Darya Firasti

मोर्वे किनाऱ्यावरील भ्रमंती

काही वर्षांपूर्वी मिठबाव-तांबळडेग परिसरात मुक्काम केला होता तेव्हा उत्तर टोकाला असलेल्या गजबादेवीच्या मंदिरापासून दक्षिणेला असलेल्या नारिंग्रे नदीच्या मुखापर्यंत सकाळी लवकर उठून आणि मावळतीच्या आधी मनसोक्त पायपीट केली होती. नारिंग्रे नदी जिथं समुद्राला मिळते तिथून पलीकडे एक वाळूची लांबलचक पुळण दिसते. तो आहे मोर्वेचा किनारा. पुन्हा देवगड तालुक्यात येऊ तेव्हा या किनाऱ्यावर नक्की जायचं असे ठरवले होते. २०२४ च्या पावसाळ्यात मी थोडं पुढे म्हणजे तोंडवळीला राहिलो होतो तेव्हा इथं धावती भेट झाली होती. पण मी किनाऱ्यावर पोहोचलो आणि मुसळधार पाऊस सुरु झाला. वेळ भरतीची असल्याने लाटांचे तांडव सुरूच होते. मी एकटाच होतो त्यामुळे पुढं अधिक न जाता ‘मी पुन्हा येईन’ असा निश्चय करून मी आचऱ्याला गेलो होतो. पण जानेवारी २०२५ च्या कोकण भ्रमंतीत इथं ओहोटीची निवांत वेळ पाहून यायचे असे ठरवले होतेच. तांबळडेगहून मी मोर्वे किनाऱ्याचा फोटो ड्रोनने घेतला होता त्यात किनाऱ्याच्या उत्तर टोकापर्यंत गेलेली कच्ची गाडीवाट आणि अरुंद पण लांबलचक शुभ्र वाळूची पुळण दिसली होती. देवगडचे डॉक्टर मित्र मनोज होगळे यांनीही इथं जरूर जायला हवं अशी शिफारस केली होतीच.

सागरी महामार्गावर असलेल्या हिंदळे गावातून मोर्वेकडे जायला सुमारे साडेतीन किलोमीटरचा रस्ता आहे. गावात एक सुंदर सरस्वती मंदिराची घर-सदृश इमारत दिसली.. पण मागल्या खेपेला चौकशी केली होती तेव्हा काही विशेष माहिती मिळाली नव्हती. आज मुद्दाम थांबून आत डोकावले तर मूर्ती दिसली नाही. जेट्टीपर्यंत चारचाकी जाते खरी पण शेवटचा एक किलोमीटर रस्ता इतका वाईट आहे की मी गाडी छोट्या पुलाच्या अलीकडे लावून चालत जायचे ठरवले होते.

डांबरी रस्ता काळभैरव मंदिराला वळसा घालून गाव पार करून खाडीच्या दिशेने जातो आणि मग पश्चिमेकडे वळतो. या भागात तो खाडीला समांतर परंतु सुमारे शंभर दीडशे फूट उंचावरून जेट्टीकडे जातो. डाव्या बाजूला आंब्याच्या बागा आहेत आणि उजवीकडे पाणी. यावेळी मला इथं नेपाळ आणि झारखंड हून आलेली अनेक मजूर मंडळी रस्त्यालगत माजलेले तण छाटताना आणि माकडे हाकलताना दिसली. स्त्री-पुरुष दोघेही होते.. बहुतेक आंब्याच्या मोसमाआधी इथं मजुरीसाठी अनेक कुटुंबे येतात. कोकणाची घटती लोकसंख्या आणि स्थानिक शेती-बागायती मजुरांचा अभाव ही सर्वत्र भेडसावणारी समस्या आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नाटे सारख्या छोट्या गावातील आमरायांमध्येही सुमारे साडेतीन हजार नेपाळी मजूर आहेत असे मी एका स्थानिक बागायतदाराकडून ऐकले होते. ही फार गुंतागुंतीची समस्या आहे.. स्थानिकांना हा सांस्कृतिक हल्ला वाटतो आणि रोजगारावर डल्ला वाटतो तर स्थानिक उद्योजक आम्हाला कामासाठी लोक मिळत नाहीत.. मिळाले तर वर्षभर कामाला सतत उपलब्ध नसतात अशी तक्रार करतात. मानवी स्थलांतर ही एक अपरिहार्य गोष्ट आहे आणि त्याबाबतीत संघर्षापेक्षा समन्वयाची भूमिका जास्त उपयोगाची आहे हे जरी खरे असले तरीही एखाद्या छोट्याशा गावात इतक्या मोठ्या संख्येत जर स्थलांतरित मंडळी अचानक दिसली तर लोकांना वाटणारी चिंताही साहजिक आहे ज्याचे निराकरणही करायला हवे. असा विचार करत करत मी जवळजवळ एक किलोमीटर चाललो असेन आणि जेटी ओलांडून पलीकडे नारिंग्रे नदीच्या टोकाला जाऊन पोहोचलो.

तांबळडेग किनाऱ्यावर जिथे उभा राहून मी मोर्वे किनारा पाहिला होता, ती जागा समोरच दिसत होती. नदीचे पात्र अगदी उथळ आणि शांत भासत होते. कोकणातील नद्या सह्याद्रीतून उगम पावतात आणि शंभर किलोमीटरच्या आतच सागरात विलीन होतात. वर्षभर अशा अगदी सौम्य वाटणाऱ्या नद्या पावसाळ्यात मात्र प्रचंड रौद्र रूप धारण करतात.

जेटी ओलांडून किनाऱ्यावर उतरलो तेव्हा ओहोटी असल्याने लाटा अगदी सौम्य होत्या, पाणी जवळजवळ स्थिर होते असेही म्हणता येईल. त्या स्वच्छ पात्रात खडकाळ तळ अगदी स्पष्ट दिसत होता. तांबळडेग किनाऱ्यावर असलेली वृक्षराजी आणि वाळूच्या दांड्याची शुभ्र रेषा क्षितिज रेषेला टेकलेली होती. आकाश अगदी स्पष्ट दिसत होते खरे पण इथं एखादा अवखळ ढग रेंगाळत बसला असता तर चित्र पूर्णत्वाला गेले असते. तांबळडेग हा वाळूच्या टेकड्यांच्या संचयाने बनलेला किनारा आहे असे प्राध्यापक श्रीकांत कार्लेकरांच्या पुस्तकात वाचल्याचे मला आठवते.

चंद्रकोरीसारखा भासणारा मोर्वे किनाऱ्याचा उत्तर भाग ओलांडून मी काहीसा पुढं आलो आणि आता तांबळडेगचा दांडा अगदी समोर दिसू लागला होता. एखाद्या निष्णात चित्रकाराने चितारावा तसा बहुरंगी आणि आठवणींच्या पटलावर कायमचा कोरला जाईल असा देखावा समोर दिसत होता. सोसाट्याचा वारा वाहायला लागला होता आणि मला कुसुमाग्रजांची कविता आठवली …
कुठल्या मुलखामधून येसी, कुठल्या मुलुखा जासी
गगनपथाचा स्वैर मुशाफिर वसुधेचा रहिवासी

किनारा बराच रुंद आहे आणि जेटीजवळ उंच असलेले टेकाड दक्षिणेकडे बुटके होत जाते. तरीही गाव आणि किनाऱ्याच्या मधोमध ही टेकडी किनाऱ्याला अगदी समांतर पसरलेली आहे. समुद्र आणि आकाश दोहोंची अथांग निळाई पाहता पाहता किनाऱ्याचा मधला टप्पा पार करून आपण दीड किलोमीटर तरी पुढं आलेले असतो. इथं पुन्हा एकदा किनारा थोडासा अरुंद होतो आणि एकीकडं समुद्र तर दुसरीकडं छोटासा ओढा या जागेत किनारा आणि खडकांची आरास दिसते.

कोकण किनारपट्टीवर मुख्यतः बॅसाल्ट खडक आढळतात, जे डेक्कन ट्रॅपच्या ज्वालामुखी उद्रेकांमुळे तयार झाले आहेत. याशिवाय, काही ठिकाणी खालील प्रकारचे खडकही आढळतात:

  1. बॅसाल्ट (Basalt) – कोकणातील बहुतांश भागात आढळणारा गडद, कठीण ज्वालामुखी खडक.
  2. लेटेराइट (Laterite) – कोकणातील लालसर मृदा आणि खडक, मुख्यतः सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी भागात आढळतात. हे मृदू असून पावसामुळे झिजतात.
  3. सेंद्रिय खडक (Sedimentary Rocks) – काही भागांत वाळूचा थर आणि चुनखडी (Limestone) आढळते, विशेषतः किनारपट्टी भागात.
  4. ग्रॅनाइट आणि न्याइस (Granite & Gneiss) – कोकण किनारपट्टीच्या काही भागांमध्ये आढळणारे कठीण खडक.
  5. कांकर आणि शेल (Conglomerate & Shale) – काही भागात गाळातून तयार झालेल्या या प्रकारच्या खडकांचे थर आढळतात.

किनारा अर्धा चालून पार केल्यानंतर मला हा अतिशय देखणा आणि प्रचंड मोठा खडक दिसला. इथला हा खडक हे ग्नाइसचे रूप आहे असे मला प्राध्यापक सुरेंद्र ठाकूरदेसाईंकडून समजले. ग्नाइस हा एक रूपांतरित (Metamorphic) खडक असून, तो प्रामुख्याने ग्रॅनाइटसारख्या आग्नेय खडकांपासून किंवा काही तलछटी खडकांपासून (Sedimentary Rocks) तयार होतो. हा खडक प्रचंड उष्णता आणि दाबाच्या प्रभावाखाली रूपांतर प्रक्रिया (Metamorphism) होऊन तयार होतो. जर उष्णता आणि दाब आणखी वाढले, तर खनिज रचना अधिक पुन्हा मांडली जाते आणि शिस्ट तयार होतो. सूर्य आता हातभर वर आलेला असल्याने त्याच्या किरणांनी खडकाचा वरचा भाग उजळून निघाला होता. नेहमी दिसणाऱ्या लालसर जांभा दगडापेक्षा याचा रुबाब काहीसा वेगळा होता.

जिथं गाडी लावली होती ते ठिकाण आता जवळजवळ पावणेदोन किलोमीटर दूर होते. पोटात कावळे ओरडायला लागलेले होतेच. पुन्हा जेट्टीजवळ आलो तेव्हा दमलो होतो आणि घामाघूमही झालो होतो.. तिथल्याच एका उंचवट्यावर थोडा वारा खात आराम करायला बसलो. मासेमारी करून परतलेली एक यांत्रिक नौका खाडीतून मिठबावच्या बंदरात जात होती. तिच्या इंजिनाची घरघर सोडली तर सर्वकाही स्तब्ध आणि शांत होते. दुपार होत आलेली असल्यानं मला हिंदळे गावातील कार्तिक स्वामींचे मंदिर गाठायची घाई होती. याआधी मी किमान तीनचार वेळेला तिथून गेलो होतो पण मंदिर आणि मूर्ती आतून पाहता आले नव्हते. आज जर सुदैवाने मंदिर उघडे मिळाले तर ती संधी सोडायची नव्हती.. त्यामुळे पटकन उरलेला रस्ता चालत गेलो आणि हमरस्त्याच्या दिशेने गाडी पळवायला लागलो.

Leave a comment