
दापोली शहरापासून जवळच मोकल बाग नावाचे ठिकाण आहे. तिथं टाळसुरे गावातील मानाई देवीचे मंदिर कुठं आहे याची चौकशी करायची. सडवे आणि शेडवई सारखीच अप्रतिम विष्णुमूर्ती इथं पाहता येते. या ठिकाणी दुर्गादेवी, मानाई आणि आणि महादेव अशी तीन मंदिरे असून मानाई देवीच्या देवळात अनेक मूर्ती ठेवलेल्या दिसतात. काळभैरव आणि इतर ग्रामदेवता इथं आहेत. इथलं मूर्ती वैविध्य पाहिलं की वाटतं एखाद्या पुरातत्व संशोधकाने इथं यावं आणि या शिल्पांची माहिती सविस्तरपणे टिपून घ्यावी.

मंदिर परिसरातील अजून एक महत्त्वाचा पुरातत्व वारसा म्हणजे इथं असलेले वीरगळ. एखाद्या लढाईत पराक्रम गाजवून वीरगतीस प्राप्त झालेल्या योद्ध्याच्या स्मरणार्थ वीरगळ बांधली जात असे. इथं काही वीरगळ एका बाजूला ठेवलेल्या आहेत.

दुर्गादेवीच्या मंदिरात विष्णूची भग्न मूर्ती ठेवलेली आपल्याला दिसेल. अतिशय सुंदर कोरीवकाम असलेली ही मूर्ती तुटलेली असल्याने पूजेत वापरली जात नाही. पण किमान या महत्त्वाच्या शिल्पाला गाभाऱ्याचा निवारा मिळाला हेही नसे थोडके.

या मूर्तीवर असलेला आयुध क्रम पाहिला असता तो पद्म, शंख, चक्र आणि गदा असा दिसतो. म्हणजे पशंचग असा क्रम असलेली ही केशवमूर्ती आहे असं म्हणता येईल. मूर्तीमागील प्रभावळ तुटली असल्याने त्यावरील संपूर्ण कोरीवकाम लक्षात येत नाही. पायाशी गरुड आणि लक्ष्मीची मूर्ती दिसते. मूर्तीचे अलंकार आणि वस्त्रे अतिशय नाजूक कोरीव कामातून घडवली गेली आहेत. त्यामुळे भग्नावस्थेत असूनही ही मूर्ती अतिशय आकर्षक वाटते. अशीच विष्णुमूर्ती सडवे येथेही आहे त्याबद्दल इथे वाचा. कोकणात चित्र भ्रमंती करत राहण्यासाठी आमच्या ब्लॉगला भेट देत रहा ही अगत्याची विनंती.
Pingback: बिवलीचा श्री लक्ष्मीकेशव | Darya Firasti