
कशेळीच्या डोंगरसड्यावरचा हा अजस्त्र हत्ती… आणि त्यात कोरलेली असंख्य चित्रे … विविध प्राणी … काही जलचरही .. काय सांगत असतील ही चित्रे? कोकणात दर्या फिरस्ती प्रकल्पासाठी हिंडत असताना कोकणातील कातळशिल्पांबद्दल मला समजलं आणि त्याबद्दल उत्सुकता होतीच. मध्यंतरी बीबीसी मराठी आणि अगदी न्यूयॉर्क टाइम्स ने ही या विषयाची दखल घेतली आहे. या जमिनीला कॅनव्हास करून खोदलेल्या कातळशिल्पांचा आकार इतका मोठा आहे की फोटो काढायला काही ठिकाणी ड्रोन असेल तरच त्यातील रेषा आणि चिन्हे एका दृष्टीक्षेपात नीट दिसतील. दर्या फिरस्ती म्हणजे कोकणच्या दृश्य संस्कृतीच्या प्रत्येक पैलूचे चित्रण मग इतक्या महत्वाच्या पुरातत्व ठेव्याचे चित्रण तर अजून मोठी जबाबदारी ठरते. ही चित्रे रत्नागिरी जिल्ह्यात उक्षी सारख्या उत्तरेतील ठिकाणापासून देवाचे गोठणे सारख्या दक्षिणेकडील ठिकाणाच्याही पुढे दीड दोनशे किलोमीटरच्या टप्प्यात विखुरलेली आहेत. आणि हे अंतर सरळ रेषेतल्या महामार्गाने मोजायचे नाही बरं का! काल आम्ही ५ साईटचे फील्डवर्क केले त्याला संपूर्ण दिवस लागला.

रत्नागिरी जिल्ह्यात सह्याद्रीची सुटावलेली टोके अगदी समुद्राला जाऊन भिडलेली आहेत. नकाशात बाजूला ५-६ किलोमीटर दिसणारे गाव गाठायला दोन टेकड्या चढून उतरून नागमोडी वळणाच्या रस्त्याने जावे लागते. काही ठिकाणी ही कातळशिल्पे दूर एकांत ठिकाणी सड्यावर आहेत … तर काही ठिकाणी खासगी जमिनीवर घरांच्या प्लॉट्स च्या मधोमध. २०१२ पासून सुधीर रिसबूड आणि धनंजय मराठे या दोघांनी अशी १२०० कातळशिल्पे शोधून काढली आहेत. आता महाराष्ट्राचे पुरातत्व निर्देशक डॉ तेजस गर्गे आणि नव्या दमाचा आर्किओलॉजिस्ट ऋत्विज आपटे या कातळशिल्पांवर सरकारी आणि संशोधनाच्या दृष्टीने बहुमोल काम करत आहेत. सुमारे १० हजार ते ४० हजार वर्षे जुनी असण्याची शक्यता असलेली ही कातळशिल्पे कोकणच्या इतिहासाची दालने उघडू शकतील. इथं विविध प्राणी आहेत, त्यांच्या आत कोरलेले प्राणी आणि चिन्हे आहेत. मनुष्य आकृती आहेत आणि abstract किंवा अमूर्त चित्रेही आहेत.

ही चित्रे खोदण्यामागचं प्रयोजन काय? या ओळखीच्या खुणा असतील की संदेश? एकच चित्र कुठं पुन्हा दुसरीकडे सापडते आहे असं नाही मग या चित्रभाषेला अर्थ असेल का? की हा तेव्हाच्या सांस्कृतिक/ धार्मिक कर्मकांडाचा भाग असेल? यात असलेले प्राणी पूर्वी कोकणात असतील का? या चित्रांमध्ये कुठेही शेती नाही … मग प्राणी आहेत म्हणजे शिकार करून जगणाऱ्या मानवाचा ठेवा आहे का हा? जितकं जास्त या चित्रांबद्दल समजेल, कुतूहल आणि गूढरम्यता तितकीच अजून वाढत जाणार आहे.

संशोधन सुरु आहे … जतन सुरु आहे .. नवीन कातळशिल्पे सापडत आहेत … त्याबद्दल उत्सुकता वाढत आहे आणि पर्यटन सुरु होते आहे. जिथं कातळशिल्पे खासगी जमिनीवर आहेत तिथं प्रश्न आर्थिकही आहेत … या चित्रांना पाहायला येणाऱ्या लोकांच्या पर्यटनातून कोकणच्या आर्थिक व्यवस्थेलाही लाभ आहे … कधीकधी छंद म्हणून सुरु झालेले वेडे प्रवास माणसाला आणि त्याच्याबरोबरच्या अनेकांना खूप दूर घेऊन जातात.

देवीहसोळ येथे आर्यादुर्गा देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. त्या देवळासमोरच एक अमूर्त पद्धतीचे कातळशिल्प आहे. हे बरेच आतवर खोदलेले कोरीवकाम आहे. कोणती हत्यारे किंवा तंत्रज्ञान वापरून ही कातळशिल्पे खोदली गेली असावीत याबद्दलही कुतूहल निर्माण होते. स्थानिक मंदिरांच्या दंतकथा आणि कर्मकांडांमध्ये या शिल्पांना स्थान मिळालेले आहे. आजही या कातळशिल्पांचा आकार, त्यामधील प्रमाणबद्धता थक्क करणारी आहे.

देवाचे गोठणे या ठिकाणी असलेल्या कातळशिल्पाची अजून एक गंमत आहे. शिल्प दिसायला तसे साधेच आहे. मानवी आकृतीचे पाय इथं दिसतात. पण इथं जर होकायंत्र ठेवलं तर त्याला उत्तर दिशा दाखवणे जमत नाही. काट्याची गडबड होते.

बारसू इथं खोदलेल्या कातळशिल्पांमध्ये व्याघ्रप्रतिमा दिसतात आणि सोबत मानवी आकृती दिसते. ही देवतेची कल्पना आहे का? की शिकारीचे चित्रण? गेंडा किंवा पाणघोडा असे कोकणात ज्ञात नसलेले प्राणीही अनेक ठिकाणी कातळशिल्पांमध्ये आहेत. हा मानव स्थलांतरित होता म्हणून हे प्राणी दिसतात का? की पूर्वी कोकणात हे प्राणी होते. कितीतरी प्रश्न अनुत्तरित आहेत आणि संशोधनाचे आव्हान आपल्यासमोर ठेवत आहेत.

काही आकृती इतक्या विलक्षण आहेत की या रेखांकनापासून प्रेरणा घेऊन एखादा एम एफ हुसेन, दीनानाथ दलाल, पिकासो नवीन फॉर्म्स असलेली चित्रे निर्माण करू शकेल.

मला सगळ्यात विलक्षण वाटलेली गोष्ट म्हणजे काही कातळशिल्पांमध्ये खोल समुद्रात आढळणारे प्राणीसुद्धा रेखलेले दिसतात. स्टिंग रे, शार्क .. त्यांच्या मूळ आकारात आणि अतिशय बारकावे अभ्यासून चित्रित केलेले. सगळंच फोटोत दाखवलं तर पाहण्यात काय गंमत आहे. तेव्हा तुम्हाला आवाहन करतोय की कोकण भ्रमंतीचा बेत जमवा आणि ही कातळशिल्पे आवर्जून पहा. आणि हे करत असताना स्थानिकांची मदत नक्की घ्या.
सुधीर (भाई) रिसबूड निसर्गयात्री संस्थेच्या माध्यमातून इथं बरंच काम करत आहेत. त्यांचे मार्गदर्शन घेऊन या आदिम मानवाच्या किमयेचा आनंद घ्या. सुधीर रिसबूड यांचा क्रमांक +९१९४२२३७२०२०