे. मी तिथं जाऊन विचारले आणि पाहिले. त्यावेळी आतून फोटोग्राफीची परवानगी मिळाली नाही.