Darya Firasti

कोकणातील जलदुर्ग

छत्रपती शिवाजी महाराजांचे कोकणावर खास प्रेम होते. समुद्र किनाऱ्यावरील या निसर्ग संपन्न प्रदेशाचे व्यापारी आणि सामरिक महत्त्व शिवरायांनी ओळखले होते. त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीलाच नौदलाची निर्मिती आणि नाविक शक्तीद्वारे कोकण किनाऱ्यावरील परकीय सत्तांवर अंकुश ठेवण्याचे धोरण स्वीकारलेले दिसते. कोकणात शिवकालीन आणि इतर जलदुर्गांची मालिकाच पाहायला मिळते. शिवजयंतीच्या निमित्ताने दर्या फिरस्तीत कोकणातील सर्व जलदुर्गांची चित्र भ्रमंती करण्याचा आज प्रयत्न करत आहोत. 

Khanderi Fort


१) खांदेरीचा पराक्रम 

मुंबईपासून दक्षिणेकडे काही मैल समुद्रात एका बेटावर बांधलेला हा जलदुर्ग आहे. पावसाळ्याने रौद्र रूप धारण केल्यानंतर अगदी आजही या भागात बोटीने प्रवास करणे कठीण मानले जाते. समुद्रातील खडकांचा धोका टाळून जहाजांना प्रवास करावा लागतो. अशा खडतर परिस्थितीत, ऑगस्ट १६७९ मध्ये मायनाक भंडारी आणि दौलतखानाच्या सैनिकांनी मुंबईवर वचक ठेवण्यासाठी किल्ल्याचे बांधकाम केले. त्यांना तसे करण्यापासून रोखण्यासाठी इंग्लिशांनी तुल्यबळ आरमारी फौज पाठवली पण मराठ्यांनी त्यांचा पराभव केला आणि खांदेरी किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले. आज थळ बंदर किंवा किहीम येथून बोटीने जायला लागते. किल्ल्यावर ब्रिटिशकालीन दीपगृह आहे, वेताळ मंदिर आहे आणि अनेक तोफाही आहेत

Underi

२) उंदेरी किंवा जयदुर्ग

 थळ आणि खांदेरीच्या मध्ये एका बेटावर जंजिऱ्याच्या सिद्दीने बांधलेला हा जलदुर्ग आहे. दगड रचून केलेली किल्ल्याची भिंत प्रेक्षणीय आहे. सिद्दी खरंतर इंग्रजांच्या बोलवण्यावरून खांदेरीला मराठ्यांना पराभूत करण्यासाठी आला होता. पण ते न जमल्याने त्याने थळ किनाऱ्याजवळील बेटावर उंदेरी किल्ला बांधून स्वतःचीच जागा भक्कम केली. 

Elephanta British Fort

३) घारापुरीचा किल्ला

घारापुरी लेण्याच्या पश्चिमेकडील टेकडीवर एक ब्रिटिशकालीन किल्ला असून त्यावर दोन प्रचंड तोफा पाहता येतात.

Khubaladha remains

४) थळचा खूबलढा 

हा किल्ला आता दिसत नाही. पण थळ बंदरावर जाऊन थोडा शोध घेतला की या किल्ल्याची जोती किंवा अवशेष जरूर पाहता येतात. याला आपण दुर्गावशेष म्हणू शकतो. बंदरावर चाललेली वर्दळ पाहण्यासाठी इथं जरूर गेलं पाहिजे. 

Fort Kulaba

५) अलिबागचा कुलाबा किल्ला 

मराठी आरमाराचे सरखेल कान्होजी आंग्रेंची राजधानी म्हणजे कुलाबा किल्ला. अलिबागच्या किनाऱ्यावरून ओहोटीच्या वेळेला किल्ल्यावर चालत जाता येते. किल्ल्याचे बांधकाम छत्रपती शिवरायांनी १६८० मध्ये  सुरु केले आणि छत्रपती संभाजी महाराजांनी हा दुर्ग पूर्ण केला. किल्ल्याला सर्जेकोट नावाचा उपदुर्ग आहे तो सुद्धा जरूर पाहण्यासारखा आहे. इथल्या किनाऱ्यावरच सरखेल कान्होजी आंग्रेंनी इंग्रज-पोर्तुगीजांच्या संयुक्त आघाडीचा पराभव केला होता. रघुजी आंग्रे दुसरे यांनी इथं बांधलेलं सिद्धिविनायक मंदिर पाहण्यासारखं आहे. 

Fort Revadanda

६) रेवदंड्याचा पोर्तुगीज किल्ला

 रेवदंड्याच्या समुद्रकिनारी ओहोटीच्या वेळेला गेलं तर पाहायला मिळते पोर्तुगीज बांधणीची सलग दगडी तटबंदी. किल्ल्याचे प्रवेशद्वार गावातील मुख्य रस्त्याजवळच आहे आणि त्यावरील पोर्तुगीज प्रतिमा पाहण्याजोग्या आहेत. सातखणी या नावाने ओळखला जाणारा मनोरा आणि भग्न चर्चेस आवर्जून पाहायला हवीत. 

Rajkot remains

७) विस्मृतीत गेलेला राजकोट

 रेवदंडा गावाजवळच छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात बांधल्या गेलेल्या राजकोट किल्ल्याचे अवशेष सापडतात. एक जुनी मशीद आणि हमाम तसेच भिंतीचे अवशेष आपण शोध घेऊन आजही पाहू शकतो. 

८) कोर्लईचा अनोखा किल्ला

 रेवदंडा किनारा जिथं संपतो तिथं कुंडलिका नदी समुद्राला जाऊन मिळते. तिथे समोरच पश्चिमेला एका भूशिरावर टेकडी आहे ज्यावर गुजरात सुलतानाला पराभूत करून पोर्तुगीजांनी एक बळकट किल्ला बांधला. तिथेही एक दीपगृह आहे. किल्ल्याच्या माथ्यावरून सूर्यास्त पाहणे हा एक खास अनुभव असतो. कोर्लई गावाची अजून एक खासियत म्हणजे दोन-अडीचशे घरात बोलली जाणारी तिथली अनोखी भाषा. नो-लिंग हे या मिश्र भाषेचे नाव. पोर्तुगीज, इंग्लिश आणि मराठीच्या मिश्रणातून ही भाषा तयार झाली असून लिपी म्हणून देवनागरीच वापरली जाते. 

Padmadurga

९) पद्मदुर्ग 

छत्रपती शिवाजी महाराजांना सिद्दीवर वचक बसवण्यासाठी कायम शह देऊ शकेल असा किल्ला बांधायचा होता. मुरुडजवळ असलेल्या कांसा बेटावर त्यांनी हा दुर्ग बांधून घेतला. तिथं पाहण्यासारखी एक खास गोष्ट म्हणजे लाटांच्या माऱ्याने जरी किल्ल्याचे चिरे झिजले असले तरी दोन चिऱ्यांच्या मधे असलेला चुना तसाच आहे. 

Janjira

१०) सिद्दींचा जंजिरा 

अबिसीनिया किंवा आजच्या इथियोपियातून आलेल्या कडव्या सिद्दींनी दक्खनच्या राजकारणात महत्व प्रस्थापित केलं होतं. पुढे ते पश्चिम किनाऱ्यावरील एक महत्त्वाची नाविक सत्ता बनले आणि सिद्दी सात मारला जाईपर्यंत त्यांचा दरारा कायम होता. छत्रपती शिवरायांना अनेकदा प्रयत्न करूनही हा किल्ला जिंकता आला नाही. अनेक अभेद्य बुरुज, प्रचंड तोफा आणि स्थापत्य अवशेष पाहण्यासाठी या किल्ल्याला भेट दिलीच पाहिजे 

Bankot Fort


११) बाणकोट किंवा हिंमतगड

सावित्री नदीच्या मुखाशी एका उंच टेकडीवर हा छोटासा किल्ला आहे. इथं जवळच आर्थर मॅलेट नामक ब्रिटिश अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलीचं स्मरणस्थळ आहे.  

Gova Fort

१२) हर्णे चा गोवा दुर्ग 

हर्णेच्या बंदरावर जाऊन ताजे मासे विकत घ्यायचे आणि मग ते खास कोकणी पद्धतीने बनवून ताव मारायचा हा पर्यटकांचा आवडता कार्यक्रम. पण तिथं पुढं जाऊन गोवा दुर्गाची तटबंदी जरूर पाहायला हवी. 

Kanakdurga

१३) कनकदुर्ग 

हर्णे बंदरावर उभे राहून दिसते ते पाण्यात गेलेले जमिनीचे टोक. हाच कनकदुर्ग. तिथं एक दीपगृह आहे आणि किल्ल्याच्या बुरुजाचे अवशेष 

Fattedurga

१४) फत्तेदुर्ग 

कनकदुर्ग आणि गोवा दुर्गाप्रमाणेच हा सुवर्णदुर्गाचा उपदुर्ग होता पण आज कोळी वस्तीने ही जागा व्यापून टाकलेली असून किल्ल्याचे अवशेषही दिसत नाहीत. 

Suvarnadurga

१५) सुवर्णदुर्ग 

सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या कारकीर्दीचे उदयस्थान म्हणून या किल्ल्याचे विशेष महत्त्व आहे. तीस फूट उंच ताशीव तटबंदी आणि अनेक भक्कम बुरुज असलेला हा किल्ला पाहायला हर्णे बंदरातून बोटीने जावे लागते. 

Gopalgad

१६)  अंजनवेलचा गोपाळगड 

दाभोळ आणि गुहागरच्या मधे वसिष्ठी नदीचे मुख आहे. तिथंच अंजनवेलच्या डोंगरावर गोपाळगड किल्ला आहे. एनरॉन प्रकल्प, टाळकेश्वर मंदिर आणि सागराचे अथांग रूप पाहायला इथं गेलंच पाहिजे. 

१७) तवसाळ विजयगड अवशेष 

गुहागरकडून तवसाळला जाणाऱ्या रस्त्यावर विजयगड किल्ल्याचा एक बुरुज तेवढा शिल्लक असलेला दिसतो.

Jaigad

 
१८) जयगड 

तवसाळ ते जयगड प्रवास आपण फेरी बोटीने करू शकतो आणि शास्त्री नदी पार करून जयगड गावात येतो. संपूर्ण तटबंदी दिमाखात उभी असलेला हा दुर्ग आवर्जून पाहायला हवा. किल्ल्याच्या बुरुजांची एक मालिका समुद्राला लागूनही आहे. माडीचे बुरुज, खंदक, विहीर, गणेश मंदिर अशी विविध ठिकाणे आपण इथं पाहू शकतो. किल्ल्याचे बांधकाम वारंवार ढासळत होते म्हणून जयबा नावाच्या माणसाचा इथं बळी दिला गेला आणि म्हणून किल्ल्याला जयगड नाव पडले अशी आख्यायिका सांगितली जाते. 

Ratnadurg

१९) रत्नदुर्ग 

रत्नागिरी शहराच्या किनाऱ्यावर हा तीन टोकं असलेला किल्ला आहे. मुख्य बालेकिल्ला आहे तिथं भगवती देवीचे मंदिर आहे. आणि समुद्रात खोल गुहाही आहे. दुसऱ्या टोकाला किल्ल्याचे प्रवेशद्वार आणि तिसऱ्या टोकाला शहराचं आणि सागराचं उत्तम दृश्य पाहता येईल असं दीपगृह आहे. 

Purnagad

२०) पूर्णगड 

रत्नागिरी शहराच्या दक्षिणेला पावसजवळ मुचकुंदी नदीच्या मुखाशी पूर्णगडचा छोटेखानी किल्ला आहे. गावखडीच्या किनाऱ्याचे सौंदर्य इथून पाहणे हा एक खास अनुभव असतो. 

२१) आंबोळगड 

समुद्राला जाऊन भिडलेला डोंगर आणि निळेशार पाणी. पाहता पाहता ध्यानस्थ व्हावे अशीच ही जागा. तिथंच आंबोळगड किल्ल्याचे अवशेष पाहता येतात. 

Yashwantgad Nate


२२) यशवंतगड – नाटे 

आंबोळगड ते नाटे रस्त्यावर नाटे गावाच्या जवळच यशवंतगड किल्ला पाहता येतो. अर्जुना नदीवर पहारा करण्यासाठी हा किल्ला अतिशय महत्त्वाचा मानला गेला. 

Vijaydurga

२३) विजयदुर्ग 

मराठ्यांच्या स्वराज्याचे चिलखत अथांग सागरावर निधड्या छातीने पहारा देणारे जलदुर्ग आणि या जलदुर्गांपैकी एक प्रचंड, अभेद्य आणि विशाल दुर्ग म्हणजे विजयदुर्गतीन बाजूंनी समुद्राने घेरलेला म्हणून घेरिया असे नाव असलेला हा किल्ला छत्रपती शिवरायांनी १६५३ मध्ये विजय संवत्सरात जिंकला आणि त्याचं बारसं झालं – विजयदुर्गआणि मग तिहेरी तटबंदी आणि २७ भक्कम बुरुज बांधून शिवरायांनी किल्ला बळवंत केला. मूळ किल्ला ५ एकरांचा होता … शिवरायांनी त्याचा विस्तार १७ एकर क्षेत्रफळात केला

Devgad Fort


२४) देवगड 

उत्तम प्रतीच्या हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध देवगड. सुंदर समुद्रकिनारा, पवनचक्क्या आणि दीपगृह आणि देवगड किल्ल्याचा काळ्या चिऱ्यांची भक्कम तटबंदी असलेला बुरुज. देवगड किल्ल्यातून दिसणारं सागर दर्शन एकदम खास बरं का! 

Sarjekot Malvan

२५) सर्जेकोट –

मालवण सिंधुदुर्ग किल्ल्याचा उपदुर्ग असलेल्या सर्जेकोटाला भेट द्यायला कोळंबहून पुढे गड नदीच्या मुखाशी असलेल्या सर्जेकोट बंदरावर यायचं. किल्ल्यात आता लोक राहतात पण दरवाजा आणि तटबंदी पाहता येते. 

Padmagad

२६) पद्मगड –

मालवण मालवण दांडीवरून पद्मगड स्पष्ट दिसतो. हा सिंधुदुर्गाचा महत्त्वाचा उपदुर्ग. ओहोटीच्या वेळेला स्थानिकांना विचारून इथं चालत जायचं. किल्ल्याचं बांधकाम पाहायचं आणि शंकराचं दर्शन घेऊन पुन्हा मोरयाचा धोंडा गाठायचा. 

Sindhudurga

२७) सिंधुदुर्ग

 समुद्र जसा अथांग असतो. तसाच हा किल्ला प्रचंड आणि कौतुक करायचं असेल तर शब्दांच्या आवाक्यात न मावणारा. शिवरायांचा स्थपती हिरोजी इंदुलकराने हा किल्ला बांधला. विशेष म्हणजे महाराज आग्ऱ्याला अडकलेले असताना हे बांधकाम सुरूच राहिले आणि वेळेत पूर्णही झाले. छत्रपती शिवरायांचं मंदिर इथं छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलं. शिवराजेश्वर मंदिरात जाऊन नतमस्तक व्हायचं. कृतार्थ व्हायचं. 

Fort Nivti remains

२८) निवतीचा किल्ला 

पर्यटन नकाशावर अजून तितकेसे महत्त्व न मिळालेला हा किल्ला थोडासा दुर्लक्षित असला तरीही निवती-भोगवेचे सुंदर किनारे पाहायला उत्तम स्थान आहे. किल्ल्याच्या माथ्याजवळ गाडी जाते. तिथून पायवाटेने १५ पायऱ्या चढून खंदक पार करायचा आणि किल्ला पाहायचा. 

Yashwantgad Redi

२९) यशवंतगड – रेडी 

अनेक दरवाजे, बुरुज, बहुमजली बांधकामे आणि जवळच असलेला शिरोड्याचा सागरतीर. हे सगळं अनुभवायचं असेल तर रेडीचा यशवंतगड पाहायलाच हवा. महाराष्ट्र राज्य पुरातत्व आणि संग्रहालये खात्याने येथे उत्तम संवर्धन केले आहे आणि अजून चांगले काम होते आहे. 

Terekhol Fort

३०) तेरेखोल 

महाराष्ट्र आणि गोवा यांची सीमा रेखा असलेली तेरेखोल नदी जिथं समुद्राला जाऊन मिळते तिथं उत्तरेला डोंगरावर हा किल्ला आहे. पलीकडे फेरीबोटने केरी किनाऱ्यावर जाता येते. किल्ल्यात आता हेरिटेज हॉटेल असून नोंदणी करून किल्ला नीट पाहता येतो. राहायला ही सोय महागडी असली तरीही परवडत असेल तर जरूर अनुभव घ्यावा. किमान बुरुजावर बांधलेल्या रेस्तरॉं मध्ये मस्त जेवण करायला तरी थांबले पाहिजे. 

Sarjekot Kulaba

३१) सर्जेकोट – कुलाबा
अलिबागच्या कुलाबा किल्ल्याला लागून त्याचा उपदुर्ग आहे तो म्हणजे सर्जेकोट. या सर्जेकोटाला कुलाबा किल्ल्याशी जोडणारा दगडी पूल पूर्वी अस्तित्वात होता त्याचे अवशेष आजही दिसतात.

Hirakot

३२) हिराकोट – अलिबाग
अलिबाग शहरातच हिराकोट तलावाजवळ याच नावाचा किल्ला आहे. आंग्रे काळात हा अतिशय महत्त्वाचा दुर्ग होता आणि कुलाबा किल्ल्याला बळकटी आणणे हे याचे काम होते. आज तिथं शासकीय तुरुंग असून किल्ला बाहेरूनच पाहता येतो.

या किल्ल्याबरोबरच मुंबई शहर आणि मुंबईच्या उत्तरेस असलेल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही अनेक किल्ले आहेत. त्यांची माहिती अजून एका दर्या फिरस्ती ब्लॉगमध्ये

3 comments

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: