आज पाकिस्तानात असलेल्या बलुचिस्तान प्रांतातील अर्ध-वाळवंटी प्रदेश मकरान येथे स्थित हे एक महत्वाचे शक्तिपीठ.. हिंगलाज किंवा हिंगुळजा मातेचे स्थान. आज तिथं जाणे कठीण असले तरीही कोकणातील रायगड जिल्ह्यातील चौलच्या डोंगरावर तिथल्या प्राचीन लेण्यांमध्येही हिंगुळजा मातेचे वास्तव्य आहे
सातो द्वीप शक्ति सब रात को रचात रास। प्रात:आप तिहु मात हिंगलाज गिर में॥
भन्साळी मंडळींसाठी हे एक प्रमुख आराध्यदैवत असल्याने इथे विश्रामधामही बांधण्यात आला आहे. या डोंगरावरच पण उत्तर दिशेला चौल-भोवाळे येथील महत्वाचे दत्त मंदिर आहे. सातआठशे पायऱ्या चढून ते ठिकाण पाहिले की डोंगराच्या कडेने चौल लेण्यांच्या मागे थेट येणे शक्य आहे. मी मोटरसायकल घेऊन आलेलो असल्याने मला मात्र दोन्ही ठिकाणे स्वतंत्रपणे करावी लागली होती.

चौल येथील लेण्यांमध्येच खडकात कोरून काढलेल्या एका गुहेत हे मंदिर आहे. गाडीरस्त्यापासून साधारणपणे १५८ पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण इथं पोहोचतो. वर पाण्याची टाकी आहेत. गुहेबाहेर सभामंडप आहे आणि दारातच एक सुंदर दीपमाळही दिसते. इथून चौल रेवदंड्याचा बराच परिसर आपल्याला दिसू शकतो.

हिंगुळजा मातेची मंदिरे गुजरात आणि राजस्थान येथेही आहेत. शक्तीपीठ असलेली ही देवी हिंगळजा, हिंगळाज, हिंगुलता अशा अनेक नावांनी ओळखली जाते. वीरभद्र म्हणजेच शिव हा भैरव रूपात सर्व शक्तिपीठांमध्ये निवास करतो अशी श्रद्धा आहे. कुलर्णव तंत्रातील १८ शक्तिपीठांमध्ये हिंगुळजा माता तिसऱ्या ठिकाणी आहे, कोट्टारी, कोटावी, कोट्टारिशा अशी नावेही या देवतेला दिलेली दिसतात.

चरण किंवा गढवी समाज हिंगुळजा देवीला आपली कुलदेवी मानतो. यामागील आख्यायिका अशी आहे की पृथ्वी निःक्षत्रिय करायला निघालेल्या परशुरामाच्या आक्रमणातून १२ क्षत्रियांना काही ब्राह्मणांनी ब्राह्मण वेष देऊन वाचवले आणि हिंगुळजा मातेच्या मंत्राने त्यांचे संरक्षण झाले.

इथे पुढं एका गुहेत नवचंडी देवीची मूर्ती आहे. दुर्गेच्या या रूपाची पूजा दुर्गा सप्तशती पाठ म्हणून नवचंडी विधीने केली जाते. इथल्या एका गुहेत चौलच्या बौद्ध लेण्याचे अवशेष स्पष्टपणे दिसतात.

भक्तांची इच्छा, आशा पूर्ण करणाऱ्या आशापुरा मातेचे देऊळही या ठिकाणीं एका गुहेत आहे. कच्छ आणि राजस्थानमध्ये मुख्यतः या देवीला आराध्य मानले जाते. चौहान आणि पुरबिया राजपूत, काही ब्राह्मण कुटुंबे, वैश्य लोकांमधील विजयवर्गीय समाज, तसेच गुजरात मधील लोहाणा, जाडेजा राजपूत, भन्साळी आणि पिपळाव चे पटेल यांचीही ही कुलदेवी आहे.

या ठिकाणचे प्राचीन नाव रेवतीतीर्थ असे होते. बलरामाची पत्नी रेवती हिचे हे स्थान. ह्युएन त्सांग, मसूदी, टॉलेमी अशा विविध विदेशी पर्यटकांनी चौलच्या प्राचीन बंदराचा उल्लेख त्यांच्या लिखाणात केलेला आढळतो. अबू रिहान अल बिरूम असं सांगतो की ठाण्याच्या दक्षिण दिशेला चौल जैमूर नावाचे उत्कृष्ट बंदर आहे. इद्रीसीच्या ११५३ सालच्या नोंदीत इथं नारळाची अनेक झाडे असलेलं नियोजित शहर आहे असा उल्लेख आढळतो. पुढे १६३५ मध्ये सादिक इफ्शाहानी च्या लेखनातही चौलचा उल्लेख सापडतो. इथं चाफ्याची झाडे होती म्हणून किंवा बौद्ध राजा चंपा याने वसवलेले शहर म्हणून या जागेला चंपावती या नावानेही ओळखले जात असे. कान्हेरी येथील शिलालेख, पेरिप्लस मध्ये सेमुल्ला म्हणून इसवीसन २४७ मध्ये केला गेलेला उल्लेख या ठिकाणचे प्राचीनत्व सिद्ध करतात. उत्तर शिलाहारांतील राजपुत्र झंझ इथं शासन करत असल्याचा आणि इथं अतिशय समृद्ध बाजारपेठ असल्याचा उल्लेख मसूदीने केलेला आहे. आज कोकणातील एक रम्य गाव म्हणून चौल सर्वांना परिचित आहे. इथं पोर्तुगीजांचा आगरकोट, मराठ्यांचा राजकोट, रामेश्वर मंदिर, चौलची लेणी, दत्त मंदिर, हिंगुलजा मातेचे मंदिर, कलावंतिणीचा महाल, आसा मशीद, हमामखाना अशी अनेक ठिकाणे आहेत. दर्या फिरस्तीच्या प्रवासात आपण ती नक्कीच पाहणार आहोत.