Darya Firasti

कर्णेश्वरचा कलाविष्कार

कोकणात प्राचीन म्हणता येतील अशी खूप मंदिरे नाहीत. संगमेश्वराच्या परिसरात सोमेश्वर, काशी-विश्वेश्वर आणि कर्णेश्वर ही मंदिरे सुस्थितीत आहेत. त्यापैकी कर्णेश्वर मंदिर दगडात केलेल्या कोरीवकामाचा उत्कृष्ट वारसा जपून आहे. संगमेश्वरला अलकनंदा आणि वरुणा या दोन नद्या जिथं एकत्र येतात तिथं जवळच हे स्थान आहे. जवळपास एक हजार वर्षे जुने असलेले हे मंदिर कर्णराजाने बांधले असे सांगितले जाते. हा चालुक्य वंशातील राजा असून या भागात त्याचे शासन असल्याची नोंद ऐतिहासिक साधनांत आहे.

दहा चौरस मीटर आकाराचा मुखमंडप मग पुढे अंतराळ आणि नंतर गर्भगृह अशी मंदिराची साधारण रचना आहे. मंदिर हे जोत्यावर बांधलेले असल्याने तीन बाजूला पायऱ्यांची सोय केलेली दिसते. या पायऱ्या चढून गेल्यावर जी अर्धमंडपाची जागा येते तिथं वर्तुळाकार शिळा कोरलेल्या आहेत. अप्रतिम दगडी झुंबरे इथं दिसतात. वर्तुळाकार शिळांना स्थानिक पराती म्हणतात. अशा एकंदर पाच पराती मंदिरात असून पाच पांडवांच्या जेवणाची ती सोय होती अशी दंतकथा प्रचलित आहे.

मंडपाच्या करोटक वितानाच्या बाजूला शेषशायी विष्णू दिसतो. त्याची दृष्टी कोरीव दशावतारांकडे आहे असं भासतं. समुद्र मंथन, यशोदा दधि मंथन असे प्रसंग इथं कोरलेले दिसतात. इथली करोटक वितानाची रचना अहमदनगरच्या ताहकरी मंदिराशी साधर्म्य असलेली आहे असं ज्येष्ठ पुरातत्व शास्त्रज्ञ गो. ब. देगलूरकर सांगतात.

मंडपातील स्तंभशीर्षांवर (column capitals?) कीचक कोरलेले असतात तिथं गणेश, सरस्वती, चामुंडा, भैरव अशा बसलेल्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात. या मंदिरात सिंहग शिवाच्या मूर्ती दिसतात. म्हणजे नंदी ऐवजी स्थानक शिवाबरोबर सिंह प्रतिमा कोरलेली दिसते. मथुरा येथील संग्रहालयात अशी मूर्ती असल्याचे देगलूरकर सांगतात. त्यांच्यामते अशा मूर्ती साधारणपणे ४-५व्या शतकानंतर नाहीत. त्यामुळे १२व्या शतकातील ही मूर्ती विशेष महत्त्वाची ठरते. मुखमंडप, अर्धमंडप आणि मुख्य मंडप या सर्वांना करोटक पद्धतीची विताने आहेत.. म्हणजे ceiling आहेत. तिथं कर्णदुर्दरक, गजतालू, लूम आणि लोलक-झुंबर अशी रचना असल्याचे देगलूरकर वर्णन करतात.शंकराला अभिषेक झाल्यानंतर ते पाणी वाहून बाहेर पडण्यासाठी जो मार्ग आहे त्याच्या मुखाशी मकरमुख रचना आहे. मकर म्हणजे गंगेचे वाहन. इथं येणारे पाणी हे गंगाजल समजून तीर्थप्राशन करायचे असा संकेत या रचनेतून व्यक्त होतो.

या ठिकाणी नवीन बांधलेले मंदिर आहे ते श्रीगणेशाचे आहे. त्यावरून प्राचीन काळी हे गणेश पंचायतन असावे असा कयास देगलूरकर मांडतात. वायव्य कोपऱ्यात सूर्याचे छोटेसे मंदिर आहे. सात घोड्यांवर स्वार सूर्य आणि सोबत उषा-प्रत्युषा प्रतिमा अशी रचना इथं पाहता येते.

वायव्य कोपऱ्यात सूर्याचे छोटेसे मंदिर आहे. सात घोड्यांवर स्वार सूर्य आणि सोबत उषा-प्रत्युषा प्रतिमा अशी रचना इथं पाहता येते.

संदर्भ –

कोकणातील लेणी, मंदिर स्थापत्य आणि मूर्तिशास्त्र – गोरक्ष ब. देगलूरकर – कोकण: विविध दिशा आणि दर्शन (पृष्ठ क्रमांक १५८-१५९)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: