Darya Firasti

भ्रमंती तोंडवळी-तळाशीलची

पावसाळ्याच्या दिवसातील कोकणातील एक संध्याकाळ.. आकाश भरून आलं होतं खरं पण सरी कोसळत नव्हत्या. आकाशात काळे ढग तर दिसत नव्हते पण एक उदास राखाडी रंगाची गोधडीच जणू संपूर्ण आकाशाने पांघरली होती. मी आचरा देवगड रस्त्यावरन तोंडवळीच्या दिशेने निघालो होतो.

मी आचरा देवगड रस्त्यावरून तोंडवळीच्या दिशेने निघालो होतो. तोंडवळी आणि तळाशील ही दोन जोड गावे कोकणातील सर्वोत्कृष्ट समुद्रकिनाऱ्यांपैकी आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. सूर्यास्ताला तासभर उरला असेल.. सूर्यनारायण ढगांच्या मागे क्षितिजापासून हातभर वर दिसत होता. तिथं जवळच एका डबक्यात डुंबणाऱ्या म्हशींचे गमतीशीर दृश्य मला पाहायला मिळालं.

पावसाळा असल्याने नेहमी रखरखीत असलेल्या कातळ सड्यावर हिरवळ पसरली होती. अनेक ठिकाणी खोलगट जागांमध्ये छोटीशी तळी तयार झाली होती. पाणी साठवण्यासाठी अशी छोटीशी तळी खोदण्याची पद्धत होती असे मला कांदळवन सफारी करणाऱ्या वाडेकर काकांनी सांगितले होते.

सड्यावरून उतारावरून मी समुद्राच्या जवळ जाणाऱ्या रस्त्याने तोंडवळीच्या दिशेने पुढे निघालो. हा रस्ता सुरूच्या बनातून गड नदीची खाडी आणि समुद्र यांच्या मधल्या जागेतून पुढे जातो. ही जागा वन विभागाच्या अखत्यारित येते. गड नदीच्या मधोमध इथं पाणखोल आणि खोत जुवा नावाची बेटे आहेत ज्यांच्यावर लोकवस्ती आहे आणि इथे बरेच होमस्टे सुद्धा आहेत अजून तरी मला तिथे जाण्याची संधी मिळालेली नाही. पण पावसाळ्यात इथले पर्यटन बंद असल्याने मी जास्तीत जास्त वेळ तोंडवली आणि तळाशील मध्येच व्यतीत करायचा असं नक्की ठरवून आलो होतो फार तर आजूबाजूच्या वायंगणी आचरा या गावांमध्ये हिंडायचे असे ठरवले होते.

तोंडवळीचे एक वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेले सुरूचे घनदाट वृक्षवन. प्राध्यापक डॉ. श्रीकांत कार्लेकर यांच्या मते ३० हेक्टर क्षेत्रात हे वन पसरले आहे. किनाऱ्यालगत असलेल्या गावांचे वाळूपासून संरक्षण करणे आणि किनाऱ्याची धूप थांबवणे हे या वनांचे दुहेरी काम. डॉ कार्लेकर सांगतात त्याप्रमाणे या वनराईने किनाऱ्यावर आलेल्या पर्यटकांनाही आश्रय मिळतो, सावली मिळते. असे वनीकरण मी मिठमुंबरी आणि गावखडीला पाहिले आहे. आचरा खाडीच्या मुखापासून जर तोंडवळी तळाशील च्या टोकापर्यंत चालत गेलं तर जवळजवळ १२ किलोमीटरची भ्रमंती होते.

तळाशीलच्या वाळूच्या दांड्याचे टोक पाहण्याची सगळ्यात छान जागा म्हणजे सर्जेकोट बंदर. इथून आपल्याला गड नदीचा सिंधुसागराशी संगम आणि तळाशीलची शुभ्र पुळण पाहता येते.

मी गेलो होतो तेव्हा पावसाळा संपला नव्हता, गणपतीचे दिवस नुकतेच झाले होते त्यामुळे परिसरातील सगळी हॉटेल्स सुरु झाली नव्हती. आणि नित्यानंद प्राईडला राहण्याचा विचार होता पण त्यांच्या रिसॉर्टमध्ये मेंटेनन्स सुरु असल्याने त्यांनी मला नाना पाटील यांच्या क्षणभर विश्रांतीत राहायला सुचवले. समुद्राला लागून वाडीत असलेलं घर, स्वच्छ आणि प्रशस्त खोली आणि उत्तम चविष्ट घरगुती स्वयंपाक यांची सोय असल्याने मला काहीच अडचण आली नाही. माझी वीजेवर चालणारी गाडीही तिथे अगदी व्यवस्थित चार्ज झाली. मला सुट्टी मिळालेली नसल्याने वर्क फ्रॉम तोंडवळी-तळाशील-आचरा असा माझा प्लॅन होता. पण सकाळी लवकर आणि संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर चालत जाण्याचा आनंद मी रोज घेतला असेल. मासेमारीसाठी आपली बोट तयार करणारी मंडळी मला इथं किनाऱ्यावर भेटली.. त्यांच्याशीही गप्पा झाल्या.

तोंडवली गावामध्ये एक विलक्षण वेगळे मंदिर आहे त्याचं नाव आहे वाघेश्वर देवस्थान इथल्या लोकांची अशी श्रद्धा आहे की बिबट्या वाघ इथं या देवळात येतो किंवा इथं जवळच असलेल्या एका गुहेत येऊन बसतो. या मंदिराबद्दल एक स्वतंत्र ब्लॉग आहे जो तुम्हाला इथं वाचता येईल. भगवान शंकराच्या या देवळात वाघोबाला सुद्धा देवतेचा मान आहे.

नकाशात बघून असं वाटतं खरं की तळाशील संगम अगदी जवळच आहे परंतु प्रत्यक्ष तिथे पोहोचायला, जिथे गाडी रस्ता संपतो तिथून जवळजवळ दीड किलोमीटर चालत जावं लागतं अर्थात उजवीकडे लाटांची आवर्तने पाहत चालत असताना आणि समुद्राची गाज ऐकताना हा वेळ अगदी मजेत जातो. ावसाळ्याचे दिवस असल्यामुळे संध्याकाळी अगदी निखळ स्वच्छ सूर्यास्त पाहता येत नाही क्षितिजावर ढगांची दाटी असते त्याच्यामुळे त्या ढगांच्या पलीकडे लपलेल्या लाल नारंगी रंगांची उधळण हाच काय तो सूर्यास्ताचा आभास आपण त्या क्षणी पाहू शकतो.

मला नकाशात दिसलेल्या सॅटेलाईट चित्रावरून असं वाटलं होतं की इथं वाळूच्या दांड्यावर फारशी वृक्षराजी नाही परंतु प्रत्यक्षात इथं अगदी शेवटपर्यंत हिरवळ असल्याचे पाहून सुखद आश्चर्य वाटले. जाऊन येऊन अर्ध्या तासाची छान अडीच किलोमीटर लांबीची भ्रमंती झाली. गड नदीच्या संगमाच्या मुखाच्या थोड्याशा उत्तरेला एक खडकाळ भाग आहे त्याला कवडा रॉक्स असे नाव स्थानिकांनी दिले आहे. काहीजण या जागेला शिंपला पॉईंट असेही म्हणतात.

सूर्यास्त होता होता का होईना पण त्या ढगांच्या मागे लपंडाव खेळणाऱ्या सूर्यनारायणाने काही क्षण का होईना निरोपाचे दर्शन दिले खरे. आकाशात संध्यारंग पसरू लागले होते तीच रंगसंगती समोर ओहोटीच्या लाटांवरही उमटत होती. विस्तीर्ण आकाश आणि प्रचंड मोठा समुद्रकिनारा यांच्यासमोर तिथं वावरणारी माणसं शुल्क ठिपक्यासारखी वाटत होती

अशा ठिकाणी एकटं चालत असताना मनात कुठली ना कुठली कविता डोकावते त्या दिवशी मला बा भ बोरकरांची जलद भरूनि आले ही कविता आठवली…

गडद निळे गडद निळे जलद भरूनि आले
शीतलतनु चपलचरण अनिलगण निघाले
दिन लंघुनि जाय गिरी, पद उमटे क्षितिजावरि
पद्मरागवृष्टी होय माड भव्य न्हाले.. अशी कवितेची सुरुवात आहे..
आणि शेवटचे कडवे तर त्या क्षणाला अगदी समर्पक म्हणता येईल असे होते..
धूसर हो क्षितिज त्वरित
ढोर पथीं अचलचकित
तृण विसरूनी जवळिल ते
खिळवी गगनिं डोळे
टप टप टप पडती थेंब मनिवनिंचे विझति डोंब
वत्सल ये वास भूमि आशीर्वच बोले
गडद निळे गडद निळे जलद भरूनि आले

2 comments

Leave a reply to Anil kubal Cancel reply